Tuesday 25 May 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २११ते २१५ (अभंग ४५५ते ४६५)


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २११ते २१५ (अभंग ४५५ते ४६५) 

🌺🌺🌺

कीं साउलीचेनि व्याजें । मेळविलें जेणें दुजे । तयाचें करणें वांझें । जालें जैसें ॥ ७-२११ ॥ 

कोणी ठरविले 

घ्यावे सोबतीला 

आपल्या छायेला 

सवेची की ॥४५५

तयाची सोबत 

ठरते निरर्थ 

वांझ मेहनत 

जैसी काही॥४५६

तैसें दृश्य करूनियां । द्रष्ट्यातें द्रष्ट्या । दाऊनि धाडिलें वाया । दाविलेपणही ॥ ७-२१२ ॥ 

तयापरी द्रष्टा 

जे दृश्य असेल 

अन दाखवेल 

तयाला ची ॥४५७

तरी तयाचे ते 

व्यर्थ दाखवणे 

जगास सांगणे 

असे पहा ॥४५८

जें दृश्य द्रष्टाचि आहे । मा दावणें कां साहे ? । न दाविजे तरी नोहे । तया तो काई ? ॥ ७-२१३ ॥

दृश्य म्हणुनिया 

असे जे जे काही 

द्रष्टाच ते पाही 

असे बरे ॥४५९

मग दाखवणे 

वेगळे पणाने 

कैसे ते घडणे 

होय इथे ॥४६०

आणि जर काही 

नाही दाखवले 

द्रष्टा पण गेले 

ऐसे होय ?॥४६१

आरिसा पां न पाहे । तरी मुखचि वाया जाये ? । तेणेंवीण आहे । आपणपें कीं ॥ ७-२१४ ॥ 

जरी का आरसा 

मुखे न पाहिला 

मुख ते वायाला 

गेले काय ?॥४६२

आरशा वाचून 

दिसल्या वाचुनी 

आपल्या ठिकाणी 

आहेच ते॥४६३

तैसें आत्मयातें आत्मया । न दाविजे पैं माया । तरी आत्मा वावो कीं वायां । तेचि कीं ना ? ॥ ७-२१५ ॥ 

तयापरी माया 

आत्म्याचे दर्शन 

आत्म्या घडवून 

आणते ना ॥४६४

तर मग काय 

आत्मा खोटा असे 

माया खोटी असे 

काय बरे ?॥४६५

🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

*********

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...