Monday 17 May 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १७६ ते १८० (अभंग ३८०ते ३८९)



अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १७६ ते १८० (अभंग ३८०ते ३८९)   

🌺🌺🌺

मग भलतेथ भलतेव्हां । माझारीले दृश्य-द्रष्टाभावा । आटणी करीत खेंवा । येती दोन्ही ॥ ७-१७६ ॥

मग हवे तिथे 

आणि हवे तेव्हा 

दृश्य दृष्टा भावा

आटवूनी ॥३८०

मध्य स्वरूपात 

एकत्र येऊन 

जातात होऊन 

एक रूप॥३८१

कापुरीं अग्निप्रवेशु । कीं अग्नि घातला पोतासु । ऐसें नव्हे संसरिसु । वेंचु जाला ॥ ७-१७७ ॥ 

जरी का प्रवेश 

अग्नि कापुरात 

कापूर अग्नीत 

करतात ॥३८२

दोहोचाहीअर्थ 

एकच तो होतो 

दोघांचाही होतो 

वेचू येथे॥३८३

येका येकु वेंचला । शून्य बिंदु शून्यें पुसिला । द्रष्टा दृश्याचा निमाला । तैसें होय ॥ ७-१७८ ॥

एकातुन एक 

जर वजा केला 

शून्यची उरला 

होतो मागे ॥३८४

तैसे दृश्य दृष्टा 

वजाबाकी तुन 

अभाव उरून 

राहतसे॥३८५

किंबहुना आपुलिया । प्रतिबिंबा झोंबिनलिया । झोंबीसकट आटोनियां । जाईजे जेवीं ॥ ७-१७९ ॥ 

किंवा इथे कोणी 

प्रतिबिंब मिठी 

मारावया उठी 

दुजे पणे ॥३८६

तर तयाच्या त्या 

मिठीच्या सोबत 

प्रतिबिंब बात 

हरपते॥३८७

तैसें रुसता दृष्टी । द्रष्टा दृश्य भेटी । येती तेथें मिठी । दोहींची पडे ॥ ७-१८० ॥ 

तयापरी इथे 

सरता दर्शन 

दृश्य दृष्टा पण 

नाही होय ॥३८८

दर्शनी नसते 

दृश्य  दृष्टापण 

वेगळे होऊन 

कदा काळी ॥३८९

🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

+++++(

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...