Friday 14 May 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १५६ ते १६० (अभंग ३३६ते३४९)



अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  १५६ ते १६० (अभंग ३३६ते३४९)   

🌸🌸🌸


नाना न देखणें नको । म्हणे मीचि मातें देखो । तरी आपेंआप विखो । अपैसें असे ॥ ७-१५६ ॥

असे व्यवहारी 

नको ते पाहणे 

द्वैतात खेळणे 

उगाचच ॥३३७

आपण आपणा 

पाहू जावे म्हणे 

रिघोनिया ज्ञाने 

वाटे जरी ॥३३८

आत्मस्थितीत त्या

ज्ञान व्यवहार 

करू जावे तर 

तोच इथे॥३३९

जें अनादिच दृश्यपणें । अनादिच देखणें । हें आतां कायी कोणें । रचूं जावें ? ॥ ७-१५७ ॥

अनादि जो असे 

इथे दृष्य पणे 

अनादि देखणे 

होऊनिया ॥३४०

दृश्य आणि दृष्टा

मिळून दर्शन 

एकच होऊन 

परमात्मा ॥३४१

तयात भेदाची 

करणे रचना 

ठरते वल्गना 

अशक्यशी ॥३४२


अवकाशेशीं गगना । गतीसीं पवना । कीं दीप्तीसीं तपना । संबंधु कीजे ? ॥ ७-१५८ ॥ 

जैसे गगनाचे 

अवकाशी नाते 

गती पवनाते 

एक रूप ॥३४३

अग्नि प्रकाशाचा 

संबंध मुळचा 

काय करायचा 

प्रस्थापित ॥३४४

अहो ते तसेच 

आहे मुळातून

कोणी का करून  

देतो नवे॥३४५


विश्वपणें उजिवडे । तरी विश्व देखे फुडें । ना तें नाहीं तेव्हढें । नाहींची देखे ॥ ७-१५९ ॥ 

विश्व रूपे विश्व 

जेधवा प्रकाशे

तया पाहतसे 

तेच असे ॥३४६

आणिक हे विश्व 

होताच नाहीसे 

नाही पणे तसे 

तोच आहे॥३४७

विश्वाचें असे नाहीं । विपायें बुडालियाही । तर्ही दशा ऐसिही । देखतचि असे ॥ ७-१६० ॥ 

विश्वाचे असणे

आणिक नसणे 

दोन्ही हे घडणे 

बुडताच ॥३४८

त्या ही त्या स्थितीला 

असे पाहणारा 

किंवा जाणारा 

एकमेव॥३४९


🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

+++++++++

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...