१२वा भाग
अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ६१ते ६५(अभंग १२८ते १३७) ***********
माप मापपणें श्लाघे । जंव आकाश मवूं न रिघे । तम पाहतां वाउगें । दीपाचें जन्म ॥ ६-६१ ॥
मापा मापपण
शोभते तोवर
आकाश जोवर
मोजेना ते ॥१२८॥
दीपाने पाहिला
जर का अंधार
व्यर्थची आकार
जन्म त्याचा ॥१२९॥
गगनाची रससोये । जीभ जैं आरोगु जाये । मग रसना हें होये । आडनांव कीं ॥ ६-६२ ॥
जीभ जव जाई
गगन चाखाया
हरते उपाया
करुनिया ॥१३०॥
तरी तिला कैसे
म्हणावे रसना
येई उणेपणा
नामास त्या॥१३१॥
नव्हतेनि वल्लभे । अहेवपण कां शोभे । खातां केळीचे गाभे । न खातां गेले ॥ ६-६३ ॥
नसून वल्लभ
सौभाग्याचे लेणे
जगी मिरविणे
व्यर्थ जैसे ॥१३२॥
केळीचा तो गाभा
कोणी खाऊ गेले
उपाशी ते मेले
जणू काही॥१३३॥
स्थूळ सूक्ष्म कवण येकु । पदार्थ न प्रकाशी अर्कु । परि रात्रीविषयीं अप्रयोजकु । जालाचि कीं ॥ ६-६४ ॥
स्थूल सूक्ष्म किती
वस्तू जगतात
सूर्य प्रकाशत
साऱ्यांना त्या ॥१३४॥
तरी काही केल्या
रात प्रकाशे ना
वा तो न होईना
निशेचा त्या ॥१३५॥
दिठी पाहतां काय न फावे । परि निदेतें तंव न देखवे । चेता ते न संभवे । म्हणोनियां ॥ ६-६५ ॥
पाहता डोळ्याने
सारेच दिसते
निद्रा ना दिसते
परी कधी ॥१३६॥
कैसा जागा झाला
पाहीन झोपेला
तो न ती उरला
म्हणूनिया ॥१३७॥
*********:
©,डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
***********************
No comments:
Post a Comment