Thursday, 17 December 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , ५१ ते ५५ , (अभंग ११४ ते१२३ )

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  ५१ ते ५५ , (अभंग ११४ ते ११३)   

तैसें कारण अभिन्नपणें कार्यही अज्ञान होणें तें अज्ञानचि मा काय कोणें घेपे देपे -५१  

आतां घेतें घेइजेतें ऐसा विचारु नये मानसा तरी प्रमाण जाला मासा मृगजळींचा ना ? -५२  
तंव प्रमाणाचिया मापा संपडेचि जे बापा तया आणि खपुष्पा विशेषु काई ? -५३  

मा हे प्रमाणचि नुरवी आतां आथी हें कोण प्रस्तावी येणें बोलें ही जाणावी अज्ञानउखी -५४  
एवं प्रत्यक्ष अनुमान प्रमाणां भाजन नहोनि जालें अज्ञान अप्रमाण -५५

५१

तयापरी कार्य 
कारण रूपाने
अभिन्न राहणे 
अज्ञान चि ॥११४॥

तर मग इथे 
घेण्या नि देण्याचा 
या व्यवहाराचा 
वाली कोण ॥११५॥

५२ 

म्हणूनिया घेण्या
देण्याचिया कथा 
ही तर व्यर्थता 
गमे इथे ॥११६॥

मृगजळातील 
मासा जैसा सत्य 
तैसेची यथार्थ 
वरील हे ॥११७॥

५३

प्रमाणा ते सिद्ध 
जी न होय कधी 
काय तया प्रती 
भावा ऐसे ॥११८॥

तयामध्ये आणि 
आकाश पुष्पात
फरकाची बात 
नसे मुळी॥११९॥
 ५४

अज्ञान नुरवी 
जर प्रमाणाला 
सिद्ध अज्ञानाला 
करी कोण ॥१२०॥

ययापरी इथे 
अज्ञान अखंड 
येतसे घडून 
आपोआप ॥१२१॥

५५

तैसे अज्ञानात
प्रत्यक्ष आणिक 
अनुमानाधिक 
प्रमाण ना ॥१२२

ठरते अपात्र 
तरी ते अज्ञान 
सतत सांडून 
पूर्णपणे ॥१२३॥
********
भावानुवाद :~ डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे  

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , ४६ ते ५० , (अभंग १०० ते ११३)

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  ४६ ते ५० , (अभंग १०० ते ११३)   

तैसें प्रमाता प्रमेय प्रमाण जें त्रय  
तें अज्ञानाचें कार्य अज्ञान नव्हे -४६  
म्हणोनि प्रत्यक्षादिकीं अज्ञान कार्यविशेखीं  
नेघे तें असेये विखीं आनु नाहीं -४७  
अज्ञान कार्यपणें घेइजे तें अज्ञान म्हणे  
तरी घेतांहि करणें तयाचेंची -४८  
स्वप्नीं दिसे तें स्वप्न मा देखता काय आन  
तैसें कार्यचि अज्ञान केवळ जरी -४९  
तरी चाखिला गुळ गुळें माखिलें काजळ काजळें
 कां घेपे देपे शुळें । हालया सुळु ॥ ७-५० ॥

४६

तयापरी येथे
पाहता प्रमेय 
प्रमाणही सत्य
दिसे जरी ॥१००॥

त्याचे  उपादान
असते अज्ञान 
जरी ते अज्ञान 
स्वयं नसे ॥१०१॥

(पाहता प्रमाण 
प्रमेय पाहणे 
प्रमाणा ते होणे  
सहायक )॥१०२॥
४७
प्रत्यक्ष इत्यादी 
सहाही प्रमाणे 
अज्ञान तयाने 
उपजते ॥१०३॥
( शास्त्रात प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती व अनुपलब्धी अशी सहा प्रमाणे मानली आहेत.)

अज्ञान अस्तित्व 
घडतो स्वीकार  
त्याच्या  कार्यावर 
विशेषचि॥१०४॥
 
तया शिवाय रे 
नच गत्यंतर 
करणे स्वीकार 
भाग असे  ॥१०५॥

४८
अज्ञानाचे कार्य
म्हणजे अज्ञान 
सिध्द हे म्हणून 
एका पक्षी ॥१०६॥

तर ऐसे दिसे 
प्रमाणा  वरून 
सिध्द ते अज्ञान 
होय येथे ॥१०७

अहो तेही तर 
अज्ञानाची असे 
मग पुढे कसे 
जावे  तरी॥१०८॥
४९
स्वप्नी दिसते ते 
जर असे स्वप्न 
पाहतो तो आन 
काय असे ॥१०९॥

तया परी इथे 
कार्य अज्ञानाचे   
अज्ञानच साचे
मानावे बा ॥११०॥

गुळाने गुळाची 
चव जर घेतली 
काजळी लावली 
काजळाला ॥१११॥

सुळाने सुळाला 
देणे सुळावर 
सुळाचा वापर 
करूनिया ॥११२॥

जर येथे घडे
अैसी हि करणी 
तर ती कथनी
सार्थ म्हणू ॥११३॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने  

Wednesday, 16 December 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , ४१ ते ४५ , (अभंग ८८ ते ९९)


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  ४१ ते ४५ , (अभंग ८८ ते ९९)   
*******
तरी अज्ञान स्वरूपें कैसें काय कार्यानुमेय असे
कीं प्रत्यक्षचि दिसे धांडोळूं आतां -४१
अहो प्रत्यक्षादि प्रमाणीं कीजे जयाची घेणी  
ते अज्ञानाची करणी अज्ञान नव्हे -४२  
जैसी अंकुरेंसी सरळ वेली दिसे वेल्हाळ  
तें बीज नव्हे केवळ बीजकार्य होय -४३  
कां शुभाशुभ रूपें स्वप्नदृष्टी आरोपें  
तें नीद नव्हे जाउपें निदेचें कीं -४४  
नाना चांदु एक असे तो व्योमीं दुजा दिसे  
तें तिमिरकार्य जैसें तिमिर नव्हे -४५

४१
 तर मग काय 
कार्य अज्ञानाचे 
अनुमान त्याचे 
कैसे होय ॥८८॥

तयाला पाहून 
येते  का कळून 
आले ते कुठून 
जगात या  ॥८९॥

किंवा असे हे ची 
प्रत्यक्षचि सिध्द 
याचा घेऊ शोध 
आपण  रे ॥९०॥

४२
अहो प्रत्यक्षातही 
इथल्या प्रमाणी
घेणे जे जाणूनी  
यत्नानी जे ॥९१॥

परी असो हे तो 
अज्ञान करणी 
अज्ञान कुठूनी 
येई त्यात  ?॥९२॥
४३
रुजते अंकुर 
वाहते सरळ 
वेल ती वेल्हाळ 
मग दिसे ॥९३॥

वेल नसे बीज
बीजाचे ते कार्य
जाणावे उभय 
वेगळाले ॥९४॥
४४
निजता स्वप्नात 
शुभाशुभ दिसे 
काय तिची असे 
निद्रा स्वये  ॥९५॥

मैत्रीचीये पोटी 
उपजते सृष्टी 
निद्रा बाळक ती
जणू काही ॥९६॥
४५
पाहता नभात
चंद्र एक असे  
परी दोन दिसे 
कधी कुणा ॥९७॥

डोळ्यात तिमिर
आजार पडता
तयाची कार्यता 
अैसी दिसे ॥९८॥

परी हे  तो काज 
असे तिमीराचे 
रूप तिमीराचे 
नसे तिथे  ॥९९ 
******
डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे  

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...