Sunday 2 May 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १०६ ते११० (अभंग २३४ते२४७)


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  १०६ ते११० (अभंग २३४ते२४७)   

🌼🌼🌼

१०६

 निमालीही नीद देखे । तो सर्वज्ञ येवढें काय चुके ? । परी दृश्याचिये न टेके । सोईं जो ॥ ७-१०६ ॥

ओसरली निद्रा 

जो की पाहू ठाके 

सर्वज्ञ तो चुके 

काय इथे ॥२३४

निद्रा स्वप्न आणि 

जागृत अवस्था 

यांचा जो तत्वता 

साक्षी असे ॥२३५

परी अंती त्याही 

मिथ्याचि असती 

तया विटाळति 

नच कधी ॥२३६

107 

जो वेद काय काय न बोले । परी नांवचि नाहीं घेतलें । ऐसें कांहीं जोडिलें । नाहीं जेणें ॥ ७-१०७ ॥ 

वेदे बोलायचे

ठेविले न काही 

नाव नच घेई

परी याचे ॥२३७

म्हणजे हा आत्मा 

अमुक असावा 

ऐसा काही दावा 

करी ना तो ॥२३८

108 

सूर्यो कोणा न पाहे ? । परि आत्मा दाविला आहे ? । गगनें व्यापिता ठाये । ऐसी वस्तु ॥ ७-१०८ ॥

अवघे जगत 

करी प्रकाशित 

घेतसे दृष्टीत

सुर्य जरी ॥२३९

परी आत्मा तया 

न ये दाखवता 

हा ऐसा म्हणता

कधीकाळी ॥२४०

नभ व्यापू जाता 

तया त्या अमिता 

होतसे थांबता 

थकुनिया ॥२४१


109

देह हाडांची मोळी । मी म्हणोनि पोटाळी तो अहंकारु गाळी । पदार्थु हा ॥ ७-१०९ ॥

 देहरूपी असे 

हाडांची ही मोळी 

तियेला सांभाळी 

अहंकार ॥२४२

सुक्ष्म नि व्यापक 

जयाचे असणे 

विश्व चालवणे 

एके हाती ॥२४३

परी तयालाही 

होत शक्य काही 

हात लावणे ही 

या पदार्था ॥२४४

110

बुद्धि बोद्ध्या सोके । ते येव्हडी वस्तु चुके । मना संकल्प निके । याहीहुनि ॥ ७-११० ॥

 बुद्धी सहजीच 

सारे जाणतसे 

विषय हा असे 

त्याज्य जीस॥२४५

यया वस्तू लागे

ती ही चुकतसे 

नच जाणतसे 

उणी पडे ॥२४६

मनाचे संकल्प 

असंख्य अनंत 

तो ही मूक होत 

असे येथे ॥२४७

🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...