Sunday 13 June 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २७१ते २७५ (अभंग ५८२ ते ५९२ )



अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २७१ते २७५ (अभंग ५८२ ते ५९२ ) 

🌸🌸🌸🌸🌸

 सुवर्णगौर अंबिका । न म्हणिजे कय काळिका ? । तैसा आत्मप्रकाशका । अज्ञानवादु ॥ ७-२७१ ॥

सोन्याची मूर्ती 

केली कालिकेची 

अनुपम्य साची 

जरी इथे ॥५८२

असून सुवर्ण 

सुंदर झळाळी 

तिजलागे काळी 

म्हणतसे ॥५८३

तशा परी आहे 

अवघे अज्ञान 

नाम अभिधान 

घेऊनिया॥५८४

येर्हवीं शिवोनि पृथ्वीवरि । तत्त्वांच्या वाणेपरी । जयाचा रश्मिकरीं । उजाळा येती ॥ ७-२७२ ॥

श्री शिवापासून 

या पृथ्वीपर्यंत 

तत्व जी अनंत 

दिसतात॥५८५

अवघी जयाच्या 

किरणी भारीत 

होती प्रकाशीत 

खरोखर॥५८६

जेणें ज्ञान सज्ञान होये । दृङ्मात्र दृष्टीतें विये । प्रकाशाचा दिवो पाहे । प्रकाशासी ॥ ७-२७३ ॥ 

जयाचिया योगे

ज्ञान हो सज्ञान 

दृष्टीचे दर्शन 

उपजून ॥५८७


प्रकाशी प्रकाश 

येतसे दाटून 

जयाच्या पासून 

ऐसे तत्व॥५८८


तें कोणें निकृष्टें । दाविलें अज्ञानाचेनि बोटें । ना तमें सूर्य मोटे । बांधतां निकें ॥ ७-२७४ ॥ 

तया जर कोणी 

मूर्खत्व भरले 

अज्ञान म्हटले 

आग्रहाने ॥५८९

तरी ते बोलणे 

सूर्याला बांधणे 

तमाच्या मोटेने 

तैसे होय ॥५९०

`अ` पूर्वी ज्ञानाक्षरी । वसतां ज्ञानाची थोरी । शब्दार्थाची उजरी । अपूर्व नव्हे कीं ? ॥ ७-२७५ ॥ 

ज्ञानाच्या सामोरी 

आकार लावला 

अज्ञान ची केला 

शब्दे फक्त ॥५९१

थोर त्या ज्ञानाला 

शब्द चातुर्याने 

ऐसे हीणवणे 

अपुर्वचि॥५९२


🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

🏵🏵

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...