Sunday 6 June 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २४६ते २५० (अभंग ५२७ते ५३७)


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २४६ते २५० (अभंग ५२७ते ५३७) 

🌸🌸🌸🌸

पुढें फरकें ना दिसतें । ना मगें डोकावी देखतें । पाहतां येणें ययातें । स्फुरद्रुपेंचि ॥ ७-२४६ ॥

जेव्हा न दृश्य 

पुढे फडकत 

प्रत्ययाला येत

घडणारे ॥५२७

अथवा तो द्रष्टा 

मागे डोकावत 

घडले पाहत 

काहीच ते ॥५२८

पाहे तयाकाळी 

आपणा आपण  

चिद्रूप स्फुरण 

तेथे असे ॥५२९

कल्लोळें जळीं घातलें । सोनेंनि सोनें पांघुरलें । दिठीचे पाय गुंतले । दिठीसीचि ॥ ७-२४७ ॥

जेवी का घातले 

तरंग पाण्यात 

सोने पांघरत 

सोने गेले ॥५३०

दिठीचे पायची 

गुंतले दिठीत 

होऊन तटस्थ 

आहे ती ही५३१

श्रुतीसि मेळविली श्रुती । दृतीसि मेळविली दृती । कां जे तृप्तीसीचि तृप्ति । वेगारिली ॥ ७-२४८ ॥

नाद मिसळले 

जर का नादात 

आणिक गंधात 

गंध कधी ॥५३२

किंवा बोलावून 

कोणी भोजना सी 

तृप्तीच तृप्तीशी 

वाढली गा ॥५३३

गुळें गुळ परवडिला । मेरु सुवर्णें मढिला । कां ज्वाळा गुंडाळिला । अनळु जैसा ॥ ७-२४९ ॥

गुळ वरी लेप 

दिला की गुळाचा 

लेप सुवर्णाचा 

मेरू लागी ॥५३४

किंवा गुंडाळला 

अग्नि ज्वाळेमध्ये 

काय आले भेदे

रूप तिथे ॥५३५

हें बहु काय बोलिजे । कीं नभ नभाचिया रिगे सेजे । मग कोणें निदिजे । मग जागे तें कोणें ॥ ७-२५० ॥

आणिक याहून 

काय बोलावया 

नभ नभाचिया 

सेजे शिरे ॥५३६

मग तया ठाई 

कोण ते निजले 

जागे नि राहिले 

कोण असे ॥५३७

🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com


No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...