Tuesday 1 June 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २३१ते २३५ (अभंग ४९८ते ५०७)


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २३१ते २३५ (अभंग ४९८ते ५०७) 

🌸🌸🌸🌸

 दीपु दावी तयातें रची । कीं तेणेंची सिद्धि दीपाची । तैसी सत्ता निमित्ताची । येणें साच ॥ ७-२३१ ॥

दिवा लागेना का

कुठल्या दिव्याने 

लावत्या हाताने 

सिद्ध होय ॥४९८

तैसी आत्मसत्ता 

जगता निमित्त 

असती भासत 

व्यवहारा ॥४९९


वन्हीतें वन्हीशिखा । प्रकाशी कीर देखा । परी वन्ही न होनि लेखा । येईल काई ? ॥ ७-२३२ ॥

अग्नीला पेटवे 

अग्नीचीच ज्योत 

तेणे प्रकाशित 

सर्व होय ॥५००

परी तो अग्नी 

असे का वेगळा 

जेणे पेटविला 

तयाहून ॥५०१


आणि निमित्त जें बोलावें । तें येणें दिसोनि दावावें । देखिलें तरी स्वभावें । दृश्यही हा ॥ ७-२३३ ॥

आत्माचि दृश्य ते

होऊन दाखवे

म्हणुनी म्हणावे 

निमित्त त्या ॥५०२

आणिक दृश्य जे 

जाताची पाहत

तेही आत्मभूत 

आत्म रूपे॥५०३


म्हणौनि स्वयंप्रकाशा यया । आपणापें देखावया । निमित्त हा वांचुनियां । नाहींच मा ॥ ७-२३४ ॥

म्हणूनि स्वत:च्या 

आत्मप्रकाशाला

आला पहायाला

स्वत: तोच॥५०४

स्वत: वाचुनिया 

अन्य काही नाही 

भरुनिया राही 

हाच सर्व॥५०५


भलतेन विन्यासें । दिसत तेणेंची दिसे । हा वांचून नसे । येथें कांहीं ॥ ७-२३५ ॥ 

कोणत्याही दृश्य 

पदार्थ विस्तार 

असे आत्म्यावर 

आधारित ॥५०६

म्हणुनिया तया 

वाचून ते काही 

अस्तित्वात नाही 

सर्वथैव ॥५०७

🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...