Thursday 24 June 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २९१ते २९५ (अभंग ६२६ ते ६३६)


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २९१ते २९५ (अभंग ६२६ ते ६३६) 
💮💮💮💮

यालागीं वस्तुप्रभा वस्तुचि पावे शोभा जात असे लाभा वस्तुचिया -२९१  

म्हणुनिया प्रभा 

असे वस्तूचीच

मिळे वस्तूशीच 

शोभा तिची ॥६२६


आणि लाभ जाई

वस्तूचाच ठायी

एकत्व हे पाही 

तयामध्ये॥६२७

 

वांचून वस्तु यया आपणपें प्रकाशावया अज्ञान हेतु वांया अवघेंचि -२९२  

वस्तूच्या वाचून 

कारण ते यया 

वस्तू प्रकाशाया 

नच दिसे॥६२८


म्हणुनी अज्ञान 

ऐसे जे कारण 

ते प्रतिपादन 

व्यर्थ येथे॥६२९


म्हणोनि अज्ञान सद्भावो कोण्हे परी लाहों अज्ञान कीर वावो पाहों ठेलियाही -२९३

अज्ञान म्हणून

आहे ही जी उक्ती 

तर्कात न बसती 

कुठल्याही ॥६३०


नाहीच नाहीच 

मुळीच अज्ञान 

निर्णय यातून 

निघतो हा॥६३१


परी तमाचा विसुरा जोडेचि दिनकरा रात्रीचिया घरा गेलियाही -२९४  

तमाचा अंशही 

मिळेना भास्करा 

जाऊनिया घरा 

अंधाराच्या॥६३२


कां नीद खोळे भरिता जागणें ही ये हाता येकलिया टळटळिता ठाकिजे जेवीं -२९५  

निद्रा पिशवीत 

घ्यावी ती भरून 

कोणी ठरवून 

निघे जर॥६३३


तर निद्रेतून 

जागे होणे हेही 

शिल्लक न राही 

तयासाठी ॥६३४


केवळ जागृती 

टळटळीत ती

घेऊन ठाव ती

उरे सदा ॥६३५


तयापरी आत्मा 

एकमेव असतो 

केवळ राहतो

स्वयमेव:॥६३६


॥श्री ज्ञानेश्वरार्पणमस्तू ॥

  ।  इदम् न मम ।


इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्अमृतानुभवे अज्ञानखंडन नाम सप्तम प्रकरणं संपूर्णम्

 🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...