Thursday 13 May 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १५१ ते १५५ (अभंग ३२९ते३३६)



अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  १५१ ते १५५ (अभंग ३२९ते३३६)   

🌸🌸🌸🌸

पातयाचि मिठी । पडलिया कीजे दिठी । आपुलेचि पोटीं । रिगोनि असणें ॥ ७-१५१ ॥ 

मिटता पापण्या 

दृष्टी वळे आत 

आपल्या पोटात 

रिगोनिया॥३२९

कां नुदेलिया सुधाकरु । आपणपें भरे सागरु । ना कूर्मी गिली विस्तारु । आपेंआप ॥ ७-१५२ ॥

उगवण्या आधी 

नभी सुधाकर 

पूर्ण रत्नाकर 

आपल्यात ॥३३०

अथवा कासवी 

आपल्या मर्जीनं

देह आक्रसून 

आत घेते ॥३३१

अवसेचिये दिवसीं । सतराविये अंशीं । स्वयें जैसें शशी । रिगणें होय ॥ ७-१५३ ॥ 

अवसेच्या दिशी 

सतरावी कला 

चंद्र स्वरूपाला 

मूळ जाये॥३३२


तैसें दृश्य जिणतां द्रष्टे । पडले जैताचिये कुटे । तया नांव वावटे । आपणपयां ॥ ७-१५४ ॥ 

जिंकूनिया दृश्य 

द्रष्टा बने जेता 

परंतु पाहता 

आवो असे ॥३३३

जिंकण्या चा आळ

असे ओहटणे 

स्वरूपी असणे 

मूळच्याच॥३३४

सहजें आघवेंचि आहे । तरी कोणा कोण पाहे ? । तें न देखणेंचि आहे । स्वरूप निद्रा ॥ ७-१५५ ॥

अवघे सहज 

जर येथे आहे 

कोण कोणा पाहे 

मग सांग ॥३३५

निखळ पाहणे 

पाहण्या वाचून 

टाळल्या वाचून 

योग निद्रा॥३३६


🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com


No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...