Saturday 15 May 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १६६ ते १७० (अभंग ३६१ते३६९)


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  १६६ ते १७० (अभंग ३६१ते३६९)   

🏵🏵🏵🏵



किळेचें पांघरुन । आपजवी रत्न कोण ? । कीं सोने ले सोनें पण । जोड जोडूं ? ॥ ७-१६६ ॥

रत्नावर कुणी 

प्रभा आवरण 

देतसे घालून 

येउनिया ॥३६१

किंवा सोन्यावर 

सोने पांघरून 

जातसे निघून 

काही कोण ॥३६२

तयाचे ते गुण 

असती अभिन्न 

तयात राहून 

सर्वकाळी॥३६३

चंदन सौरभ वेढी ? । कीं सुधा आपणया वाढी ? । कीं गूळ चाखे गोडी ? । ऐसें आथी हें ? ॥ ७-१६७ ॥ 

चंदन पांघरे 

काय सुगंधाला 

अमृत स्वतःला 

वाढतसे ॥३६४

गुळ चाखतसे 

आपुलीच गोडी 

काय अशा गोष्टी 

आहे इथे ॥३६५


कीं उजाळाचे किळे । कापुरा पुटीं दिधलें ? । कीं ताऊन ऊन केलें । आगीतें काई ? ॥ ७-१६८ ॥ 

उजाळाचा लेप 

कापुरा लाविला 

तापवून केला 

अग्नी उष्ण॥३६६

ना ना ते लता । आपुले वेली गुंडाळितां । घर करी न करितां । जयापरी ॥ ७-१६९ ॥ 

वेल वेलीलाच 

जैसी का गुंडाळे

घर ते वेगळे 

करीचि ना ॥३६७


कां प्रभेचा उभला । दीपप्रकाश संचला । तैसा चैतन्यें गिंवसला । चिद्रूप स्फुरे ॥ ७-१७० ॥ 

प्रभेने आपुल्या

दीप उजळतो 

प्रकाश करतो 

सर्वत्र गा   ॥३६८

व्यापुनिया सारे

चैतन्य संपूर्ण 

चिद्रुप स्फुरण 

होत असे ॥३६९


🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com


🌺🌺🌺

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...