Tuesday 18 May 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १८१ ते १८५ (अभंग ३८९ते ४००)

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १८१ ते १८५ (अभंग ३९० ते ४००)   
🌺🌺🌺

सिंधु पूर्वापर । न मिळती तंवचि सागर । मग येकवट नीर । जैसें होय ॥ ७-१८१ ॥ 

पूर्वेपश्चिमेचा 
म्हणती सागर 
एकत्र जोवर 
न मिळती  ॥३९०

मिळता एकत्र 
पाणीच निखळ 
भरले सकळ
ठायी दिसे॥३९१

बहुये हें त्रिपुटी । सहजें होतया राहटी । प्रतिक्षणीं काय ठी । करीतसे ? ॥ ७-१८२ ॥

अनंत त्रिपुटी 
घडती मोडती 
क्षणात दिसती 
एकाच रे ॥३९२

परी हरक्षणी 
तयाते पाहुनी 
राहावे मोजूनी
काय कोणी॥३९३

दोनी विशेषें गिळी । ना निर्विशिष्टातें उगळी । उघडीझांपी येकेंच डोळीं । वस्तुचि हे ॥ ७-१८३ ॥ 

द्रष्टा दृश्य भाव 
आत्मा न गिळतो 
किंवा न दावितो 
विशिष्टत्व ॥३९४

आत्म वस्तूचा 
सहजी स्वभाव 
संपूर्ण अभाव 
सर्वकाळी॥३९५

परी वस्तूवरी
घडते  मोडते
जणू की दिसते
एका डोळा ॥३९६

पातया पातें मिळे । कीं दृष्ट्ट्त्वें सैंघ पघळे । तिये उन्मळितां मावळे । नवलावो हा ॥ ७-१८४ ॥ 

डोळ्याच्या पात्याला 
लागताच पाते 
सृष्टी विस्तारते 
दृश्याची ही ॥३९७

जरा उघडते 
आणिक पाहते 
सृष्टी मावळते 
लगेच की ॥३९८

द्रष्टा दृश्याचा ग्रासी । मध्यें लेखु विकासी । योगभूमिका ऐसी । अंगीं वाजे ॥ ७-१८५ ॥ 

द्रष्टा आणि दृश्य 
यांचा होता ग्रास 
जी मध्यंतरास 
होई स्थिती ॥३९९

योग भूमिका हे
नाव त्या स्थितीला 
जाणावे  त्या वेळा
येत असे ॥४००

🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...