अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ५ सच्चिदानंद पदत्रय
विवरण ओव्या ५६ ते६० (अभंग१०९ते ११७ )
************************************************************************
उपाय मागील पाय । घेऊन झाले वाय ।
प्रतीति सांडिली सोय । प्रत्ययाची ॥ ५-५६ ॥
जाणण्या उपाय
घेती मागे पाय
होऊनिया वाय
तया ठायी ॥ १०९॥
प्रत्यक्ष प्रतीती
अशक्यच इथे
म्हणूनिया वाटे
नच जाय ॥ ११०॥
येथें निर्धारेंसी विचारु । निमोनि झाला साचारु ।
स्वामीच्या संकटी शूरु । सुभटू जैसा ॥ ५-५७ ॥
जैसा संकटात
असतांना स्वामी
जीव त्या देऊनी
लढे योद्धा ॥ १११॥
तैसा तो विचार
जो निश्चयात्मक
सरे आपसूक
शोधासाठी ॥ ११२ ॥
नाना नाशु साधूनि आपुला । बोधु बोधें लाजिला ।
नुसुधेपणें थोंटावला । अनुभउ जेथे ॥ ५-५८ ॥
द्वैताच्या अभावी
बोध नाश पावे
तया न सोसावे
बोध नाव ॥ ११३ ॥
आणि अनुभव
एकांती पडून
पांगळा होऊन
जात असे ॥ ११४॥
भिंगाचिया चडळा । पदरांचा पुंज वेगळा ।
करितां जैसा निफाळा । आंगाचा होय ॥ ५-५९ ॥
अभ्रक भिंगाचे
काढता पापुद्रे
काही न उरते
जैसे मागे ॥ ११५॥
कां गजबजला उबा । पांघुरणें केळीचा गाभा ।
सांडी तेव्हेळीं उभा । कैंचा कीजे ? ॥ ५-६० ॥
किंवा गरमीने
अति उबारला
केळी गाभा ल्याला
पांघरून ॥ ११६॥
तरी तयालागि
एकेक काढता
नुरेच पाहता
अंती काही ॥ ११७॥
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
No comments:
Post a Comment