Tuesday 11 May 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १३६ ते १४० (अभंग ३०२ते३११)


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  १३६ ते १४० (अभंग ३०२ते३११)   

गुंफिवा ज्वाळांचिया माळा । लेइलियाही अनळा । भेदाचिया आहाळां । काय पडणें आहे ? ॥७-१३६ ॥ 

ज्वालेचे ते हार 

घालुनीया गळा 

म्हणता अनळा 

घेतले ते ॥३०२

परंतु तसेच 

असे अग्नी रूप 

भेदाचे ते रूप  

डोळीयांना ॥३०३

किं रश्मीचेनि परिवारें । वेढुनि घेतला थोरें । तरी सूर्यासि दुसरें । बोलों येईल ? ॥ ७-१३७ ॥

किंवा किरणांचा 

वेढे परिवार 

सूर्याशी चौफेर 

दाटुनिया ॥३०४

तरी सूर्याहून 

वेगळे ते आण 

येतसे दिसून 

सांगा तिथे ॥३०५


चांदणियाचा गिंवसु । चांदावरी पडिलिया बहुवसु । काय केवळपणीं त्रासु । देखिजेल ? ॥ ७-१३८ ॥ 

विपुल चांदणे 

पांघरतो शशी 

परी एकत्वासी 

मुकेची ना ॥३०६

जरी चांदण्याचे

बहुत दाटणे 

तया उबगणे 

नाही तया ॥३०७

दळाचिया सहस्रवरी । फांको आपुलिया परी । परी नाहीं दुसरी । भास कमळीं ॥ ७-१३९ ॥

सहस्त्र दळांनी 

फुलते अंबर 

दिसते सुंदर 

लोभसते ॥३०८

परी का वेगळे 

दलाहून रे ते 

एकच असते 

सुंदरसे ॥३०९

सहस्रवरी बाहिया । आहाती सहस्रर्जुना राया । तरी तो काय तिया । येकोत्तरावा ? ॥ ७-१४० ॥

सहस्त्र बाहूंनी 

सहस्त्र अर्जुन 

दिसतो शोभून 

महारथी ॥३१०

परी का वेगळा 

त्या हाताहूनी तो 

एकच असतो 

नाही काय॥३११

🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...