अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या , ९६ते १००(अभंग १९८ते २०७)
***********
एवं माध्यान्हींची दिवी । तम धाडी ना दिवो दावी । तैसी उपभयतां पदवी । शब्दा जाली ॥ ६-९६ ॥
मध्यान्हीचा दिवा
तम ना घालवी
दिस ना पालवी
कधीकाळी ॥१९८॥
तैसी या शब्दास
उभय बाजूची
काही कुठली ची
ज्ञप्ती नाही॥१९९॥
आतां अविद्या नाहींपणें । नाहीं तयेतें नासणें । आत्मा सिद्धुचि मा कोणें । काय साधावें ? ॥ ६-९७ ॥
नसल्या अविद्ये
कैसे ते नाशणे
कैसे हे घडणे
असंभव ॥२००॥
आणि आत्मा येथे
अरे सदा सिद्ध
तयाला प्रसिद्ध
कोण करे ॥२०१॥
ऐसा उभय पक्षीं । बोला न लाहोनि नखी । हारपला प्रळयोदकीं । वोघु जैसा ॥ ६-९८ ॥
प्रलय उदयी
जैसा हरपला
ओघ जो चालला
पाणियाचा ॥२०२॥
तैसा दोन्ही बाजू
न घडे प्रवेश
तै शब्द आवेश
ओसरला ॥ २०३॥
आतां बोला भागु कांहीं । असणें जयाच्या ठाईं । अर्थता तरि नाहीं । निपटुनियां ॥ ६-९९ ॥
जरी शब्द इथे
काही उमटले
आकारी दिसले
व्यवस्थित ॥२०४॥
परी पाहू जाता
तयाचा तो अर्थ
वाचून निरर्थ
शब्द नाही ॥२०५॥
बागुल आला म्हणितें । बोलणें जैसें रितें । कां आकाश वोळंबतें । तळहातीं ॥ ६-१०० ॥
रे बागुलबुवा
आला रे आला
म्हणणे बाळाला
तैसेचि हे ॥२०६॥
धरीले आकाशा
मिया तळहाती
बोलण्याची रिती
व्यर्थ जैसी ॥२०७॥
No comments:
Post a Comment