Wednesday, 12 February 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ३, वाचा ऋण परिहार ओव्या ६ ते १०




 अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ३, वाचा ऋण परिहार ओव्या ६ ते १०
 **********************************************************************
लवण अंगें विरे । परी स्वादें जळीं उरे ।

नीद मरोनि जागरें । जि‍इजे निदें ॥ ३-६ ॥
  लवण पाण्यात
जरी विरघळे
परी स्वाद कळे
रसनेस  ॥११॥

येता जागृतीत
दिसे निद्रा अंत
सूक्ष्म ती रूपात
राही परी  ॥१२॥

तेवीं अविद्येसवें । चौघीं वेंचती जीवें ।

तत्त्वज्ञानाचेनि नांवे । उठतीचि या ॥ ३-७ ॥

तैश्या चारी वाणी
अवैद्ये सोबत
निघून जातात
वाटे ऐसे ॥१३॥

परी तत्वज्ञान
नाव पांघरून
होती ती अवतीर्ण
पुन्हा येथे ॥१४॥


हा तत्त्वज्ञान दिवा । मरोनि इहीं लावावा ।

तरी हाही शिणलेवा । बोधरूपेंची ॥ ३-८ ॥
 
चारीही वाचानी
आपण मरून
दिप तत्वज्ञान
लावियला ॥१५॥

परी मुक्त बोधा
घडे तो ही शिण
उपाधी लेवून
छान जरी ॥१६ ॥


ये‍ऊनि स्वप्न मेळवी । गेलिया आपणपां दावी ।

दोन्ही दिठी नांदवी । नीद जैशी ॥ ३-९ ॥
 
येते स्वप्नावस्था
येताच ती निद्रा
आणिक जागता
जाग जैसी॥१७॥

स्वप्न जागृतीस
स्वप्नच कारक
आणि दर्शक
दशाचि या ॥१८॥

जिती अविद्या ऐसी । अन्यथा बोधातें गिंवसी ।
तेचि यथा बोधेंसी । निमाली उठी ॥ ३-१० ॥ 

तैसी ही अविद्या
अज्ञान पांघरी
इया जीवावरी
अस्तित्वाने ॥१९॥

आणि निमताच
बोधाची उजरी
करते अंतरी
तीच तेव्हा ॥२०॥
 ***********************

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

 https://amrutaanubhav.blogspot.com/

Saturday, 8 February 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ३, वाचा ऋण परिहार ओव्या १ ते ५





अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ३, वाचा ऋण परिहार ओव्या  ते



ययांचेनि बोभाटे । आत्मयाची झोंप लोटे ।                      ( बोभाटे=बोलणे ,बड बड )

पूर्ण त-ही ऋण न फिटे । जें चेणेंचि नीद कीं ॥ ३-१ ॥                  (चेणे =उठणे)

परा पश्यंती नि
मध्यमा वैखरी
वाणी अशा चारी
ज्ञात जगी ॥१॥

तयाच्या बोलांनी
आत्म्याचे अज्ञान
निवृत होवून                ( निद्रा हरवून )
गेली वाटे॥२॥

पण ते जाणणे
नच की जागणे             (  ऋण फिटणे )
असते झोपणे
जणू काही ॥३॥

येहवीं परादिका चौघी । जीवमोक्षाच्या उपेगीं ।

अविद्येसवें आंगीं । वेंचती कीर ॥ ३-२ ॥    ( वेंचती=मरती)

चारीही या वाणी
जरी मोक्षपयोगी
आहेत या जगी
खरोखर ॥४॥

परंतु जेधवा
अज्ञाना सकट
समुळची नष्ट
होती तेव्हा ॥५॥



देहासवे हातपाये । जाती , मनासवें इंद्रियें ।

कां सूर्यासवें जाये । किरणजाळ ॥ ३-३ ॥

देह नाशा सवे
जाती हात-पाय
आणिक इंद्रिय
मनासवे ॥६॥
जैसे की किरणे
जातात निघून
सूर्य मावळून
निघताच ॥७॥

ना तरी निद्रेचिये अवधी । स्वप्नें मरती आधीं । ( अवधी=संपता ,शेवट )

तेवीं अविद्येचे संबंधी । आटती इया ॥ ३-४ ॥

सरता निद्रेचा
येथे कालावधी
स्वप्नेही सरती
जैसी काही ॥८॥
तसेच अविद्या
सरताच नाश
असे या वाणीस
यया इथे॥९॥


मृतें लोहें होती । ते रसरूपें जिती ।                मृतें =मरते .नष्ट होणे

जळोनि इंधनें येती । वन्हीदशे ॥ ३-५ ॥

लोहाचे लोहत्व
जेधवा सरते
रसत्व ते येते
तया जैसे ॥१०॥

इंधन आगीत
पडता येतसे
जैसे अग्नी दशे
धडाडून॥११ ॥
*************

Thursday, 6 February 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद अध्याय २, सद्गुरू स्तवन, ओव्या ७६ ते ८० (संपुर्ण )



अमृतानुभव, पद्य भावानुवाद अध्याय २, सद्गुरू स्तवन, ओव्या ७६ ते   ८०

 

दिठी मुखाचिये बरवे । पाथीकडोनि जैं पावे ।  
तैं आरिसे धांडोलावे । लागती काई ? ॥ २-७६ ॥  

७६
मुखावर दिसे
बरवी ती दिठी
जरी काय पाठी
असती तो.....  ॥१६७॥

आरसे शोधून
पाहावे आणून
येते का घडून
सांगा पाहू ? ॥१६८॥

कीं राती हन गेलिया । दिवस हन पातलिया ।  
काय सूर्यपण सूर्या । होआवें लागें ? ॥ २-७७ ॥  

 ७७

हरविता राती
उगविता दिन
सूर्या सूर्य पण
घेणे लागे ?॥१६९॥

अहो ते तयाचे
होणेच की आहे 
घडणे हे पाहे
रात्रंदिन   ॥१७०॥

म्हणोनि बोध्य बोधोनि । घेपे प्रमाणें साधोनि ।  
ऐसा नव्हे भरंवसेनि । गोसावी हा ॥ २-७८ ॥  

७८

असा हा म्हणुनि
बोधाने बोधून
प्रमाण जाणून
कळो न ये ॥१७१॥

स्वयं सदा सिद्ध
आधारा वाचून
आकारी दिसून
महाराव ॥१७२॥


ऐसें करणियावीण । स्वयंभचि जें निवृत्तिपण ।  
तयाचे श्रीचरण । वंदिले ऐसे ॥ २-७९ ॥  

७९

ऐसी जया ठायी
निवृत्ती वसली
स्वयंभ आपुली
केल्याविन   ॥१७३॥

वंदितो परम
त्यांचे चरण
भाग्याचे कारण
अवघ्या जो ॥१७४॥

आतां ज्ञानदेवो म्हणे । श्रीगुरु प्रणामें येणें ।  
फेडिली वाचाऋणें । चौही वाचांचीं ॥ २-८० ॥ ॥ 

८०


वैखरी मध्यमा
परा पशंतीचे
ऋण होते साचे
मजवरी ॥१७५॥

म्हणे ज्ञानदेव
टाकले फेडून
करून वंदना
गुरूदेवे ॥१७६॥

(ऐसे हे करून श्री गुरू वंदन फेडियले ऋण चारी वाचा )



इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्‌अमृतानुभवे गुरुस्तवनम् नाम द्वितीय प्रकरणं संपूर्णम् ॥

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

https://amrutaanubhav.blogspot.com/

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...