१४वा भाग
अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या७१ ते ७५(अभंग १४८ते १५७) ***********
******
कैसीही वस्तु नसे । जैं शब्दाचा अर्थ हों बैसे । तैं निरर्थकपणें नासे । शब्दहि थिता ॥ ६-७१ ॥
कधीही कुठली
वस्तू ती नसून
शब्दांनी वर्णन
तिचे होय ॥१४८॥
निरर्थ प्रयास
अरे तो होतसे
शब्दही जातसे
सवे वाया ॥१४९॥
आतां अविद्याचि नाहीं । हें कीर म्हणो काई । परी ते नाशितां कांहीं । नुरेची शब्दाचें ॥ ६-७२ ॥
अविद्या जगती
खरोखर नाही
ऐसे म्हणणेही
काय कामी ॥१५०॥
म्हणून नसल्या
नाशास जो जाई
उरतच नाही
शब्द कुठे ॥१५१॥
यालागिं अविद्येचिया मोहरां । उठलियाहि विचारा । आंगाचाची संसारा । होऊनि ठेला ॥ ६-७३ ॥
म्हणूनिया शब्द
अविद्ये सामोरा
नाशासाठी गेला
जर कधी ॥१५२॥
अंग हरवतो
वेगळा नूरतो
सांगण्या ठाव तो
कुठे नाही ॥१५३॥
म्हणोनि अविद्येचेनि मरणें । प्रमाणा येईल बोलणें । हें अविद्याचि नाहींपणें । नेदी घडों ॥ ६-७४ ॥
यालागी अविद्ये
घडता मरण
शब्दास प्रमाण
येऊ शके ॥१५४॥
हे तो कदापिही
नच रे घडणे
अविद्या नसणे
म्हणूनिया १५५॥
आणि आत्मा हन आत्मया । दाऊनी बोलु महिमेया । येईल हें साविया । विरुद्धचि ॥ ६-७५ ॥
आणिक आत्म्याला
आत्मरूप दाऊ
महिमा ती गाऊ
शब्दांमध्ये ॥१५६॥
तरी हे विरुद्ध
असे रे बोलणं
शब्दा मोठेपण
शक्य नाही ॥१५७॥
****
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
***********************
No comments:
Post a Comment