Thursday 10 June 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २५६ते २६० (अभंग ५४७ ते ५५६)


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २५६ते २६० (अभंग ५४७ ते ५५६) 


🏵🏵🏵🏵


न पाहतां आरिसा असो पाहे ।तरी तेंचि पाहणें होये । आणि पाहणेन तरी जाये । न पाहणें पाहणें ॥ ७-२५६ ॥ 


पाहिल्या वाचून 

आरसा मुखाने 

मुख मुखपणे 

पाही मुखा ॥५४७


आणि मुळातून 

पाहू ते जाता 

पाहणे तत्वता 

दिसेची ना ॥५४८


तसेच तयाचे 

न पाहणे तेही 

विलयास जाई 

सवेचि की॥५४९


भलतैसा फांके । परी येकपणा न मुके । नाना संकोचे तरी असकें । हाचि आथी ॥ ७-२५७ ॥


फाकला कितीही 

विस्तार होऊन 

किंवा संकोचून 

छोटा झाला ॥५५०


तरीही असे तो 

सदैव संपूर्ण 

त्याचे एक पण 

मोडेचिना॥५५१


सूर्याचिया हाता । अंधकारू नये सर्वथा । मा प्रकाशाची कथा । आईकता का ? ॥ ७-२५८ ॥


सूर्या ना ठाऊक 

अंधाराची कथा 

उजेडाची वार्ता 

कळेल का ॥५५२


अंधारु कां उजिवडु । हा एकला येकवडु । जैसा कां मार्तंडु । भलतेथें ॥ ७-२५९ ॥ 


जगाच्या दृष्टीने 

अंधार प्रकाश 

सूर्य न तयास 

जाणतसे॥५५३


प्रकाश अभाव 

म्हणजे अंधार 

कैसा हा प्रकाश 

सूर्या कळे ॥५५४


तैसा आवडतिये भूमिके ।आरूढलियाही कौतुकें । परि ययातें हा न चुके । हाचि ऐसा ॥ ७-२६० ॥


तयापरी आत्मा 

झाला जरी काही 

आवडीने पाही 

आपुलिया ॥५५५


स्वरुपाची हानी 

त्याच्या होत नाही 

तोचि तो राही 

तैसाचि तो॥५५६


🌾🌾🌾 .


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

https://amrutaanubhav.blogspot.com


🏵🏵

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...