Friday 11 June 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २६१ते २६५ (अभंग ५५७ते ५७०)



अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७ वा अज्ञानखंडण ओव्या , २६१ते २६५ (अभंग ५५७ ते ५७० ) 

💮💮💮💮💮💮💮💮💮

सिंधूची सींव न मोडे । पाणीपणा सळु न पडे । जरी मोडूत गाडे । तरंगांचे ॥ ७-२६१ ॥ 

तटाची मर्यादा 

मोडल्याशिवाय 

सोडल्याशिवाय 

जल संग ॥५५७

एकावर एक 

उठताच लाटा 

पुनरपि वाटा 

जाती त्याच॥५५८

रश्मि सूर्यींच आथी । परी बिंबाबहेरी जाती । म्हणौनि बोधसंपत्ती । उपमा नोहे ॥ ७-२६२ ॥

सूर्याची किरणे 

बिंबाला सोडून 

जातात निघून 

बाहेर गा ॥५५९

 

म्हणून उपमा 

आत्म्याला सूर्याची 

लागू ती नाहीची  

बोध बळे ॥५६०

(बोध बळे पहा 

द्रष्टा दृश्याहून 

वेगळेपणान

नाहीच गा ॥५६१)


आणि पळहेच दोडा । न पडतां तढा । जग तंव कापडा । न भरेचि कीं ॥ ७-२६३ ॥ 

आणिक पहा हे 

कापसाच्या बोंडा 

पडता न तडा

वस्त्र नाही ॥५६२


परी आत्म सत्ता 

विना बदलता 

दिसते पाहता 

सर्वव्यापी ॥५६३


म्हणून ही उपमा 

कापूस बोंडाची 

आत्मा जगताची 

व्यर्थ येथे॥५६४


सोनयाचा रवा । रवेपणाचा ठेवा । अवघेयाचि अवयवा । लेणें नोहे ॥ ७-२६४ ॥ 

तैसेचि दृष्टांती

सोने व दागिने 

दिसतात उणे 

इथे पाही ॥५६५


बनविता लेणे 

लगड नुरते 

रूप बदलते 

स्वरूपाचे ॥५६६


 फेडितां आडवावो । दिगंतौनि दिगंता जावो । न ये मा पावों । उपमा काई ? ॥ ७-२६५ ॥ 


काढल्या वाचून 

वाटेतील धोंडा 

दुज्या दिशे वाटा 

केवी नेती ॥५६७


विना धडपड 

आणिक सायास 

जाणे न दिशेच 

अन्य कैसे ॥५६८


परी एका वेळी 

सर्व दिशातून 

आहे ओसंडून 

आत्मतत्त्व ॥५६९


उपमा दिशाची 

आत्म्या देऊ जावे 

तरी ती न भावे 

म्हणुनिची ॥५७०


🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵🏵🏵🏵🏵

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...