Tuesday, 1 October 2019

अमृतानुभव शिव शक्ति समावेशन ओवी ११ ते १५

  




कैसा मेळु आला गोडिये । जे दोघें न माती जगीं इये ।
कीं परमाणुहीमाजि उवायें । मांडलीं आहाती ॥११॥

ऐक्याची ही गोडी
वर्णा वी ती किती
दोघें न मावती
त्रिलोकीही ॥25॥
अणुरेणुलाही
राहती व्यापून
अवघे होऊन
आनंदात ॥26॥

जिहीं एकएकावीण । न कीजे तृणाचेंहि निर्माण ।
जियें दोघें जीवप्राण । जियां दोघां ॥१२॥

एकमेकाविना
तृणही निर्माण
करू शकती न
असे एक ॥ 27॥
जणू एकमेका
देऊन जीवित्व
धरती अस्तित्व 
अनादी ही ॥28॥

घरवातें मोटकीं दोघें । जैं गोसावी सेजे रिगे ।
तैं दंपत्यपणे जागे । स्वामिणी जे ॥१३॥

घरात मोटकी
दोघेच असती
जगत व्याप्ती
सर्व काही ॥29॥
पुरुष निजता
स्वामींनी जागते
संसार पाळते
सामर्थ्यांने ॥30॥
जयां दोघांमाजि येखादें । विपायें उमजलें होय निदें ।
रितें घरवात गिळूनि नुसधें । कांहीं ना करी ॥१४॥

होय कुणी जागे
दोघांमध्ये यया
संसार विलया
जातो असे ॥31॥
गिळून जगत
स्वरूप मागुती
केवळ उरते
अन्य नाही ॥32॥

दोहों अंगाची आटणी । गिंवसित आहाती येकपणीं ।
जाली भेदाचिया वाहाणी । आधाआधीं जियें ॥१५॥

दोघाही ययांची
होवून आटणी
स्वरूप मिळूनी
हरवती ॥33॥
तरीही भेदाच्या
जावून वाहिनी
अर्धाधी रूपांनी
मिरवती ॥34॥

Tuesday, 10 September 2019

अमृतानुभव शिव शक्ति समावेशन ओव्या ६ ते १०





हा ठावोवेर्‍ही वियोगभेडें । जें बाळ तरि जगायेवढें ।
वियालीं परी न मोडे । दोघुलेंपण ॥६॥

जगाच्या एवढे
बालक होवून
जाईना मोडून
दोन पण ॥15॥

वियोग वैगुण्य
तयांच्या प्रेमीं न
कधीही घडून
येत असे ॥16॥

आपुलिये आंगीं संसारा । देखिलिया चराचरा ।
परि नेदितीच तिसरा । झोंक लागों ॥७॥

तया अंगी जरी
घडतो संसार
सारे चराचर
अंकुरते ॥17॥
तिसरे पणाची
तया ना झुळूक
असे हे कौतुक
दिसू येते ॥18॥
जयां एका सत्तेचें बैसणें । दोघां येका प्रकाशाचें लेणें ।
जें आनादि एकपणें । नांदती दोघें ॥८॥

एकाच सत्तेचे
तयाला आसन
एकच ते लेण
प्रकाशाचे ॥19॥

ऐसी ही अनादी
एकत्र नांदती
दोन म्हणवती
जरी इथे ॥20॥

भेदु लाजोनि आवडीं । एकरसीं देत बुडी ।
तो भोगणया थाव काढी । द्वैताचा जेथ ॥९॥

दोघात शिरण्या
पाही भेद भाव
परि अटकाव
होतो तया  ॥21॥

मग तो लाजून
होय एकरूप
आपले स्वरूप
विलोपून ॥22॥

देवें संपूर्ण देवी । तियेविण कांहिंना त गोसावी ।
किंबहुना एकोपजीवी । एकमेकां ॥१०॥


देवाने पूर्णत्व
येतसे देवीला
अर्थ ना देवाला
देवीविना ॥23॥
अशी ही जोडी
पुरुष प्रकृती
एकमेका देती

पूर्णत्वची ॥24 ॥




Monday, 9 September 2019

अमृतानुभव, शिव शक्ति समावेशन ओव्या १ ते ५





 प्रकरण पहिलें
ऐसीं इयें निरुपाधिकें । जगाचीं जियें जनकें ।
तियें वंदिलीं मियां मूळिकें । देवो देवी ॥१॥


ऐसी ही देखिली
म्या निरुपाधिक
जननीजनक
जगताची ॥
-
विश्व वृक्षाचे जी
जणू काही मूळ
वंदिली कृपाळ
देव देवी ॥

**
जो प्रियूचि प्राणेश्वरी । उलथे आवडीचिये सरोभरीं ।
चारुस्थळीं एका हारीं । एकांगाचा ॥२॥
.
तया शिवाची जी
असे प्राणेश्वरी
तिये प्रेमभरी
वेडावून ॥
-
घेतसे जो उडी
तिच्या स्वरूपात
जाई हरपत
तिये ठायीं ॥
 -
ऐक्याची ही स्थिती
सर्वोच्च साजरी
एकाच शरीरी
नरनारी ॥
**
आवडीचेनि वेगें । येकयेकां गिळिती आंगें ।
कीं द्वैताचेनि पांगें । उगळिते आहाती ॥३॥
आवडी आवेगी
घालूनियां मिठी
एकरूप प्रीती
अनुभवे ॥
-
एकेकासी ती
जणू की गळती
गमे अशी स्थिती
तया ठायी ॥

किंवा रमण्यात
द्वैताच्या आनंदी
होवू ते पाहती
वेगळाले ॥
**
जे एकचि नव्हे एकसरें । मा दोघां दोनीपण कैचें पुरे ।
काय नेणों साकारें । स्वरूपें जियें ॥४॥
-
पाहता एकची
नव्हे एकसरे
परि द्वैत  सरे
असे नाही ॥
-
जयांचे स्वरूप
पाहता साकार
लागेना तो पार
काही केल्या ॥

**
कैसी खसुखाची आळुकी । जे दोनीपणें भिडोनि एकीं ।
नेदिती मा कौतुकीं । एकपण फुटों ॥५॥
-
कैसी स्वरूपाची
अतीव आवड
अद्वैत बिघाड
होत नाही ॥
-
आनंद विलासी
द्वैत अविर्भाव
परी एक भाव
जात नाही ॥
-
आनंद कल्लोळी
द्वैताचा आभास
तोही परि त्यास
बाध्य नाही ॥



© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
 https://amrutaanubhav.blogspot.com  

Thursday, 29 August 2019

प्रास्तविक वंदन


 अमृतानुभव, पद्य भावानुवाद,  नमन
******************


यदक्षरमनाख्येयमानन्दमजमव्ययम

श्रीमन्निवृतिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये ॥1 ॥ 


असे जे अक्षर
वर्णना अतीत
आनंद प्रतीत
स्वयमेव॥1
जन्म न जयाला
प्राप्त न व्ययाला
शरण मी त्याला
जात असे ॥2

गुरूरित्याख्यया लोके साक्षद्विद्याहि शांकरी 
जयत्याज्ञा नमस्तस्यै दयार्द्रायै निरंतरम ॥2॥ 

श्री निवृत्तीनाथ
नामी जे विख्यात
प्रत्यक्ष दैवत
असे माझे ॥3
गुरु नाम थोर
करुनी धारण
होय अवतीर्ण
जणू  काही॥4
अथवा विद्याच
साक्षात शांकरी
येतसे आकारी
जगतात ॥5
सदा आज्ञा रूपे
विजयी जगी या
नमन मी तया
करी तसे ॥6
दयाच जणू की
येत ओघळूनी
सदा तयातूनी
कृपाकर ॥7 

सार्ध्दं केन च कस्यार्ध्दं शिवयो:समरूपिणो 
ज्ञातुं न शक्यते लग्नमिति द्वैतच्छलान्मुहु: ॥3॥ 

शिव आणि शक्ती
यात अर्धे कोण
पाहता शोधून
कळू  न ये ॥8॥ 
घेता द्वैत शोध
हाती येतो भास
असे एकेकास
जोडलेले ॥9॥ 

अद्वैत्वमात्मनस्तत्वं  दर्श्ययंतौ मिथस्तराम 
तौ वंदे जगतामाद्यौ तयोस्त्तत्त्वाभिपत्तये ॥4॥ 


अद्वैत रूपात
आत्मतत्त्व होत
स्पष्ट से दावित
मिथकत्व ॥10
ऐसे विश्वाधार
त्याचे व्हावे ज्ञान
म्हणूनी वंदन
करितो मी ॥11



मुलायाग्राय मध्याय  मूलमध्याग्रमूर्तये 
क्षिणाग्रमुलमध्याय नम: पूर्णाय शंभवे ॥5॥ 

असे जो कारण
जग आरंभास
स्थिती विलयास
पूर्णपणे ॥12
किंवा आपणच
आधी मध्य अंत
होऊन नांदत
स्वयं येथे ॥13
स्वरूपी जयाच्या
तिहींचा अभाव
तो श्री शांभव
नमिला मी॥14 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://anubhavamrut.blogspot.co.in

मानस

प्रिय मित्र हो . 
आता अमृतानुभव सुरु करीत आहे .हा ग्रंथ अधिक कठीण आहे .म्हणुन अभ्यास करताना तो जसा समजला तसा  पद्यात लिहण्याचा मानस आहे .कर्ता करविते श्री गुरू ज्ञानदेव आणि परात्पर गुरू श्री दत्तात्रेय आहेत .
त्यासाठी अमृतानुभव अभ्यास हा ब्लोग व फेसबुक पेज सुरू करणार आहे. 
लोभ असावा हि विनंति .
आपला विक्रांत 

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...