अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ५ सच्चिदानंद पदत्रय
विवरण ओव्या २६ ते३०(अभंग ५४ ते६३ )
**********************************************************
जें जें बोलिजे तें तें नव्हे । होय तें तंव न बोलवे ।
साउलीवरी न मववे । मवितें जैसें ॥ ५-२६ ॥
26
जे काही बोलावे
प्रतिपादनास
ते नच तयास
लागू होय॥ ५४ ॥
सावलीवरून
न घेता ये माप
तसेच स्वरूप
पाहू जाता . ॥ ५५ ॥
मग आपलियाकडे । मावितया से
पडे ।
तैं लाजहिला जो आखुडे ।
मविते जैसें ॥ ५-२७ ॥
घेऊन जाता ऐसे
माप साऊलीचे
तयाला देहाचे
भान येते ॥ ५६ ॥
मग तो लाजून
घेई ओळखून
आपण ते कोण
म्हणूनिया ॥ ५७ ॥
जैसी सत्ताचि स्वभावें ।
असत्ता तंव नव्हे ।
सत्तात्व संभवे । सत्तेसि
कायि ? ॥ ५-२८ ॥
तैसे हे भरुनी
अवघीच सत्ता
अस्तित्व असता
नाही मुळी ॥ ५८ ॥
असत नसता
कुठून ये सत
अवघीच व्यर्थ
वटवट ॥ ५९ ॥
आणि अचिदाचेनि नाशें । आलें
जें चिन्मात्रदशे ।
आतां चिन्मात्रचि मा कैसें ।
चिन्मात्रीं इये ॥ ५-२९ ॥
आणि म्हणून जाता
अचिदाचे नाशे
चिन्मात्र ये दशे
जरी येथे ॥ ६० ॥
येणे चिन्मात्रेचे
ऐसे हे म्हणणे
अकर्त्या करणे
तैसे होय॥ ६१ ॥
30
नीद प्रबोधाच्या ठायीं । नसे
तैसें जागणेंहि ।
तेवीं चिन्मात्रचि मा काई ।
चिन्मात्रीं ये ? ॥ ५-३० ॥
जागृतीत नसे
स्मृती त्या निद्रेचि
जाण जागृतीची
सदोदित ॥ ६२ ॥
तैश्याचिये परी
चिद्रुप असून
तया त्याचे भान
ते ही नाही ॥ ६३ ॥
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
६/६/२०
No comments:
Post a Comment