Monday, 4 May 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ५ सच्चिदानंद पदत्रय विवरण ओव्या १६ ते२० (अभंग३३ते४३ )





अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ५  सच्चिदानंद पदत्रय विवरण  ओव्या १६ ते२० (अभंग३३ते४३  )


विषो नाहीं कोण्हाहि । जया प्रमेयत्वचि नाहीं ।
तया स्वप्रकाशा काई । प्रमाण होय ॥
 ५-१६ ॥

जो नच विषय
असतो कुणाही  
वा प्रमयत्व ही
जया नाही ॥३३॥

सांगा स्वयंप्रकाशाला
कैसे ते प्रमाण
लागे अनुमान
कळावया ॥३४॥

प्रमेयपरिच्छेदें । प्रमाणत्व नांदे ।
तें कायि स्वतःसिद्धें । वस्तूच्या ठायीं ? ॥ ५-१७ ॥



प्रमय विस्तारे
प्रमाणत्व थेट
कळू लागे नीट
जगतात  ॥३५॥

प्रमेय शब्दाला
प्रमाण तुलना
मर्यादा तयांना
त्याच्या आहे ॥३६॥

आत्मतत्व वस्तू
असे स्वयंसिद्ध
त्या होणे प्रसिद्ध
आणि कैसे ॥३७॥

एवं वस्तूसि जाणों जातां । जाणणेंचि वस्तु तत्वता ।
मग जाणणें आणि जाणता । कैचें उरे ? ॥ १८ ॥

जाणण्‍यास जाता
त्या आत्मवस्तूला
अर्थ जाणण्याला
नच  उरे ॥३८॥

स्वयम् ज्ञानरूप
असल्या कारणे
जाणता जाणणे
तुटे तिथे ॥३९॥
म्हणोनि सच्चित्सुख । हे बोल वस्तुवाचक ।
नव्हती हे शेष । विचाराचे ॥ ५-१९ ॥


म्हणून या इथे
सत चित सुख
न हे वस्तुवाचक
एका अर्थी ॥४०॥

इतुके   इथेही
कळले साचार
पाहता सकळ
विचारांती ॥४१॥
ऐसेनि इयें प्रसिद्धे । चालिलीं सच्चिदानंद पदें ।
मग द्रष्ट्या स्वसंवादें । भेटती जेव्हां ॥ ५-२० ॥

ऐसी आहे येथे   
पदे ही प्रसिद्ध
जी सच्चिदानंद
म्हणवती ॥४

जेधवा दृष्टयाला
भेटे स्वस्वरूप
शब्द आपोआप
हरवती. ॥४३॥


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
4/5/2020

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...