Saturday, 12 September 2020

भागअमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ८१ते ८५(१६८ अभंग ते१७७ ) १६वा

१६वा भाग
अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ८१ते ८५(अभंग ते ) ***********
*****
कृतांत जरी कोपेल । तरी त्रैलोक्य हें जाळील । वांचूनि आगी लावील । आगीसि काई ? ॥ ६-८१ ॥ 
जरी का कृतांत 
क्षोभला कोपून 
त्रिलोक जाळून 
ठाकू शके ॥१६८॥
परी तयातील 
अग्निस ती आग 
कोण बरे सांग 
लावू शके॥१६९॥

आपणपें आपणया । दर्पणेवीण धात्रेया । समोर होआवया । ठाकी आहे ? ॥ ६-८२ ॥

अहो विधात्याला 
पाहण्या स्वतःला 
जाणे आरशाला 
भाग असे ॥१७०॥
तयाविन तोही 
काय जाणू शके 
अन पाहू शके 
स्वतःला की ॥१७१॥
 दिठी दिठीतें रिघों पाहे ? । रुचि रुचीतें चाखों सुये ? । कीं चेतया चेतऊं ये ? । हें नाहींच कीं ॥ ६-८३ ॥ 
दिठी का दिठीला 
स्वतः पाहू शके 
रूची चाखू शके 
रुचीलाच ॥१७२॥
किंवा जागृताला
जागृत करणे 
कैसे हे घडणे 
घडू शके ॥१७३॥

चंदन चंदना लावी ? । रंगु रंगपणा रावी । मोतींपण मोतीं लेववी । ऐसें कैंचें ? ॥ ६-८४ ॥ 
चंदन उटी का
लावी स्व:स उटी 
रंग रंगविती 
रंगालाचि ॥१७४॥
मोती मोतीपण 
घेई पांघरून 
तेजे उजळून 
स्वतः कधी॥१७५॥
सोनेंपण सोनें कसी । दीपपण दीप प्रकाशी । रसपणा बुडी ते रसीं । तें कें जोडे ? ॥ ६-८५ ॥ 
काय कसवटी 
होऊनिया सोने 
पहातसे सोने 
कस कधी ॥१७६॥
ज्योत दे प्रकाश 
कधी का ज्योतीला
रस का  रसाला 
बुडी देई ॥१७७॥
*******
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
***********************

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...