Thursday 27 May 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २१६ते २२० (अभंग ४६६ते ४७७)

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २१६ते २२० (अभंग ४६६ते ४७७) 

म्हणोनि आपणापें द्रष्टा । न करितां असें पैठां । आतां जालाचि दिठा । कां न करावा ॥ ७-२१६ ॥

म्हणुनी आपणा

आपण तो द्रष्टा 

नच करी द्रष्टा 

कधीकाळी ॥४६६

स्वयंसिद्ध आत्मा 

आपल्या ठिकाणी 

मायेत आणून 

ठेवावा का॥४६७

नाना मागुतें दाविलें । तरी पुनरुक्त जालें । येणेंहि बोलें गेलें । दावणें वृथा ॥ ७-२१७ ॥

तेच तेच जर 

पुन्हा दाखवले 

पुनरुक्त झाले 

म्हणतात ॥४६८

तेसे द्रष्टा पण 

आणिक दर्शने

विशद करणे 

व्यर्थ इथे ॥४६९

आत्मा नित्य द्रष्टा 

दृश्याच्या वाचून 

हीच मूळ खूण

जाणावी ती॥४७०

दोरासर्पाभासा । साचपणें दोरु कां जैसा । द्रष्टा दृश्या तैसा । द्रष्टा साचु ॥ ७-२१८ ॥ 

जरी दोरी भासे 

सर्पाकार इथे 

मूळ दोरी तिथे 

परी असे ॥४७१

तयापरी येथे 

द्रष्टा आणि दृश्य 

यात आभास 

दृश्य होय ॥४७२

अणिक द्रष्टाच 

एकच हे सत्य 

हाची तो प्रत्यय 

येत असे॥४७३

दर्पणें आणि मुखें । मुख दिसे हें न चुके । परी मुखीं मुख सतुकें । दर्पणीं नाहीं ॥ ७-२१९ ॥ 

दर्पणा समोर 

आणताच मुख 

दिसतसे मुख 

तयामध्ये ॥४७४

परंतु जेधवा 

दर्पण नसते 

मुखचि असते 

मुख पणे॥४७५

तैसे द्रष्टा दृश्या दोहों । साच कीं देखता ठावो । म्हणौनि दृश्य तें वावो । देखिलें जर्ही ॥ ७-२२० ॥

 दृश्य दृष्टा ऐसे 

दिसे विभाजन 

दोन ते होऊन 

या समान ॥४७६

परी पाहू जाता 

दृश्य ते असत्य 

द्रष्टा फक्त सत्य 

जाणावे पा ॥४७७

🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...