Thursday 3 June 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २४१ते २४५ (अभंग ५१७ते ५२६)


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २४१ते २४५ (अभंग ५१७ते ५२६) 


💮💮💮💮💮💮💮


गंगा गंगापणें वाहो । कीं सिंधु होऊनि राहो । परी पाणीपणा नवलाहो । हें न देखो कीं ॥ ७-२४१ ॥


गंगेमध्ये शांत 

वाहणारे पाणी 

किंवा सिंधूपणी 

सागरात ॥५१७


तया पाण्याचे न 

सुटे पाणीपण 

कुठेही असून 

सदा काळी॥५१८


थिजावें कीं विघरावें । हें अप्रयोजक आघवें । घृतपण नव्हे । अनारिसें ॥ ७-२४२ ॥ 


असावे थिजले 

वा विरघळले 

तुपची संचले 

तुपपणे ॥५१९


दोन्हीही स्थितीत 

नच ते वेगळे 

होऊन ठाकले 

स्निग्धची ते ॥५२०


ज्वाळा आणि वन्हि । न लेखिजती दोन्ही । वन्हिमात्र म्हणोनि । आन नव्हेचि कीं ॥ ७-२४३ ॥ 


काय असतात 

ज्वाळा आणि अग्नी 

निराळे होऊन 

कधीकाळी ॥५२१


अग्निचेच रूप 

असते दोन्हीत 

असता जाळीत 

इंधनाला ॥५२२


तैसें द्रश्य कां द्रष्टा । या दोन्ही दशा वांझटा । पाहतां येकी काष्ठा । स्फूर्तिमात्र तो ॥ ७-२४४ ॥


तया परी दशा 

दृश्य आणि द्रष्टा 

अवघा वांझोटा 

कारभार ॥५२३


एका स्फूर्तीविना 

दिसते न काही  

कुणा तया ठायी

शोधुनिया ॥५२४


इये स्फूर्तीकडुनी । नाहीं स्फुर्तिमात्रवांचुनि । तरी काय देखोनि । देखतु असे ? ॥ ७-२४५ ॥ 


आणिक पाहता 

स्फूर्तीच्या कडून 

स्फुर्तीच्यावाचून 

आणि नाही ॥५२५


तर मग काय 

वेगळा होऊन 

ययाच्या वाचून 

आत्मा आहे ?॥५२६


🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

https://amrutaanubhav.blogspot.com

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...