Saturday 22 May 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १९६ ते २०० (अभंग ४२२ ते ४३२)

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १९६ ते २०० (अभंग ४२२ ते ४३२)  
🌸🌸

कीं रसु आपणिया पिये ? । कीं तोंड लपऊनि ठाये ? । हें रसपणें नव्हे । तया जैसें ॥ ७-१९६ ॥

रस का स्वतःला 

घेतसे पिऊन 

किंवा लपवून 

मुख बसे ॥४२२

रस स्वभावतः 

असे रसपणे

दोन्ही बोलणे 

तिथे व्यर्थ॥ ४२३

तैसें पाहणें न पाहणें । पाहणेंपणेंचि हा नेणे । आणि दोन्ही हें येणें । स्वयेंचि असिजे ॥ ७-१९७ ॥

तेैंसी ची पाहणे 

आणि न पाहणे 

असून पाहणे 

घडेची ना ॥४२४

जरी का पाहतो 

तरी न पाहतो 

दोन्हीही असतो 

आपणच॥४२५

जें पाहणेंचि म्हणौनियां । पाहणें नव्हे आपणयां । तैं न पाहणें आपसया । हाचि आहे ॥ ७-१९८ ॥

पाहणेच घडे 

जर निरंतर 

पाहणारा येर  

कुठून ये ॥४२६

म्हणुनिया वस्तू 

पाही आपणास 

यया बोलण्यास 

वाव नाही॥४२७

आणि न पाहणें मा कैसें । आपणपें पाहों बैसे ? । तरी पाहणें हें ऐसें । हाचि पुढती ॥ ७-१९९ ॥ 

द्वैताच्या अभावी 

कोण कोणा पाही

जाणे तो स्वतःही 

मग कैसे ॥४२७

नित्य ज्ञानाचे ते 

असते स्वरूप 

तया का रूप 

पाहू जाणे ४२९

(ज्ञानाच्या ठिकाणी

ज्ञानच चोखळ 

असते केवळ 

सर्व व्याप्त)॥४३०

हीं दोन्ही परस्परें । नांदती एका हारें । बांधोनि येरयेरें । नाहीं केलें ॥ ७-२०० ॥ 

दोघे परस्पर 

एकाच पंगती 

एकत्र नांदती 

सर्वकाळ ॥४३१

अन येरयेरा 

बांधून घेऊन 

जातात संपून 

आत्म ठायी ॥४३२

🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

****

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...