Friday, 24 July 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ५ सच्चिदानंद पदत्रय विवरण ओव्या ६१ ते६८(अभंग ११८ते १३३)संपूर्ण


तैसें अनुभाव्य अनुभाविक । इहीं दोही अनुभूतिक । तें गेलिया कैचें एक । एकासिचि ॥ ५-६१॥ 

 
जैसा अनुभाव्य
नि अनुभविता
अनुभवी सदा 
असतात ॥११८

परी आत्मस्थिती 
अभाव ययाला 
संबंध तयाला 
मग कुठे॥११९


अनुभवो हा ठाववरी । आपुलीचि अवसरी । तेथें अक्षरांची हारी । वाईल काई ? ॥ ५-६२ ॥ 

तैसा अनुभव 
जातसे जिरून  
ठाईच विरून 
आपुलिया ॥१२०

तर मग तेथे 
शब्दांनी वर्णन 
कैसे हे घडून 
सांगा बरे ॥१२१


कां परेसी पडे मिठी । तेथें नादासाळु नुठी । मा वावरिजैल ओंठीं । हें कें आहे ? ॥ ५-६३ ॥ 


अहो तिथे परा 
विलय पावते 
नादा न मिळते 
जागा काही ॥१२२

तर मग ओठी 
येईल बोलता 
काय रे हे घेता 
होत आहे ॥१२३

६४

चेइलियाही पाठीं । चेवणयाच्या गोठी । कां धाला बैसें पाठीं । रंधनाच्या ? ॥ ५-६४ ॥ 

जागे झाल्यावर 
जागे करण्याच्या
गोष्टी त्या कामाच्या 
नाही जशा ॥१२४

जेवून उठला 
समाधानी झाला 
का पुन्हा पाकाला 
लागे सांगा ॥१२५
६५

उदैजलिया दिवसपती । तैं कीं दिवे सेजे येती । वांचुनि पिकला शेतीं । सुइजताती नांगर काई ? ॥ ५-६५ ॥ 

 उगवता दिन 
दिवे मालवती 
तयाला लावती 
कोण पुन्हा ॥१२६

पिकुनिया शेती 
धान्य आले हाती 
तया नांगरती 
काय कोणी॥१२७

६६

म्हणोनि बंधमोक्षाचें व्याज । नाहीं ; निमालें काज ।आतां निरूपणाचें भोज । वोळगे जर्ही ॥ ५-६६ ॥ 

बंध मोक्षाचे ते
जरी नाही काम 
घडला विराम 
तया जरी ॥१२८

तरी निरूपण 
डे कौतुकाने
काही मिळवणे
नसे तया ॥१२९

६७
आणि पुढिला कां आपणापें । वस्तु विसराचेनि हातें हारपें । मग शब्देंचि घेपे । आठवूनियां ॥ ५-६७ ॥ 

कधी पुढीलांना 
वा आपल्याला 
विसर पडला 
स्वरूपाचा ॥१३०

शब्दचि तयाची
करी आठवण 
तेच प्रयोजन 
असे त्याचे ॥१३१
६८
येतुलियाहि परौतें । चांगावें नाहीं शब्दातें । जर्ही  स्मारकपणें कीर्तीतें । मिरवी हा जगीं ॥ ५-६८ ॥ ॥ 
स्वरूपाची स्मृती 
करुनिया देती 
जगी मिरवती 
शब्द जरी ॥१३२

परी तेवढीच 
तयांची ती शक्ती 
मोठेपणा मिती 
आण नाही.॥१३३

इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्‌अमृतानुभवे सच्चिदानंदपदत्रयविवरणं नाम पंचम प्रकरणं संपूर्णम् ॥

पद्यानुवादक 
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 

Sunday, 24 May 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ५ सच्चिदानंद पदत्रय विवरण ओव्या ५६ ते६० (अभंग१०९ते ११७ )




अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ५  सच्चिदानंद पदत्रय विवरण  ओव्या ५६ ते६० (अभंग१०९ते ११७  )
************************************************************************
उपाय मागील पाय । घेऊन झाले वाय ।
प्रतीति सांडिली सोय । प्रत्ययाची ॥ ५-५६ ॥

जाणण्या उपाय
घेती मागे पाय  
होऊनिया वाय
तया ठायी ॥ १०९॥

प्रत्यक्ष प्रतीती
अशक्यच इथे
म्हणूनिया वाटे
नच जाय  ॥ ११०॥

येथें निर्धारेंसी विचारु । निमोनि झाला साचारु ।
स्वामीच्या संकटी शूरु । सुभटू जैसा ॥ ५-५७ ॥

जैसा संकटात
असतांना स्वामी
जीव त्या देऊनी
लढे योद्धा ॥ १११॥

तैसा तो विचार
जो निश्चयात्मक
सरे  आपसूक
शोधासाठी ॥ ११

नाना नाशु साधूनि आपुला । बोधु बोधें लाजिला ।
नुसुधेपणें थोंटावला । अनुभउ जेथे ॥ ५-५८

द्वैताच्या अभावी
बोध नाश पावे
तया न सोसावे
बोध नाव ॥ ११३ ॥

आणि अनुभव
एकांती पडून
पांगळा होऊन
जात असे ॥ ११४॥
भिंगाचिया चडळा । पदरांचा पुंज वेगळा ।
करितां जैसा निफाळा । आंगाचा होय ॥ ५-५९ ॥

अभ्रक  भिंगाचे
काढता  पापुद्रे  
काही न उरते
जैसे मागे ॥ ११५॥

कां गजबजला उबा । पांघुरणें केळीचा गाभा ।
सांडी तेव्हेळीं उभा । कैंचा कीजे ? ॥ ५-६० ॥

किंवा गरमीने
अति उबारला
केळी गाभा ल्याला
पांघरून ॥ ११६॥

तरी तयालागि  
एकेक काढता
नुरेच  पाहता
अंती काही ॥ ११७॥

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

Wednesday, 20 May 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ५ सच्चिदानंद पदत्रय विवरण ओव्या ५१ ते५५ (अभंग१०२ते १०८)


 

 

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ५ सच्चिदानंद पदत्रय विवरण ओव्या ५१  ते५५ (अभंग१०२ते  ११०)


॥ न पेरितां पीक जोडे । तें मुडाचि आहे रोकडें । 

 ऐसिया सोई उघडें । बोलणें हें ॥ ५-५१


7

पेरण्या पूर्वीच

पिक मुडी असे

गुढ  बोल ऐसे

उघड हे     ॥ १०२॥


एवं विशेष सामान्य । दोहीं नातळे चैतन्य । 

 तें भोगिजे अनन्य । तेणेंसीं सदा ॥ ५-५२


विशेषा सामान्या  

दोघाही नातळे

चैतन्य वेगळे

भावातीत ॥ १०३॥


सदा  स्व स्थितीत

असे भाव शून्य

सर्वदा अनन्य   

आपल्याशी ॥ १०४॥


 आतां यावरी जे बोलणें । तें येणेंचि बोलें शहाणें ।  

जें मौनाचेंही निपटणें । पिऊनि गेलें ॥ ५-५३ ॥

आता या वरती

काही जे बोलणे

ते होय शहाणे 

यया बोले॥१०५॥


ऐसिया बोलणे

बोल न राहणे

तेथे  हरवणे

मौन सुद्धा ॥ १०६॥


एवं प्रमाणें अप्रमाण- । पण केलें प्रमाण । 

 दृष्टांतीं वाइली आण । दिसावयाची ॥ ५-५४ ॥ 

सारीच प्रमाण

होती अप्रमाण

कराया वर्णन

स्थितीचे या ॥ १०७॥


आणिक सिद्धांत

मागे सरतात

घेऊनी शपथ

न दिसण्याची ॥ १०८॥


 अंगाचिया अनुपपत्ति । आटलिया उपपत्ती ।  

येथें उठली पांती । लक्षणाची ॥ ५-५५ ॥


सारी युक्तिवाद

होत असमर्थ

माघारे जातात

चूप होत ॥१०९


आणिक लक्षणे 

खुणा जे सांगत 

तयाची पंगत

उठू गेली ॥ ११०॥


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

https://amrutaanubhav.blogspot.com

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...