आपणया आपणपेंसी । लागलें लग्न कवणे देशीं । कीं सूर्य अंग ग्रासी । ऐसें ग्रहण आहे ? ॥ ६-७६ ॥
आप आपणाशी
लग्न ते करावे
ऐसे का घडावे
कुण्या देशी ॥१५८॥
अथवा भास्कर
ग्रासे स्व अंगाशी
ऐश्या ग्रहणासी
पाहे कुणी ॥१५९॥
गगन आपणया निघे ? । सिंधु आपणा रिघे ? । तळहात काय वळघे । आपणयां ? ॥ ६-७७ ॥
गगन निघाले
आपल्या घराला
सागर स्नानाला
सागरात ॥१६०॥
तळहात स्वतः
चढे तळहाती
काय ही घडती
वार्ता कुठे ॥१६१॥
सूर्य सूर्यासि विवळे ? । फळ आपणया फळें ? । परिमळु परिमळें । घेपता ये ? ॥ ६-७८ ॥
सूर्य का सूर्याचा
करतो उदय
फळे फळे काय
स्वतःसाठी ॥१६२॥
अणिक सुगंध
घेतो का सुगंध
होऊनिया धुंद
वेगळाची ॥१६३॥
चराचरा पाणी पाजणी । करूं येईल येके क्षणीं । परि पाणियासि पाणि । पाजवे कायी ? ॥ ६-७९ ॥
अवघ्या जगाला
करि ते पाजणे
ऐसे हे रे पाणी
एका क्षणी ॥१६४॥
परी त्या पाण्याला
लागे का तहान
पाणी तया कोण
पाजते का ॥१६५॥
साठीं तिशा दिवसां । माजीं एखादा ऐसा । जे सूर्यासीच सूर्य जैसा । डोळा दावी ॥ ६-८० ॥
वर्षाचे ते दिवस
तिनशे नि साठ
असे काय त्यात
दिन असा ॥१६६॥
जया दिनी सूर्य
पाहीन स्वतःला
आपुलीया डोळा
आपणच ॥१६७॥
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
***********************
No comments:
Post a Comment