Saturday 29 May 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २२६ते २३० (अभंग ४८८ते ४९७)

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २२६ते २३० (अभंग ४८८ते ४९७) 

जागृती दाविला । कां निदा हारविला । परी जैसा येकला । पुरुषपुरुषीं ॥ ७-२२६ ॥ 

जर जागृतीत 

कोणी दाखविला 

अन हरविला 

निद्रे माजी ॥४८८

तरीही पुरुष 

पुरुषा ठिकाणी 

एकटा राहुनी 

प्रकाशतो॥४८९

कां रायातें तूं रावो । ऐसा दाविजे प्रत्ययो । तर्ही ठायें ठावो । राजाचि असे ॥ ७-२२७ ॥ 

अथवा राजाला 

शब्दी उल्लेखणे

राजश्री वदणे 

कधी जरी ॥४९०

तरी तोच राजा 

आपुलिया ठाई 

येत जात नाही

शब्दांनी त्या॥४९१

ना तरी रायपण राया । नाणिजे कीं प्रत्यया । तर्ही कांहीं उणें तया । माजी असे ? ॥ ७-२२८ ॥ 

अथवा राजाला 

राजा न म्हटले 

शब्द न वचले

कधीकाळी ॥४९२

तरी काय न्यून 

येतं असे कधी 

राजा राजेपदी 

विराजित॥४९३


तैसें दावितां न दावितां । हा ययापरौता । चढे न तुटे आईता । असतचि असे ॥ ७-२२९ ॥ 


तयापरी आत्मा 

ज्ञानाने दाविला 

अज्ञाने झाकीला  

कधी काळी॥४९४

दोघा पलीकडे 

तयाचे असणे 

वाढणे मोडणे 

होत नाही॥४९५

तरी कां निमित्य पिसें । हा यया दाऊं बैसें । देखतें नाहीं तैं आरिसे । देखावे कोणें ? ॥ ७-२३० ॥

तर मग इथे 

स्वतः मिळवावे 

वेड का लागावे 

कोणास ते ॥४९६

 अहो इथे जर 

पाहणारा नाही 

कोण कोणा पाही

आरशात ॥४९७

🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com


No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...