Sunday 23 May 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २०१ ते २०५ (अभंग ४३३ते ४४४ )


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २०१ ते २०५ (अभंग ४३३ते ४४४ ) 
🌸🌸🌸🌸

पाहाणया पाहणें आहे । तरी न पाहणें हेंचि नोहे । म्हणौनि याची सोये । नेणती दोन्ही ॥ ७-२०१ ॥

जर पाहणारा 

असतो पाहणे 

तेथे ते पाहणे 

कैसे घडे ॥४३३

द्वैतात पाहणे 

किंवा न पाहणे 

दोन्ही नच होणे 

आत्मतत्वी॥४३४

एवं पाहणें न पाहणें । चोरूनियां असणें । ना पाहे तरी कोणें । काय पाहिलें ? ॥ ७-२०२ ॥

तैसे ची पाहणे 

आणि न पाहणे 

सांगा लपवणे

होते काय ॥४३५

आणिक जर का 

म्हणाल पाहिले 

काय ते कुठले 

कोणी बरे॥४३६

दिसत्यानें दृश्य भासे । म्हणावें ना देखिलें ऐसें । तरी दृश्यास्तव दिसे । ऐसें नाहीं ॥ ७-२०३ ॥

जर का दिसते

दृश्य त्या द्रष्ट्याला

जावे म्हणायला

तेही नाही ॥४३७

सारे काही तया

दृश्यामुळे दिसे 

बोलणे हे जसे 

चुकीचेच ॥४३८

पाहता कारण 

द्रष्ट्याहून भिन्न 

सत्ता दृष्याला न

अन्य काही ॥४३९

दृश्य कीर दृष्टीसी दिसे । परी साच कीं द्रष्टा असे । आतां नाहीं तें कैसें । देखिलें होये ? ॥ ७-२०४ ॥

दृश्यालागी द्रष्टा 

ऐसेची दिसते 

खात्रीने भासते 

पाहू जाता ॥४४०

परी येथे जर 

असतो द्रष्टाच

दृश्य ते नाहीच  

अस्तित्वात ॥४४१

तर मग इथे 

जे काही दिसले 

तया ते पाहिले 

म्हणावे का?॥४४२

मुख दिसो कां दर्पणीं । परी असणें कीं तये मुखपणीं । तरी जाली ते वायाणी । प्रतीति कीं ॥ ७-२०५ ॥ 

जैसे आरशात 

मुख दिसू येई 

मुकपणे राही 

मुखची ते ॥४४३

दर्पणी भासते 

खरे ते नसते 

मिथ्याच दिसते 

भासमान ॥४४४


🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

*****

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...