Friday, 20 December 2019

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय २ सद्गुरू स्तवन ओव्या ३६ ते ४० पर्यन्त





अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय २ सद्गुरू स्तवन ओव्या  ३६ ते ४०  पर्यन्त

***************************************************************************** 

हां गा मायावशें दाविसी । तें मायिक म्हणोन वाळिसी ।  
अमायिक तंव नव्हसी । कवणाहि विषो ॥ २-३६ ॥ 

३६

मायावशे देवा
जे काही दावीसी
टाक रे म्हणसी
लगेचिच

मायेचे म्हणून
टाकावे वर्जून
मायातीत पण
तुम्ही खरे

नये चि दृश्या
कुणाही विषया
पाहता तो वाया
गेला येथे

 शिवशिवा सद्गुरु । तुजला गूढा काय करूं ?  
येकाहि निर्धारा धरूं । देतासि कां ? ॥ २-३७ ॥ 

३७

शिव तूची शिवा
एक सद्गुरू
निगुढ सुंदरू
हाता ये ना

कोणत्या उपायी
तुज हाती धरू
काय मी करू
कळेचि ना

सरले उपाय
धरू म्हणू जाता
स्वरूपाचा पत्ता
लागेचि ना

३८


 नामें रूपें बहूवसें । उभारूनि पाडिलीं ओसें । 
 सत्तेचेनि आवेशें । तोषलासि ना ? ॥ २-३८ ॥ 


किती तुम्हा रुपे 
किती तुझी नावे
अपार उभवे
ओस पडे

ऐसी सत्तेचीने
अवघे वाढणे
काय तोष तेणे
होय तुवा

३९

जिउ घेतलिया उणे । चालों नेदिसी साजणें ।  
भृत्यु उरे स्वामीपणें । तेंहि नव्हे ॥ २-३९ ॥  


घेतल्या वाचूनी
सारा जीव भाव
आणिक उपाव
करेचिना९०

स्वामींचा नोकर
स्वामी होऊ जाता
न एकरूपता
तीही घडे९१

४०

विशेषाचेनी नांवें । आत्मत्वही न साहावे ।  
किंबहुना न व्हावें । कोण्हीच या ॥ २-४० ॥

विशेष ते काही
नाव इथे व्हावे
आत्मा म्हणावावे
तेही नसे

खरे तर येथे
काहीच न व्हावे
एसिया हवावे
हावे विना९३

 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://amrutanubhav.blogspot.com

Tuesday, 17 December 2019

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय २ सद्गुरू स्तवन ओव्या ३१ ते ३५ पर्यन्त


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय २ सद्गुरू स्तवन ओव्या  ३१ ते ३५  पर्यन्त
 **************************************************
तेथें नमनें का बोलें। केउतीं सुयें पाउलें ।  
आंगीं लाउनि नाडिलें । नांवचि येणें ॥ २-३१ ॥


केवुते वंदावे 
तया ते शब्दांनी 
अथवा नमुनी 
आदरेनी .॥७

लावूनी निवृत्ती 
नाव हे ज्यांनी 
नाडले सारुनी     (दुर ठेवले अडविले )
 शब्द स्पर्श  ॥७

32

नव्हे आत्मया आत्मप्रवृत्ति । वाढवितां कें निवृत्ति ?  
तरी या नामाचि वायबुंथी । सांडीचिना ॥ २-३२ ॥

आत्माचे ठिकणी 
न आत्मप्रवृती 
मग हे निवृति  
नाव कैसे ..॥७

म्हणूनी गमते 
वस्त्राचा आभास
निवृति नावास 
जणू काही ॥७

निवर्त्य तंव नाहीं । मा निवर्तवी हा काई ?  
तरि कैसा बैसे ठाईं । निवृत्ति-नामाच्या ? ॥ २-३३ ॥
 
नसे निवारण्यात 
येथे दिसे काही 
मग ही आवई 
कुठे कैसी ॥७

निवृत्ती नाव हे 
कैसे तया ठायी  
काहीच्या बाही 
असे काय ?॥७
३ 

सूर्यासि अंधकारु । कैं झाला होता गोचरु ?  
तर्ही तमारि हा डगरु । आलाचि कीं ॥ २-३४ ॥
 
काय पाहिलेले 
रवीने अंधारा 
भेटी एकएरा 
घडे कधी ॥७

तरीही  तमारी 
सूर्याचीही कीर्ती 
गाजते जागती 
सर्वकाळ ॥७

३४

लटिकें येणें रूढे । जड येणें उजिवडे । 
न घडे तेंहि घडे । याचिया मावा ॥ २-३५ ॥

 जयाचे सामर्थ्य 
खोटे खरे होते  (स्पष्ट होते )
जड प्रकाशाते
सहजीची ८०

जयाचिया नावे 
घडे जे जे काही 
नच घडे तेही 
ये आकारा ८१



© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

Saturday, 14 December 2019

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय २ सद्गुरू स्तवन ओव्या २६ ते३० पर्यन्त


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय २ सद्गुरू स्तवन ओव्या २६ ते३० पर्यन्त



जो उघड किं न दिसे । प्रकाश कीं न प्रकाशे ।  
असतेपणेंचि नसे । कव्हणीकडे ॥ २-२६ ॥ 
 आतां जो तो इहीं शब्दीं । कें मेळऊं अनुमानाची मांदी ।  
हा प्रमाणाहि वो नेदी । कोण्हाहि मा ॥ २-२७ ॥ 
 जेथें शब्दाची लिही पुसे । तेणेंसिं चावळों बैसे ।  
दुजयाचा रागीं रुसे । येकपणा जो ॥ २-२८ ॥ 
 प्रमाणापरि सरे । तैं प्रमेयचि आविष्करे ।  
नवल मेचुं ये धुरे । नाहींपणाची ॥ २-२९ ॥  
कांहींबाहीं अळुमाळु । देखिजे येखादे वेळु ।  
तरी देखे तेहि विटाळु । जया गांवीं ॥ २-३० ॥




२६

जो उघड किं न दिसे । प्रकाश कीं न प्रकाशे ।  
असतेपणेंचि नसे । कव्हणीकडे ॥ २-२६ ॥

उघड प्रगट
दिसाया जगती
अशी एक रिती
कुठे काही  ॥५८॥

अथवा गोचर
नच होय दृष्टी
असूनही  दिप्ती
प्रकाशाची॥ ५९ ॥

असून सर्वत्र
शून्या माझी वस्ती
अशी ही आकृती
नभाकार॥६०॥

२७
 आतां जो तो इहीं शब्दीं । कें मेळऊं अनुमानाची मांदी ।  
हा प्रमाणाहि वो नेदी । कोण्हाहि मा ॥ २-२७ ॥

आता बोलावणे 
कैसे तयाला ते 
सर्वनाम ही ते 
व्यर्थ सारे   ॥६१॥
आणि अनुमाना 
लावले साधन 
थांबेना लांबण 
काही केल्या  ॥६२॥

कुण्याही प्रमाणी
नसे प्रतिसाद 
करू कै विशद 
कळेचिना ॥६३॥

२८ 
जेथें शब्दाची लिही पुसे । तेणेंसिं चावळों बैसे ।  
दुजयाचा रागीं रुसे । येकपणा जो ॥ २-२८ ॥

शब्दांचा प्रवास 
घडतो निरर्थ 
वाचून ते अर्थ 
सहज ती ॥६४॥

द्वैताच्या प्रेमात 
सरे एकपण
घडे संभाषण 
म्हणो तर ॥६५॥

तेथ बोलण्याची 
काय सांगू मात 
बोले ते द्वैतात 
घडतसे ॥६६॥

२९
 प्रमाणापरि सरे । तैं प्रमेयचि आविष्करे ।  
नवल मेचुं ये धुरे । नाहींपणाची ॥ २-२९ ॥
 
प्रमाण सरता
कैसे कै मोजावे 
कुणाला पाहावे 
यथा रूप ॥६७॥

तया त्या स्थितीत 
स्वयं अवतारे 
प्रमेय साजरे
मूर्तिमंत ॥६८॥

नवल प्रेमाचे 
नाही जे पणाचे 
स्वरूप धुरेचे 
ये आकारा ॥६९॥

३०


कांहींबाहीं अळुमाळु । देखिजे येखादे वेळु ।  
तरी देखे तेहि विटाळु । जया गांवीं ॥ २-३० ॥

काही आळुमाळु ( हलकेच, सान ,थोडे)
घडले दर्शन 
म्हणे जरी कोण 
कधी काळी ॥७०॥

त्यांचे ते पाहणे 
नासते दर्शन 
अैसे हे संपूर्ण 
सर्वव्यापी॥७१॥



© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://amrutanubhav.blogspot.com

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...