Tuesday, 29 September 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , ११ ते १५ (अभंग २१ते ३२) **********

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , ११ ते १५ (अभंग २१ते ३२)
 **********

तरी निठितां दुजें । जैं अज्ञान आहे बिजें । तैं तेचि आथी हे बुझे । कोण येथें ? ॥ ७-११ ॥ 
११
आत्म्याच्या ठिकाणी 
द्वैताची उत्पत्ती 
काय होण्याआधी  
अज्ञानसे ॥२१॥
 जरी तया जाणे 
नीटपणे पाहे 
ऐसा कोण आहे 
उपस्थित ॥२२॥

अज्ञान तंव आपणयातें । जडपणें नेणे निरुतें । आणि प्रमाण प्रमाणातें । होत आहे ? ॥ ७-१२ ॥ 

अज्ञाना अज्ञान 
कैसे सांग जाणे 
असे जडपणे 
सर्वांथे  जे ॥२३॥
आणिक घडेल 
कैसे ते प्रमाण 
सिद्ध जे प्रमाण 
स्वयं त्यास  ॥२४॥

या लागिं जरी अज्ञान । करील आपुलें ज्ञान । हें म्हणत खेंवो घेववी मौन । विरोधुचि ॥ ७-१३ ॥ 
म्हणालं जरी का 
करीन हे अज्ञान 
आपलेच ज्ञान 
नीटपणे ॥२५॥
विरोधा आभास
 तरी तयाहून 
दिसे अन्य न 
मज इथे  ॥२६॥

म्हणूनिया उगा 
होऊनिया मौन 
 राहतो बसून
गुपचूप ॥२७॥

आणि जाणति वस्तु येक । ते येणें अज्ञानें कीजे मूर्ख । तैं अज्ञान हे लेख । कवण धरी ? ॥ ७-१४ ॥ 
१४
परमात्मा असे 
वस्तू एकमेव 
जाण्याची ठेव 
अंतरात ॥२८॥
काय ते अज्ञाने 
होय ज्ञान शून्य 
ऐसे हे बोलण
व्यर्थ वाटे॥२९॥
अज्ञान वर्णन 
करावया कोण 
इथे रे असेन  
सांग बरे ॥३०॥

अहो आपणयाहि पुरता । नेणु न करवे जाणता । तयातें अज्ञान म्हणतां । लाजिजे कीं ? ॥ ७-१५ ॥ 
१५

जयाच्या आश्रयी
राहील अज्ञान 
तया शुन्य न  
करू शके ॥३१॥
मग ती तयास 
कसली रे लाज 
अज्ञान हि गाज 
मिरविण्या ॥३२॥


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
  https://amrutaanubhav.blogspot.com

Monday, 28 September 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , ६ते १०(अभंग ११ते २०) **********

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , ६ते १०(अभंग ११ते २०) **********

आणि ज्ञान हें जें म्हणिजे । तें अज्ञानचि पां दुजें । येक लपऊनि दाविजे । येक नव्हे ? ॥ ७-६ ॥ 

असो आतां या प्रस्तावो । आधीं अज्ञानाचा धांडोळा घेवों । मग तयाच्या साचीं लाहो । ज्ञानचि लटिकें ॥ ७-७ ॥ 

या अज्ञान ज्ञानातें । आंगींचि आहे जितें । तरी जेथें असे तयातें । नेण कां न करी ? ॥ ७-८ ॥ 

अज्ञान जेथ असावें । तेणें सर्वनेण होआवें । ऐसी जाती स्वभावें । अज्ञानाची ॥ ७-९ ॥ 

तरी शास्त्रमत ऐसें । जे आत्माचि अज्ञान असे । तेणेचि तो गिंवसे । आश्रो जरी ॥ ७-१० ॥  

६.
खरेतर ज्ञान 
म्हणजे अज्ञान 
दुनिया रूपानं 
प्रकटले ॥११॥

लपवून एक 
काढता दुसरे 
दिसते वेगळे 
नाही जैसे ॥१२॥
ज्ञानाच्या प्रस्ता वो
आता जरा राहो 
धांडोळा तो होवो
अज्ञानाचा ॥१३॥

अज्ञाना पाहता 
नीटस ते इथे 
ज्ञान ही लटके 
कळो येई.॥१४॥
अज्ञान ज्ञानाच्या 
अंगी आहे जिते
दृष्टीसही येते
जरी इथे ॥१५॥

असे हे अज्ञान 
परेसी वसते 
त्या का न मग ते  
हरपते॥१६॥
अज्ञानाची वस्ती 
जिथे जेव्हा होते 
ज्ञानाचा करते 
लोप तिथे ॥१७॥

ऐसा हा स्वभाव 
असे अज्ञानाचा 
परिचय याचा 
जगतास ॥१८॥
१०
आत्मरुपावरी 
अज्ञान असते 
शास्त्रही सांगते 
संमतीने ॥१९॥

जणुं झाकलेला 
आत्मा अज्ञानाने 
तम आश्रयाने 
रजनीच्या ॥२०॥

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
  https://amrutaanubhav.blogspot.com

Sunday, 27 September 2020

प्रकरण सातवें अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १ते ५(अभंग १ते १०) **********

प्रकरण सातवें  अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १ते ५(अभंग १ते १०) **********

येर्हवीं तरी अज्ञाना । जैं ज्ञानाची नसे क्षोभणा । 
तैं तरि काना । खालींच दडे ॥ ७-१ ॥ 


अज्ञाना ज्ञानाचा 
नसता आधार 
कैसा ये आकार 
तयास तो ॥१॥

का त्यात आकार 
असे दडलेला 
पाही तो तयाला 
दृश्य होय ॥२॥

अंडसोनि अंधारीं । खद्योत दीप्ति शिरी । तैसें लटिकेंवरी । अनादि होय ॥ ७-२ ॥ 


अंधार आधार 
काजव्या अपार 
दीप्ती तयावर 
शोभे मात्र ॥३॥

(असून लटके 
विश्वि या भासते 
अनादि नटते 
अज्ञान ते ॥४॥)

तैसे जगी खोटे 
आभासी सजते 
अनादि दिसते 
अज्ञान ते ॥४॥
जैसी स्वप्ना स्वप्नीं महिमा । तमीं मानु असे तमा । 
तेवीं अज्ञाना गरिमा । अज्ञानींचि ॥ ७-३ ॥ 

स्वप्न जैसे सत्य 
वाटते स्वप्नात 
तमा ये तमात 
मोठेपण ॥५॥

तेवी अज्ञानाची 
थोरवी अज्ञानी 
घ्यावी जाणुनी 
नीटपणे ॥६॥
4
कोल्हेरीचे वारु । न येती धारकीं धरूं । 
नये लेणा श्रृंगारूं । वोडंबरीचा ॥ ७-४ ॥ 

मृतिकेचा अश्व 
घडवी कुंभार
तयावर स्वार 
होता न ये ॥७॥

सुवर्ण दागिने 
करी जादूगर 
परी अंगावर 
लेता न ये.॥८॥

5
हें जाणणेयाच्या घरीं । खोंचिलेंहि आन न करी । 
काई चांदिणां उठे लहरी । मृगजळाची ? ॥ ७-५ ॥ 

मृगजळ लाटा 
काय चांदण्यात 
सांग दिसतात 
वाहतांना ॥९॥

ऐसे हे अज्ञान
ज्ञानाच्या घरास 
येता मुक्कामास 
नाही होय .॥१०॥

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
  https://amrutaanubhav.blogspot.com

Thursday, 24 September 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या , १०१ते १०३(अभंग १९७ते २०६) ***********अध्याय संपूर्ण.

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या , १०१ते १०३(अभंग १९८ते २०६)

 ***********
तैसीं निरर्थकें जल्पें । होउनियां सपडपें । शोभती जैसें लेपे । रंगावरी ॥ ६-१०१ ॥

तैसे शब्द इथे 
होय निरर्थक 
सवे सहाय्यक 
तयाच्या ते॥ १९८॥

जैसी भिंतीवर 
रंगवलेली चित्रे
बहुत विचित्रे 
जीव नाही॥१९९॥

 एवं शब्दैकजीवनें । बापुडीं ज्ञानें अज्ञानें । साचपणें वनें । चित्रींचीं जैसीं ॥ ६-१०२ ॥ 

शब्द हेच ज्याचे
असती जीवन 
ज्ञान व अज्ञान
बापुडे ते ॥ २००॥

जितके खरे ते 
चित्रातील वन 
त्याचे खरे पण
तितकेच ॥२०१॥

या शब्दाचा निमाला । महाप्रळयो हो सरला । अभ्रासवें गेला । दुर्दिनु जैसा ॥ ६-१०३ ॥ 

शब्दांचा जेधवा 
कल्लोळ निमाला
प्रलय थांबला
महा थोर ॥२०२

उगाच दाटल्या 
मेघा ला घेऊन 
जातसे निघून
दुर्दिन जै ॥२०३॥

पडल्यावाचून 
उगाच दाटते 
मळभ भरते 
आकाशात ॥२०४॥

जाती ते निघून 
सुंदर हो दिन
प्रकाश भरून 
ओसंडतो ॥२०५॥

तैसे शब्दाधार 
ज्ञान व अज्ञान 
जाती हरवून 
शब्दांसवे ॥२०६॥

॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्‌अमृतानुभवे शब्दखंडनं नाम षष्ठम प्रकरणं संपूर्णम् ॥

Wednesday, 23 September 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या , ९१ते ९५(अभंग १८७ते १९७) ***********

 १९वा भाग
अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या , ९६ते १००(अभंग १९८ते २०७) 
***********
 
एवं माध्यान्हींची दिवी । तम धाडी ना दिवो दावी । तैसी उपभयतां पदवी । शब्दा जाली ॥ ६-९६ ॥ 

मध्यान्हीचा दिवा 
तम ना घालवी 
दिस ना पालवी 
कधीकाळी ॥१९८॥

तैसी या शब्दास 
उभय बाजूची 
काही कुठली ची 
ज्ञप्ती नाही॥१९९॥

आतां अविद्या नाहींपणें । नाहीं तयेतें नासणें । आत्मा सिद्धुचि मा कोणें । काय साधावें ? ॥ ६-९७ ॥ 

नसल्या अविद्ये
कैसे ते नाशणे 
कैसे हे घडणे 
असंभव ॥२००॥

आणि आत्मा येथे 
 अरे सदा सिद्ध 
तयाला प्रसिद्ध 
कोण करे ॥२०१॥

ऐसा उभय पक्षीं । बोला न लाहोनि नखी । हारपला प्रळयोदकीं । वोघु जैसा ॥ ६-९८ ॥ 

प्रलय उदयी
जैसा हरपला 
ओघ जो चालला 
पाणियाचा ॥२०२॥

तैसा दोन्ही बाजू 
न घडे प्रवेश 
तै शब्द आवेश 
ओसरला ॥ २०३॥

आतां बोला भागु कांहीं । असणें जयाच्या ठाईं । अर्थता तरि नाहीं । निपटुनियां ॥ ६-९९ ॥

जरी शब्द इथे 
काही उमटले 
आकारी दिसले 
व्यवस्थित ॥२०४॥

परी पाहू जाता 
तयाचा तो अर्थ 
वाचून निरर्थ 
शब्द नाही ॥२०५॥

बागुल आला म्हणितें । बोलणें जैसें रितें । कां आकाश वोळंबतें । तळहातीं ॥ ६-१०० ॥ 

रे बागुलबुवा 
आला रे आला 
म्हणणे बाळाला 
तैसेचि हे ॥२०६॥

धरीले आकाशा
मिया तळहाती 
बोलण्याची रिती 
व्यर्थ जैसी ॥२०७॥

Tuesday, 15 September 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या , ९१ते ९५(अभंग १८७ते १९७)


१८वा भाग
अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या , ९१ते ९५(अभंग १८७ते १९७) 
***********

रसवृत्तीसी उगाणें । घेऊनि जिव्हाग्र शाहाणें । परि कायी कीजे नेणे । आपणापें चाखों ॥ ६-९१ ॥ 

जीभ घेई चव 
अवघ्या रसाची 
रसाच्या ज्ञानाची 
राणीच ती ॥१८७॥
तरी काही केल्या 
तिला तिची चव 
घेण्यास तो वाव 
नाही मुळी॥१८८॥

तरि जिव्हे काई आपलें । चाखणें हन ठेलें ? । तैसे नव्हे संचलें । तेंचि तेकीं ॥ ६-९२ ॥

तरी काय जिभे 
चाखण्याचा गुण 
जातो हरवून 
सांग इथे ॥१८९॥
अहो चाखनेच 
रूप मूर्तिमंत 
तिचे घनवट 
साकारले॥१९०॥

 तैसा आत्मा सच्चिदानंदु । आपणया आपण सिद्धु । आतां काय दे शब्दु । तयाचें तया ॥ ६-९३ ॥ 

तैसा आत्मा असे 
हा सच्चिदानंद
सदा स्वयम् सिद्ध
आत्मपणे ॥१९०॥
तयाला ते शब्द 
काय देऊ शके 
कैसे जाणू शके 
असीमाला ॥१९१॥

कोणाही प्रमाणाचेनि हातें । वस्तु घे ना नेघे आपणयातें । जो स्वयेंचि आइतें । घेणें ना न घेणें ॥ ६-९४ ॥ 

अवघी प्रमाण 
होतात रे व्यर्थ 
करू जाता सिद्ध 
परमात्मा ॥१९२॥
अरे वस्तू नाही 
सिद्ध वा असिद्ध 
प्रमाण प्रसिद्ध 
कदापिही ॥१९३॥
स्वतःला ते घेणे 
अथवा न घेणे 
नलगे करणे  
स्वयं सिद्धे॥१९४॥
सिद्ध साध्याविन 
तिचे ते असणे 
पूर्ण पूर्णतेणे 
सर्व काळी ॥१९५॥

म्हणोनि आत्मा आत्मलाभें । नांदऊनि शब्द शोभे । येईल ऐसा न लभे । उमसुं घेवों ॥ ६-९५ ॥

म्हणुनी आत्म्यास 
आत्म लाभ केला 
ऐसिया ह्या बोला 
अर्थ नाही  ॥१९६॥
फुकाचा हा गर्व 
शब्दाचा होईन 
काही केल्याविन
अगा इथे॥१९७॥
***
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
***********************

Sunday, 13 September 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ,८६ते ९०(अभंग १७७ते १८६)

१७वा भाग
अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ,८६ते ९०(अभंग १७७ते १८६) ***********
******
आपुलिये मुकुटीं समर्था । चंद्र बैसविला सर्वथा । परि चंद्र चंद्राचिये माथा । वाऊं ये काई ? ॥ ६-८६ ॥
चंद्र बसविला 
आपुलिया माथा 
शोभतो समर्था
भोलेनाथा ॥१७७॥
परी काय चंद्र 
बसे स्वयम् माथा 
घडेना सर्वथा 
ऐसी कथा ॥१७८॥
 तैसा आत्मराजु तंव । ज्ञानमात्रचि भरींव । आतां ज्ञानें ज्ञानासि खेंव । कैसें दीजे ? ॥ ६-८७ ॥ 
तैसा आत्मा असे 
ज्ञानाची भरीव 
अन्य भेदभाव 
नसे तिथे ॥१७९॥
तैसी मिठी इथे 
ज्ञाने ज्ञाना घडे 
हे तो बोल वेडे 
शब्दातले ॥१८०॥
आपुलेनि जाणपणें । आपणयातें जाणों नेणे । डोळ्या आपुलें पाहाणें । दुवाड जैसें ॥ ६-८८ ॥ 

जैसे डोळीयाला 
आपुले पाहणे 
दुवाड हे येणे -
माने असे ॥१८१॥
तैसे आत्म्याला या
स्वतःला पाहणे 
वेगळे जाणणे 
शक्य नसे ॥१८२॥
आरसा आपुलिये । आंगीं आपण पाहे । तरी जाणणें जाणों लाहे । आपणयातें ॥ ६-८९ ॥ 
काय तो आरसा 
जाऊन सामोरा 
पाहतो स्वतःला 
कधीकाळी ॥१८३॥
जर कधी ऐसे 
येईल घडून 
ज्ञान स्व पाहिन 
ज्ञेय होत॥१८४॥
दिगंतापैलीकडेचें । धांवोनि सुरिया खोंचे । मा तियेका तियेचें । आंग फुटे ? ॥ ६-९० ॥ 
दिगांता पर्यंत 
धावून जाऊन 
सुरी ती खोचेन
कोणालाही ॥१८५॥
परी काय कधी 
स्वतःला घेईन 
जखम करून 
ती गा इथे ॥१८६॥
********
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
***********************

Saturday, 12 September 2020

भागअमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ८१ते ८५(१६८ अभंग ते१७७ ) १६वा

१६वा भाग
अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ८१ते ८५(अभंग ते ) ***********
*****
कृतांत जरी कोपेल । तरी त्रैलोक्य हें जाळील । वांचूनि आगी लावील । आगीसि काई ? ॥ ६-८१ ॥ 
जरी का कृतांत 
क्षोभला कोपून 
त्रिलोक जाळून 
ठाकू शके ॥१६८॥
परी तयातील 
अग्निस ती आग 
कोण बरे सांग 
लावू शके॥१६९॥

आपणपें आपणया । दर्पणेवीण धात्रेया । समोर होआवया । ठाकी आहे ? ॥ ६-८२ ॥

अहो विधात्याला 
पाहण्या स्वतःला 
जाणे आरशाला 
भाग असे ॥१७०॥
तयाविन तोही 
काय जाणू शके 
अन पाहू शके 
स्वतःला की ॥१७१॥
 दिठी दिठीतें रिघों पाहे ? । रुचि रुचीतें चाखों सुये ? । कीं चेतया चेतऊं ये ? । हें नाहींच कीं ॥ ६-८३ ॥ 
दिठी का दिठीला 
स्वतः पाहू शके 
रूची चाखू शके 
रुचीलाच ॥१७२॥
किंवा जागृताला
जागृत करणे 
कैसे हे घडणे 
घडू शके ॥१७३॥

चंदन चंदना लावी ? । रंगु रंगपणा रावी । मोतींपण मोतीं लेववी । ऐसें कैंचें ? ॥ ६-८४ ॥ 
चंदन उटी का
लावी स्व:स उटी 
रंग रंगविती 
रंगालाचि ॥१७४॥
मोती मोतीपण 
घेई पांघरून 
तेजे उजळून 
स्वतः कधी॥१७५॥
सोनेंपण सोनें कसी । दीपपण दीप प्रकाशी । रसपणा बुडी ते रसीं । तें कें जोडे ? ॥ ६-८५ ॥ 
काय कसवटी 
होऊनिया सोने 
पहातसे सोने 
कस कधी ॥१७६॥
ज्योत दे प्रकाश 
कधी का ज्योतीला
रस का  रसाला 
बुडी देई ॥१७७॥
*******
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
***********************

Friday, 11 September 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ७६ते ८०(अभंग १५८ते १६७)

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ७६ते ८०(अभंग १५८ते १६७) ***********
आपणया आपणपेंसी । लागलें लग्न कवणे देशीं । कीं सूर्य अंग ग्रासी । ऐसें ग्रहण आहे ? ॥ ६-७६ ॥ 
आप आपणाशी 
लग्न ते करावे 
ऐसे का घडावे 
कुण्या देशी ॥१५८॥
अथवा भास्कर
ग्रासे स्व अंगाशी 
ऐश्या ग्रहणासी 
पाहे कुणी ॥१५९॥
गगन आपणया निघे ? । सिंधु आपणा रिघे ? । तळहात काय वळघे । आपणयां ? ॥ ६-७७ ॥ 
गगन निघाले 
आपल्या घराला 
सागर स्नानाला 
सागरात ॥१६०॥
तळहात स्वतः 
चढे तळहाती 
काय ही घडती 
वार्ता कुठे ॥१६१॥
सूर्य सूर्यासि विवळे ? । फळ आपणया फळें ? । परिमळु परिमळें । घेपता ये ? ॥ ६-७८ ॥ 
सूर्य का सूर्याचा  
करतो उदय 
फळे फळे काय 
स्वतःसाठी ॥१६२॥
अणिक सुगंध 
घेतो का सुगंध 
होऊनिया धुंद 
वेगळाची ॥१६३॥
चराचरा पाणी पाजणी । करूं येईल येके क्षणीं । परि पाणियासि पाणि । पाजवे कायी ? ॥ ६-७९ ॥ 
अवघ्या जगाला 
करि ते पाजणे 
ऐसे हे रे पाणी 
एका क्षणी ॥१६४॥
परी त्या पाण्याला 
लागे का तहान 
पाणी तया कोण  
पाजते का ॥१६५॥
साठीं तिशा दिवसां । माजीं एखादा ऐसा । जे सूर्यासीच सूर्य जैसा । डोळा दावी ॥ ६-८० ॥ 
वर्षाचे ते दिवस 
तिनशे नि साठ
असे काय त्यात 
दिन असा ॥१६६॥
जया दिनी सूर्य 
पाहीन स्वतःला 
आपुलीया डोळा 
आपणच ॥१६७॥
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
***********************

Sunday, 6 September 2020

७१ ते७५

१४वा भाग
अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या७१ ते ७५(अभंग १४८ते १५७) ***********
******
कैसीही वस्तु नसे । जैं शब्दाचा अर्थ हों बैसे । तैं निरर्थकपणें नासे । शब्दहि थिता ॥ ६-७१ ॥ 
कधीही कुठली 
वस्तू ती नसून 
शब्दांनी वर्णन 
तिचे होय ॥१४८॥
निरर्थ प्रयास 
अरे तो होतसे 
शब्दही जातसे 
सवे वाया ॥१४९॥
आतां अविद्याचि नाहीं । हें कीर म्हणो काई । परी ते नाशितां कांहीं । नुरेची शब्दाचें ॥ ६-७२ ॥ 
अविद्या जगती 
खरोखर नाही 
ऐसे म्हणणेही 
काय कामी ॥१५०॥
म्हणून नसल्या 
नाशास जो जाई 
उरतच नाही 
शब्द कुठे ॥१५१॥
यालागिं अविद्येचिया मोहरां । उठलियाहि विचारा । आंगाचाची संसारा । होऊनि ठेला ॥ ६-७३ ॥ 
म्हणूनिया शब्द 
अविद्ये सामोरा 
नाशासाठी गेला 
जर कधी ॥१५२॥
अंग हरवतो 
वेगळा नूरतो 
सांगण्या ठाव तो 
कुठे नाही ॥१५३॥
म्हणोनि अविद्येचेनि मरणें । प्रमाणा येईल बोलणें । हें अविद्याचि नाहींपणें । नेदी घडों ॥ ६-७४ ॥ 
यालागी अविद्ये
घडता मरण 
शब्दास प्रमाण 
येऊ शके ॥१५४॥
हे तो कदापिही 
नच रे घडणे 
अविद्या नसणे 
म्हणूनिया १५५॥
आणि आत्मा हन आत्मया । दाऊनी बोलु महिमेया । येईल हें साविया । विरुद्धचि ॥ ६-७५ ॥ 
आणिक आत्म्याला 
आत्मरूप दाऊ 
महिमा ती गाऊ 
शब्दांमध्ये ॥१५६॥
तरी हे विरुद्ध 
असे रे बोलणं
शब्दा मोठेपण 
शक्य नाही ॥१५७॥
****
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
***********************

Saturday, 5 September 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ६६ते ७०(अभंग १३८ते १४७)

१३वा भाग
अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ६६ते ७०(अभंग १३८ते १४७) ***********
चकोराचिया उद्यमा । लटिकेपणाची सीमा । जरि दिहाचि चंद्रमा । गिंवसूं बैसे ॥ ६-६६ ॥ 
दिवसा उजेडी 
चांदण्याचे खाणे
जैसे का शोधणे
चकोराने ॥१३८॥
त्याचे ते शोधणे
निरर्थाची सीमा 
ऐसिया उद्यमा
 काय बोलू ॥१३९॥
नुसुधियेचि साचा । मुका होय वाचरुकाचा । अंतराळीं पायांचा । पेंधा होय ॥ ६-६७ ॥ 
को-या कागदाचा 
वाचक तो मुका
अवघाच फुका 
खटाटोप ॥१४०॥
समर्थ पायाचा 
होतसे पांगळा
जरी अंतराळा
चालू जाय ॥१४१॥
तैसीं अविद्येसन्मुखें । सिद्धचि प्रतिषेधकें । उठलींच निरर्थकें । जल्पें होतीं ॥ ६-६८ ॥ 
नसे जी अविद्या
तिला नाशायाला 
सन्मुख ठाकला
शब्द जरी ॥१४२॥
तरी तयाचे ते
उठणे भिडणे
जणू की जल्पणे
निरर्थक ॥१४३॥
अंवसे आला सुधाकरु । न करीच काय अंधकारु ? । अविद्यानाशीं विचारु । तैसा होय ॥ ६-६९ ॥ 
अवसेच्या  राती 
आला सुधाकर
तो ही अंधकार 
होत असे ॥१४४॥
नाहीतर तिला
म्हणणे अवस
केवल ही हौस 
होईल गा ॥१४४॥
तैसा विद्येचिया 
संहाराला आला 
अविद्याची झाला 
शब्द तिथे ॥१४५॥
नाना न निफजतेनि अन्नें । जेवणें तेंचि लंघनें । निमालेनि नयनें । पाहणाचि अंधु ॥ ६-७० ॥ 
केलिया वाचून
सुंदर व्यंजन
करने भोजन
ते लंघन ॥१४६॥
निमाले नयन 
तयांनी पाहणं
काय अंधपण
दुजे आहे ॥१४७॥
*****
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
***********

Friday, 4 September 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ६१ते ६५(अभंग १२८ते १३७) ***********


१२वा भाग
अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ६१ते ६५(अभंग १२८ते १३७) ***********

 माप मापपणें श्लाघे । जंव आकाश मवूं न रिघे । तम पाहतां वाउगें । दीपाचें जन्म ॥ ६-६१ ॥ 
मापा मापपण 
शोभते तोवर 
आकाश जोवर 
मोजेना ते ॥१२८॥
दीपाने पाहिला 
जर का अंधार 
व्यर्थची आकार 
जन्म त्याचा ॥१२९॥
गगनाची रससोये । जीभ जैं आरोगु जाये । मग रसना हें होये । आडनांव कीं ॥ ६-६२ ॥ 
जीभ जव जाई  
गगन चाखाया 
हरते उपाया 
करुनिया ॥१३०॥
तरी तिला कैसे 
म्हणावे रसना 
येई उणेपणा 
नामास त्या॥१३१॥
नव्हतेनि वल्लभे । अहेवपण कां शोभे । खातां केळीचे गाभे । न खातां गेले ॥ ६-६३ ॥ 
नसून वल्लभ 
सौभाग्याचे लेणे 
जगी मिरविणे 
व्यर्थ जैसे ॥१३२॥
केळीचा तो गाभा 
कोणी खाऊ गेले 
उपाशी ते मेले 
जणू काही॥१३३॥
स्थूळ सूक्ष्म कवण येकु । पदार्थ न प्रकाशी अर्कु । परि रात्रीविषयीं अप्रयोजकु । जालाचि कीं ॥ ६-६४ ॥ 
स्थूल सूक्ष्म किती 
वस्तू जगतात 
सूर्य प्रकाशत 
साऱ्यांना त्या ॥१३४॥
तरी काही केल्या 
रात प्रकाशे ना 
वा तो न होईना 
निशेचा त्या ॥१३५॥
दिठी पाहतां काय न फावे । परि निदेतें तंव न देखवे । चेता ते न संभवे । म्हणोनियां ॥ ६-६५ ॥ 
पाहता डोळ्याने
सारेच दिसते 
निद्रा ना दिसते 
परी कधी ॥१३६॥
कैसा जागा झाला 
पाहीन झोपेला 
तो न ती उरला 
म्हणूनिया ॥१३७॥
*********:
©,डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
***********************

Thursday, 3 September 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ५६ते ६०(अभंग ११९ते १२७)

भाग ११
अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ५६ते ६०(अभंग ११९ते १२७) 
****
नाहीं तयाचे नाशें । शब्द न ये प्रमाणदशे । अंधारीं अंधारा जैसें । नव्हे रूप ॥ ६-५६ ॥ 
नाही त्या नाशणे 
जरी या शब्दाने
मोठेपण देणे
तरी  त्या का ॥११९॥
अंधाराचे रूप 
अंधारी नकळे 
तैसे हे सगळे 
आहे इथे ॥१२०॥
अविद्येची नाहीं जाती । तेथें नाहीं म्हणतया युक्ती । जेवी दुपारीं कां वाती । आंगणींचिया ॥ ६-५७ ॥
अंगणात दिवा 
लावला दुपारी 
जैसी व्यर्थ सारी
 उठाठेव ॥१२१॥
अविद्येला जन्म 
जर इथे नाही 
नाथणे युक्ती ही 
निरर्थक ॥१२२॥

 न पेरितां शेती । जे कीं सवगणिया जाती । तयां लाजेपरौति । जोडी आहे ? ॥ ६-५८ ॥ 

न पेरीता शेती 
कापण्यास जाती 
तया न ये हाती 
लाजेवीन ॥१२३ ॥

खवणियाच्या आंगा । जेणें केला वळघा । तो न करितांचि उगा । घरीं होता ॥ ६-५९ ॥ 

नग्न माणसाचा 
घेऊ पाहे झगा 
यत्न तो वाउगा
जैसा होय ॥१२४॥
आकाशाची वस्त्रे 
पाहे पांघरून 
बरे ते त्याहून 
घरातचि ॥१२५॥

पाणियावरी वरखु । होता कें असे विशेखु । अविद्यानाशी उन्मेखु । फांकावा तैसा ॥ ६-६० ॥

जलाशयावर 
पडता पाऊस 
लाभ तो कोणास 
होय त्याचा ॥१२६॥
अविद्या नाशाचे
प्रयत्न शब्दाचे 
निरर्थपणाचे 
तैसेचि ते ॥१२७॥

****
©, डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
***********************

Wednesday, 2 September 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ५१ते ५५(अभंग १०८ते ११७) ***********

११वा भाग
अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ५१ते ५५(अभंग १०८ते ११७) ***********
*****
तो बागुलातें मारू । प्रतिबिंब खोळे भरू । तळहातींचे विंचरू । केंस सुखें ॥ ६-५१ ॥

बागुल बुवाला
धरून मारावे 
प्रतिबिंब घ्यावे 
पदरात ॥१०८॥
तळ हातीचे ते 
केस विंचरणे 
करावे सुखाने 
जैसे काही ॥१०९॥

 घटाचें नाहींपण फोडू । गगनाची फुलें तोडू । सशाचें मोडू । शिंग सुखें ॥ ६-५२ ॥

नसल्या घराला 
रागाने फोडावे 
नभाचे तोडावे 
फुले जैसे ॥११०॥
सशाच्या शिंगाला 
धरून मोडावे 
ऐसेची करावे 
काहीएक॥१११॥

 तो कापुराची मसी करू । रत्नदीपीं काजळ धरू । वांजेचें लेंकरूं । [अरणु सुखें ॥ ६-५३ ॥ 

कापूर जाळून 
काजळ भरून 
शाई ती करून 
वापरावी ॥११२॥
रत्नदिपकाचे
काजळ धरावे
लग्नाची करावे 
वांझ पुत्री ॥११३॥

तो अंवसेनेचि सुधाकरें । पोसू पाताळीची चकोरें । मृगजळींचीं जळचरें । गाळूं सुखें ॥ ६-५४ ॥ 

घेऊन चांदणे 
कुण्या अवसेचे  
पोसो पातळीचे 
चकोर वा ॥११४॥
मृगजळातील 
बहु जलचर 
घेऊन वागुर 
पकडावे११५॥

अहो हें किती बोलावें । अविद्या रचिली अभावें । आतां काई नाशावें । शब्दें येणें ॥ ६-५५ ॥ 

अहो सांगा किती 
ऐसे हे बोलावे 
अविद्या सांगावे 
विवरून ॥११६॥
नसल्या असावे 
कैसे हे घडावे 
अविद्या अभावे 
आहे येथे ॥११७॥
इये अभावते 
आहे पण देणे 
शब्दाने खंडणे 
तैसे होय॥११८॥
******
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
****************

Tuesday, 1 September 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ४६ते ५०(अभंग ९४ते १०७)***********

*****************
१० वा भाग
अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ४६ते ५०(अभंग ९४ते  १०७)
***********
उठावला वोथरे सवंका ।तो सुनाथ पडे असिका ॥ अविद्या नाशीं तर्का  ।तैसें होय ॥४६॥
ऐसीसी ही धिंवसा 
उमटून मना 
व्यर्थाच्या अंगणा 
विरतसे ॥९५॥
तयापरी तर्क 
शब्दांच्या आधारे 
अविद्या अंधारे 
मोडेचिना ॥९६॥

ऐसी अविद्या नासावी । वाहेल जो जीवीं । तेणें साली काढावी । आकाशाची ॥ ६-४७ ॥ 

ऐसी ही अविद्या 
नाशावी सर्वस्वी 
ऐसी चाड जीवी 
वाहे कुणी ॥९७॥
 तयाचे कल्पणे
निरर्थ कष्टणे
सालची काढणे 
आकाशाची॥९८॥

तेणें शेळीगळां दुहावीं । गुडघां वास पाहावी । वाळवोनि काचरी करावी । सांजवेळेची ॥ ६-४८ ॥ 
अथवा तयाने 
शेळीच्या गळ्याचे
 दुधची स्तनाचे 
काढावे की॥९९॥
गुडगा वाटीचे
करुनिया डोळे
 घ्यावी कि धांदोळे 
वाटेची वा ॥१००॥
सांजवेळीची वा 
काचरी करून 
घ्यावी वाळवून 
अनायसे ॥१०१॥
जांभई वांटूनि रसु । तेणें काढावा बहुवसू । कालवूनि आळसू । मोदळा पाजावा । ६-४९ ॥ 
रस वा काढावा 
जांभई वाटून 
त्यात कालवून 
आळसाला ॥१०२॥
अन पाजावे
चिखला मिश्रण 
जाऊन आपण 
प्रेमभरे॥१०३॥
तो पाटा पाणी परतु । पडली साउली उलथु । वारयाचे तांथु । वळु सुखें ॥ ६-५० ॥ 
तयांनी पाटा स 
पाणीया  सकट 
करावे उलट 
जैसे काही ॥१०४॥
(अथवा पाण्यास
उलट दिशेत
 न्यावे वाहवत 
जसे काही )॥१०५॥
वारिया धरून 
मधून पिळून
धागेच काढून
 ठेवावी की ॥१०६॥
पडली सावुली 
हाताने आपुल्या 
उलथवुनिया
पहावि का ॥१०७॥

**""
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
***********************

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...