Thursday 6 May 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १२१ ते१२५ (अभंग २७२ते२८६)

    
अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  १२१ ते१२५ (अभंग २७२ते२८६)   

121 
आपुलेंचि दृश्यपण । उमसो न लाहे आपण । द्रष्टत्वा कीर आण । पडली असतां ॥ ७-१२१ ॥

यया लागी ऐसे 
असे हे सांगणे 
विधान खोडणे 
घडे इथे ॥२७२

अहो जया लागी 
आपले आपण 
हे ही नाही आण 
कधीकाळी ॥२७३

तयालागि मग
दृष्टत्व ते कैसे 
कोण कोणा कैसे 
पाहत असे ॥२७४

122 
कोणा कोण भेटे ? । दिठी कैंची फुटे ? । ऐक्यासकट पोटें । आटोनि गेलीं ॥ ७-१२२ ॥

कोण कुणाची रे 
घेत असे भेटी 
पाहतसे दृष्टी 
कोण कोणा ॥२७५

पाहण्या बोलण्या 
लागे दुजे पण 
इथे एक पण 
आटो गेले ॥२७६

123  
येव्हढेंही सांकडें । जेणें सारोनि येकीकडे । उघडिलीं कवाडें । प्रकाशाचीं ॥ ७-१२३ ॥

ऐसे विलक्षण 
कळण्या कठीण 
ऐश्वर्यसंपन्न 
तत्व होणे ॥२७७

सारे मोठेपण 
दूर ते सारून 
होय अवतीर्ण 
समोरच ॥२७८

उघडून द्वारे 
प्रकाश पसरे 
सारले अंधारे 
पूर्ण त्याने ॥२७९

आपणचि झाला 
सर्व की नसून 
दृश्यादी दर्शन 
नटलेला ॥२८०

124 
दृश्याचिया सृष्टी । दिठीवरी दिठी । उठलिया तळवटीं । चिन्मात्रची ॥ ७-१२४ ॥

दृश्यावर दृश्य 
उमटते सृष्टी 
परी असे अंती 
एक रूप ॥२८१

दृष्टा नि दर्शन 
एकच होऊन 
घेतसे पाहून  
आपणाला ॥२८२

ज्ञाना वरी ज्ञान 
होतसे उत्पन्न 
तया अधिष्ठान 
चिन्मय चि ॥२८३

125
दर्शनऋद्धि बहुवसा । चिच्छेषु मातला ऐसा । जे शिळा न पाहे आरिसा । वेद्यरत्नाचा ॥ ७-१२५ ॥ 

अश्या दर्शनाच्या 
निर्मिती क्षणांत 
आनंद भरात 
रमुनिया ॥२८४

चैतन्य प्रबळ 
होऊन तरल 
क्षणात केवळ 
स्थिरावले ॥२८५

ज्ञानाचा तो  द्वैत 
आरसा ही शिळा  
गमे पाहायला 
मग तया.॥२८६


🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com


No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...