प्रकरण दहावें ग्रंथपरिहार
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय १० वा ग्रंथपरिहार ओव्या ,१ते ५ (अभंग १ते1१० )
💮💮💮💮💮💮
परी गा श्रीनिवृत्तिराया । हातातळीं सुखविलें तूं या । तरी निवांतचि मियां । भोगावें कीं तें ॥ १०-१ ॥
डोक्यावर हात
माझिया ठेवुनी
निवृत्ती नाथांनी
सुखी केले ॥१
सुखाच्या राणीवे
बसुनी निवांत
राहावे भोगत
सुख तेची ॥२
परी महेशें सूर्याहातीं । दिधली तेजाची सुती । तया भासा अंतर्वर्ती । जगचि केलें ॥ १०-२ ॥
परी महेशाने
दिली सूर्याहाती
सूत्रे तेजाची ती
सांभाळाया ॥३
तया त्या तेजाने
जाहला प्रकाश
अवघ्या विश्वास
काठोकाठ ॥४
चंद्रासि अमृत घातलें । तें तयाचि कायि येतुलें । कीइं सिंधु मेघा दिधले । मेघाचि भागु ॥ १०-३ ॥
चंद्राला अमृत
दिधले ईशाने
का त्या एकट्याने
भोगावया ?॥५
अथवा सिंधूने
मेघा दिले जल
ठेवण्या जवळ
तयाची का? ॥६
दिवा जो उजेडु । तो घराचाची सुरवाडू । गगनीं आथी पवाडु । तो जगाचाची कीं ॥ १०-४ ॥
दिव्याचा प्रकाश
फक्त का दिव्यास
अवघ्या घरास
मिळेची तो ॥७
गगन विस्तार
नसे गगनाचा
अवघ्या विश्वाचा
त्यात वाटा ॥८
अगाधेंहि उचंबळती । ते चंद्रीचि ना शक्ती ? । वसंतु करी तैं होती । झाडांचें दानीं ॥ १०-५ ॥
अफाट सागर
अपार भरती
चंद्राची ती शक्ती
असेचि ना ॥९
वसंत येताच
वृक्ष होती दानी
परी ती करणी
वसंताची ॥१०
🌾🌾🌾 .
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵