Sunday 9 May 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १३१ ते १३५ (अभंग २९२ते३०१)

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  १३१ ते १३५ (अभंग २९२ते३०१)   
**********:

एवं ज्ञानाज्ञान मिठी । तेंही फांकतसे दिठी । दृश्यपणें ये भेटी । आपणपयां ॥ ७-१३१ ॥ 

ज्ञान अज्ञानाची 
पडताच मिठी 
दिसू येते दीठी 
वेगळाले ॥२९२

परि ते अवघे 
चिन्मात्रचि रूप 
आपणास आप 
पाहत असे ॥२९३

तें दृश्य मोटकें देखें । आपण स्वयें दृष्टत्वें तोखे । तेंचि दिठीचेनि मुखें । माजीं दाटे ॥ ७-१३२ ॥

पाहुनिया दृश्य 
दृष्टा हो संतुष्ट 
मग ते घटित 
ऐसे काही ॥२९४

परी ते पाहणे 
आणिक पाहता 
परमात्म सत्ता 
एक होई॥२९५

तेव्हां घेणें देणें घटे । परी ऐक्याचें सूत न तुटे । जेवीं मुखीं मुख वाटे । दर्पणें केलें ७-१३३ 

दिल्या घेतल्याची 
जरी दिसे कृती 
एकपणा तुटी 
परी नाही ॥२९६

दर्पणी पाहता 
आपला चेहरा
होत ना वेगळा
जरी वाटे ॥२९७

अंगें अंगवरी पहुडे । चेइला वेगळा न पडे ।तया वारुवाचेनि पाडें । घेणें देणें ॥ ७-१३४ ॥ 

उभेपणी निद्रा 
जरी घोडा घेई
जग तया पाही
उभा ची तो ॥२९८

तया परी सारे 
घडे व्यवहार 
जगाचा व्यापार 
तयातच॥२९९

पाणी कल्लोळाचेनि मिसें । आपणपें वेल्हावे जैसें । वस्तु वस्तुत्वें खेळों ये तैसें । सुखें लाहे ॥ ७-१३५ ॥ 

कल्लोळाच्या मिषे 
खेळतसे पाणी 
आपण होऊनी 
दोन भागी ॥३००

तया परी वस्तू 
क्रीडा करे काही 
अनुभवास येई  
जाणत्याला ॥३०१

🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...