Friday 21 May 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १९१ ते १९५ (अभंग ४११ते ४२१)

 

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १९१ ते १९५ (अभंग ४११ ते ४२१)  

🏵🏵🏵

 कीं अवघांचि करणीं । विषयांची घेणी । करितांचि येके क्षणीं । जें कीं आहे ॥ ७-१९१ ॥

अथवा सकल 

इंद्रिया कडून 

विषय ग्रहण 

होत असे ॥४११

परंतु मधले 

अस्पष्ट विषय 

स्थिती निरामय 

असे काही ॥४१२

एशिया क्षणात 

जाणीव असे का 

ती योग भूमिका 

शुद्ध तम ॥४१३


तयासारिखा ठावो । हा निकराचा आत्मभावो । येणें कां पाहों । न पाहों लाभे ? ॥ ७-१९२ ॥

अशा परी आहे 

येथील  रे ठाव 

शुद्ध आत्मभाव 

निकटचा ॥४१४

मग तया ठाई 

काय ते पहाणे

अन न पाहणे 

शक्य आहे॥४१५

कायी आपुलिये भूमिके । आरिसा आपुलें निकें । पाहों न पाहों शके । हें कें आहे ? ॥ ७-१९३ ॥

आपली भूमिका 

निर्मळ वा नाही 

आरसा का काही 

सांगू शके ॥ ४१६

तयाचे पाहणे 

किंवा न पाहणे 

असे अर्थाविणे

विधान हे॥४१७

कां समोर पाठिमोरिया । मुखें होऊं ये आरिसिया । वांचूनि तयाप्रति तया । होआवें कां ? ॥ ७-१९४ ॥ 

आरशासमोर 

किंवा पाठी मोरे 

संदर्भ हे सारे 

मुखालागी ॥४१८

काढता आरसा 

मुख ना सामोरे 

किंवा पाठमोरे 

स्वयमेव ॥४१९

सर्वांगें देखणा रवी । परी ऐसें घडे कवीं । जे उदोअस्तूंचीं चवी । स्वयें घेपे ? ॥ ७-१९५ ॥ 

नभी तळपतो 

सर्वांगी भास्कर 

तेजस्वी सुंदर 

प्रकाशाने ॥४२०

आपुला उदय 

आणिक अस्त 

नाहीच शकत 

पाहू कधी ॥४२१


🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com


No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...