Friday 28 May 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २२१ते २२५ (अभंग ४७८ते ४८८)


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २२१ते २२५ (अभंग ४७८ते ४८८)

🌺🌺🌺

वावो कीर होये । तर्ही दिसत तंव आहे । येणें बोलें होये । आथी ऐसें ॥ ७-२२१ ॥

(येथे एक शंका
पूर्वपक्ष मांडे
तियेते सिद्धांते
विवरीले ) ॥४७८॥

जर का दिसतं
आहे दृश्य इथे
म्हणावे ते खोटे
कैसे मग ॥४७९

या लागी दृश्याला
मानावेच लागे
सत्याचिया भागे
सम इथे ॥४८०

तरी आन आनातें । देखोन होय देखतें । तरी मानूं येतें देखिलें ऐसें ॥ ७-२२२ ॥

दोन पदार्थात
एकाने पाहिले
दुज्याला म्हटले
मिथ्या जरी॥४८१

मग त्या दृश्यात
पहिला जाहला 
अरे पाहणारा
नसूनी ही॥४८२

येथें देखोनि कां न देखोनि । ऐक्य कां नाना होऊनि । परि हा येणेंवाचूनि । देखणें असे ? ॥ ७-२२३ ॥

ऐसी या स्थितीत
जर का पाहणे
किंवा न पाहणे
कोणी कोणा ॥४८३

एक पणे असे
किंवा भिन्न भासे
तोचि तोही असे
एकमेव ॥४८४

आरिशानें हो कां दाविलें । तरी मुखचि मुखें देखिलें । तो न दावी तरी संचलें । मुखचि मुखीं ॥ ७-२२४ ॥

जरी का दाविले
मुख आरशाने
बिंबुनि बिंबाने
प्रतिबिंब ॥४८५

परंतु मुखची
मुखाच्या ठिकाणी
असे एकत्वानी
पाहू जाता॥४८६

तैसें दाविलें नाहीं । तरी हाचि ययाचा ठाईं । ना दाविला तरीही । हाचि यया ॥ ७-२२५ ॥

तया परी जगी 
न दाविला तया
तरी तया ठाया
तोच असे ॥४८७

अथवा दाविला
दृश्यात आणीला
तरी एकत्वाला
भंग नाही॥४८८

🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...