Tuesday 15 September 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या , ९१ते ९५(अभंग १८७ते १९७)


१८वा भाग
अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या , ९१ते ९५(अभंग १८७ते १९७) 
***********

रसवृत्तीसी उगाणें । घेऊनि जिव्हाग्र शाहाणें । परि कायी कीजे नेणे । आपणापें चाखों ॥ ६-९१ ॥ 

जीभ घेई चव 
अवघ्या रसाची 
रसाच्या ज्ञानाची 
राणीच ती ॥१८७॥
तरी काही केल्या 
तिला तिची चव 
घेण्यास तो वाव 
नाही मुळी॥१८८॥

तरि जिव्हे काई आपलें । चाखणें हन ठेलें ? । तैसे नव्हे संचलें । तेंचि तेकीं ॥ ६-९२ ॥

तरी काय जिभे 
चाखण्याचा गुण 
जातो हरवून 
सांग इथे ॥१८९॥
अहो चाखनेच 
रूप मूर्तिमंत 
तिचे घनवट 
साकारले॥१९०॥

 तैसा आत्मा सच्चिदानंदु । आपणया आपण सिद्धु । आतां काय दे शब्दु । तयाचें तया ॥ ६-९३ ॥ 

तैसा आत्मा असे 
हा सच्चिदानंद
सदा स्वयम् सिद्ध
आत्मपणे ॥१९०॥
तयाला ते शब्द 
काय देऊ शके 
कैसे जाणू शके 
असीमाला ॥१९१॥

कोणाही प्रमाणाचेनि हातें । वस्तु घे ना नेघे आपणयातें । जो स्वयेंचि आइतें । घेणें ना न घेणें ॥ ६-९४ ॥ 

अवघी प्रमाण 
होतात रे व्यर्थ 
करू जाता सिद्ध 
परमात्मा ॥१९२॥
अरे वस्तू नाही 
सिद्ध वा असिद्ध 
प्रमाण प्रसिद्ध 
कदापिही ॥१९३॥
स्वतःला ते घेणे 
अथवा न घेणे 
नलगे करणे  
स्वयं सिद्धे॥१९४॥
सिद्ध साध्याविन 
तिचे ते असणे 
पूर्ण पूर्णतेणे 
सर्व काळी ॥१९५॥

म्हणोनि आत्मा आत्मलाभें । नांदऊनि शब्द शोभे । येईल ऐसा न लभे । उमसुं घेवों ॥ ६-९५ ॥

म्हणुनी आत्म्यास 
आत्म लाभ केला 
ऐसिया ह्या बोला 
अर्थ नाही  ॥१९६॥
फुकाचा हा गर्व 
शब्दाचा होईन 
काही केल्याविन
अगा इथे॥१९७॥
***
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
***********************

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...