Monday 17 May 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १७१ ते १७५ (अभंग ३७०ते३७९)


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १७१ ते १७५ (अभंग ३७०ते३७९)  

🌺🌺🌺

ऐसें आपणया आपण । आपुलें निरीक्षण । करावें येणेंवीण । करितुचि असे ॥ ७-१७१ ॥

तेैसाची हा आत्मा
आपले आपण
करी निरीक्षण
सर्वकाळ ॥३७०

परंतु तयात
हेतू नाही काही
केवळ तो पाही
पाहण्यास॥३७१

ऐसें हें देखणें न देखणें । हें आंधरें चांदिणें । मा चंद्रासि उणें । स्फुरतें का ? ॥ ७-१७२ ॥

म्हणून देखणे
आणि न देखणे
आत्म्या नच जाणे
दोन्हीही तो ॥३७२

जैसा चंद्रा ठाई
अंधार प्रकाश
विषम हा भास
स्फुरेचीना ॥३७३

म्हणोनि हें न व्हावे । ऐसेंही करूं पावे । तरी तैसाचि स्वभावें । आयिता असे ॥ ७-१७३ ॥

म्हणुनी आपण
त्रिपुटी न व्हावे
अैसे जरी भावे
आत्मा जरी ॥३७४

तरी जैसा आहे
तैसा चि तो राहे
सिद्धची तो आहे
आयता रे॥३७५

द्रष्टा दृश्य ऐसें । अळुमाळु दोनी दिसे । तेंही परस्परानुप्रवेशें । कांहीं ना कीं ॥ ७-१७४ ॥

द्रष्टा दृश्य ऐसे
जरी किंचितसे
भाग दोन दिसे
कदा काळी ॥३७६

परी परस्परे
करुनी प्रवेशे
वस्तू एक असे
द्वैतातित ॥३७७

तेथें दृश्य द्रष्टां भरे । । द्रष्टेपण दृश्यीं न सरे । मा दोन्ही न होनि उरे । दोहींचें साच ॥ ७-१७५ ॥

जेव्हा दृश्य जाते
द्रष्टी वितळून
द्रष्टा हरवून
दृश्यामध्ये॥ ३७८

उरते ना कुणी
अभाव होवून
फक्त अधिष्ठान
एक मात्र   ॥३७९

🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...