Thursday 20 May 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १८६ ते १९० (अभंग ४०१ते ४१०)



अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १८६ ते १९० (अभंग ४०१ते ४१०)   
🌸🌸🌸🌸
उठिला तरंगु बैसे । पुढें आनुही नुमसे । ऐसा ठाईं जैसे । पाणी होय ॥ ७-१८६ ॥

पाण्यात तरंग 
एक उमटला
अन् मावळला 
हलकेच ॥४०१

परंतु  दुसर्‍या
तरंगा वाचून 
निवांत होऊन 
पाणी असे  ॥४०२

 कां नीद सरोनि गेली । जागृती नाहीं चेयिली । तेव्हां होय आपुली । जैसी स्थिति ॥ ७-१८७ ॥

अथवा संपली
निज ती गहन
जागृती येवून
ठेपतसे॥४०३

अशी जी असते 
निश्चल अवस्था
उठता उठता
काही क्षण॥४०४

 नाना येका ठाऊनि उठी । अन्यत्र नव्हे पैठी । हे गमे तैशिया दृष्टी । दिठी सुतां ॥ ७-१८८ ॥

एका वस्तूवर 
नुकतीच होती
दुसरी वरती
बसली ना ॥४०५

ऐशिया संधीत  
दृष्टी जी असते 
तिजला कळते
भुमिका ही ॥४०६

 कां मावळो सरला दिवो । रात्रीचा न करी प्रसवो । तेणें गगनें हा भावो । वाखाणिला ॥ ७-१८९ ॥ 

दिवस ढळला 
रात्री न पडली  
अश्या संधिकाळी
गगण जे ॥४०७

तयाचा भाव तो
असे मी वर्णिला 
आत्म्याच्या स्थितीला 
जोडूनिया  ॥४०८

घेतला स्वासु बुडाला । घापता नाहीं उठिला । तैसा दोहींसि सिवतला । नव्हे जो अर्थु ॥ ७-१९० ॥

घेतला श्वास नि 
बाहेर टाकला 
परंतु पुढला 
न ये तव ॥४०९

दोघांही अस्पर्श 
प्राणाची जी गती  
सहज असती 
वेगळीच ॥४१०

{इया संधिमध्ये 
साठलेले सार 
शब्दांच्या जे पार 
पाहू जावे }

🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...