Thursday, 27 August 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६ वा शब्दखंडन ओव्या २६ते ३०(अभंग ५१ते ६३) ***********

भाग६ 
अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६ वा शब्दखंडन ओव्या २६ते ३०(अभंग ५१ते ६३) ***********

अगस्तीचिया कौतुका । पुरती जरी मृगतृष्णिका । तरी मार देतो तर्का । अविद्येसी ॥ ६-२६ ॥ 

पुराण प्रसिद्ध 
कथा अगस्तीची 
सिंधू प्राशनाची 
एका घोटी ॥५१॥
जर का ऋषी है 
मृगजळ घोट 
घेवुनिया तृप्त 
होती कधी ॥५२॥
तरीच म्हणावे 
हे अविद्या नाश
शब्दास तर्कास 
शक्य असे॥५३॥

साहे बोलाची बळघी । ऐसी अविद्या असे जगीं । तरी जाळुं ना कां आगी । गंधर्वनगरें ? ॥ ६-२७ ॥ 
बोलायची चढाई  
साहे जी जगता  
काय ती अविद्या 
असे जगी ॥५४॥
असे तर मग 
गंधर्व नगरे 
अग्नीच्या आहारे 
जाऊ शके ॥५५॥

नातरी दीपाचिये सोये । आंधारु कीर न साहे । तेथें कांहीं आहे । जावयाजोगें ? ॥ ६-२८ ॥ 

दिव्याची संगत 
साहे ना अंधार 
येईना समोर 
तयाचिया ॥५६॥
ऐसे काही घडे 
सांगा पाहू इथे 
प्रकाश तमाते 
नाशेनाचि ॥५७॥

प्रकाश असणे
 तै तम नसणे 
अवघे घडणे 
ऐसेचि हे ॥५८॥ 

नातरी पाहावया दिवसु । वातीचा कीजे सोसु । तेव्हढाहि उद्वसु । उद्यमु पडे ॥ ६-२९ ॥ 

दिवस पाहण्या 
दिवाची लावावा
व्यर्थचि शिणावा 
जैसा कोणी ॥५९॥
तयापरी गमे
सारी उठाठेव 
शब्दी आत्मदेव 
देखावया॥६०॥

जेथें साउली न पडे । तेथें नाही जेणें पाडें । मा पडे तेथें तेव्हडे । नाहींच की ॥ ६-३० ॥

जिथे न पडते 
कधी ती सावली 
तिथे ती सावली 
नसतेचि ॥६१॥
आणि जिथे जरी 
गमते सावली 
तिथे हि सावली 
नसतेच ॥६२॥
अडली किरणे  
तिथे ती सूर्याची 
कथा अभावाची 
सांगताती॥६३॥
*****
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
********

Wednesday, 26 August 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६ वा शब्दखंडन ओव्या २१ते २५(अभंग४१ते ५०) ***********


५ वा भाग
अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६ वा शब्दखंडन ओव्या २१ते २५(अभंग४१ते ५०) ***********

सूर्यो राति पां मारील । मा आपणया उदो करील । हे कुडे न सरती बोल । साचाच्या गांवीं ॥ ६-२१ ॥ 
रात्रीला नाशून 
सूर्य हा येईल 
व्यर्थ हे की बोल 
जैसे की ॥४१॥
 सत्याच्या प्रांतात 
ठरतात खोटे  
आणिक ओखटे 
तैसे काही॥४२॥

चेईलें निदे रुसे । ऐसी कें नीद असे ? । कीं चेईलें चेवो बैसें । ऐसें चेणें आहे ? ॥ ६-२२ ॥

काय जागा झाला 
निद्रेवरी रुसे
ऐसी वस्तू असे 
निद्रा काही ॥४३॥
काय जागृताला 
पुन्हा जागवणे 
ऐसे जागवणे 
असे काय॥४४॥

म्हणोनि नाशापुरती । अविद्या नाही निरुती । नाहीं आत्मा आत्मस्थिति । रिगे ऐसा ॥ ६-२३ ॥ 

म्हणुनी अविद्या 
नाहीच नुरुती
जी की नाशासाठी 
उपलब्ध ॥४५॥
आणि आत्मा शब्दे 
येई आत्मस्थिती 
ऐसी काही  स्थिती
नसे इथे॥४६॥

अविद्या तंव स्वरूपें । वांझेचें कीर जाउपें । मा तर्काचें खुरपें । खांडे कोणा ? ॥ ६-२४ ॥

अविद्या म्हणजे 
वांझेचेच पोर 
गमे खरोखर 
नसलेले ॥४७॥
तर्काच्या खुरपी 
नसलेले तण 
काढू जाई कोण 
तैसे ची हे ॥४८॥

 इंद्रधनुष्या सितें । कवण धनवईन लाविजेतें । तें दिसें तैसें होतें । साच जरी ? ॥ ६-२५ ॥ 

नभास दिसते 
इंद्राचे धनुष्य 
कुणी का तयास 
बाण लावी ॥४९॥
रंगाचा आभास 
दिसे परी खास 
नसून कशास 
थांगपत्ता ॥५०॥
******
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://amrutanubhav.com

Tuesday, 25 August 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६ वा शब्दखंडन ओव्या १६ ते२० (अभंग३१ ते ४०)

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६ वा शब्दखंडन ओव्या १६ते २०(अभंग३१ते ४०)
***********

 जागतेया नीद नाही । मा जागणें घडे काई ? । स्मरणास्मरण दोन्हीही । स्वरूपीं तैसीं ॥ ६-१६ ॥ 
१६
काय जागणारा 
म्हणे का मी जागा 
निद्रेचिया भोगा 
सोडुनीया  ॥३१॥
तैसे चि स्मरण 
आणि विस्मरण 
स्वरूपी ते जाण
नसे कदा. ॥३२॥

सूर्यो रात्री पां नेणें । मा दिवो काय जाणें ? । तेवीं स्मरणास्मरणे वीण । आपण वस्तु ॥ ६-१७ ॥ 

जैसा सूर्य नच 
जाणे कधी रात 
दिवसाची बात 
व्यर्थ तिथे ॥३३॥
असणे होऊन 
राहणे तयास 
अवघा प्रकाश 
अंतर्बाह्य ॥ ३४॥
जैसे वस्तू ठाई 
न च की स्मरण 
आणि विस्मरण 
आपले ते  ॥३५॥

एवं स्मरणास्मरण नाहीं । तरि स्मारकें काज काई ? । म्हणौनि इये ठाईं । बोलु न सरे ॥ ६-१८ ॥ 

स्मरणास्मरण
ऐसिया परि ते 
नाहीच वस्तू ते 
कदा काळी ॥ ३६ ॥
मग स्मरणा त्या 
शब्दा काय काज
देणे-घेणे व्याज 
कासयाचे ॥३७॥

आणिक येक शब्दें । काज कीर भलें साधे । परि धिंवसा न बंधे । विचारु येथें ॥ ६-१९ ॥ 

आणि एक काम 
शब्द करीत थोर 
बोलण्यास धीर 
नाही परी ॥३८॥

कां जे बोलें अविद्याअ नाशे । मग आत्मेनि आत्मा भासे । हें म्हणतखेवो पिसें । आलेंचि कीं ॥ ६-२० ॥ 
शब्द जी अविद्या 
हरपून जाते 
आत्मतत्त्व येते  
हाता ऐसे ॥३९॥
पैसे जरी कोणी 
येथे बोलू जाता 
वेडेपणा माथा  
चिकटतो ॥ ४०॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

Thursday, 20 August 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६ वा शब्दखंडन ओव्या ११ते १५(अभंग २१ते ३०)

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६ वा शब्दखंडन ओव्या ६ते १०(अभंग ११ते २०)
*********
सहाय आत्मविद्येचें । करावया आपण वेंचे । गोमटे काय शब्दाचें । येकैक वानूं ॥ ६-११ ॥ 

होतो सहाय्यक 
आत्मविद्येसाठी 
स्वतःच शेवटी 
संपुनिया ॥२१॥
ऐसिया शब्दाचे 
किती गुण गावे 
साधका स्वभावे 
आप्तमित्र ॥२२॥

किंबहुना शब्दु । स्मरणदानीं प्रसिद्धु । 
परी ययाही संबंधु । नाहीं येथें ॥ ६-१२ ॥ 

असे शब्द जरी 
हा स्मरण दानी
प्रसिद्ध म्हणुनि 
जगतात ॥२३
परी आत्मरुपी 
तया नच वाव 
नच शिरकाव 
घडे कधी॥२४

आत्मया बोलाचें । कांहींचि उपेगा न वचे । स्वसंवेद्या कोणाचें । ओझें आथी ? ॥ ६-१३ ॥ 

आत्मया विषयी 
बोलावे ते कुणी 
बोलणे वाहुनी 
व्यर्थ जाते ॥२५॥
आत्मा स्वसंवेद्य 
आहे रे प्रसिद्ध 
शब्द उपयोग 
नाही तिथे ॥२६

आठवे कां विसरे । विषो होऊनि अवतरे । तरी वस्तूसी वस्तु दुसरें । असेना कीं ॥ ६-१४ ॥ 

आठवावे कुणी 
विसरावे कुणी 
विषय होऊनी 
राहावे वा ॥२७॥
 अवघे सायास 
होती दुजेपणी 
आत्मा एकत्वानी 
नांदे इथे ॥२८॥

आपण आपणयातें । आठवी विसरे केउतें ? । 
काय जीभ जिभितें । चाखे न चाखे ? ॥ ६-१५ ॥ 

आपले आपणा 
होते का स्मरण 
किंवा विस्मरण 
कधीकाळी ॥२९॥
जैसे की बोलणे 
जीभ जीभ चाखे 
अथवा न चाखे 
व्यर्थ इथे ॥३०॥


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
**********

Tuesday, 18 August 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६ वा शब्दखंडन ओव्या ६ते १०(अभंग ११ते २०).


****
हा अविद्येचा आंगीं पडे । तैं नाथिलें ऐसें विरूढे ।
न लाहिजे तीन कवडे । साचा वस्तु ॥ ६-६ ॥ 

शब्द जेव्हा पडे ।
अविद्येच्या संगी ।
नसलेले अंगी ।
वाढवितो ॥११॥

सच्चिदानंद ही ।
घेती न कवड्या ।
शब्दाच्या वावड्या ।
उठताच ॥१२॥

शुद्ध शिवाच्या शरीरीं । कुमारु हा जिउ भरी । 
जेवीं आंगें पंचाक्षरी । तेवींचि बोलु ॥ ६-७ ॥ 

जैसा की मांत्रीक । 
तांदूळ टाकून ।
घेतो बोलवून । 
पिशाचाला ॥१३॥
तैसाच हा शब्द 
शिवाच्या शरीरी 
जीवभाव भरी 
शुद्ध जो कि ॥१४॥

जिउ देहें बांधला । तो बोलें एके सुटला । 
आत्मा बोलें भेटला । आपणयां ॥ ६-८ ॥ 

जीव हा देहाने 
असे रे बांधला 
स्वतः विसरला 
स्वतःलाच ॥१५॥

परंतु शब्दाने 
भेटला स्वतःला 
तत्वमसि बोला 
ऐकुनिया ॥१६॥

दिवसातें उगो गेला । तंव रात्रीचा द्रोहो आला । म्हणोनि सूर्यो या बोला । उपमा नव्हे ॥ ६-९ ॥

शब्दाला द्यावी ती 
उपमा सूर्याची 
तरी तीही साची 
वाटेनाचि ॥ १७॥

दिवसाच्या साथी 
रात्रीच्या तो पाठी 
समतेची गोडी 
नाही तेथे ॥१८॥

 जे प्रवृत्ति आअणि निवृत्ति । विरुद्धा ह्या हातु धरिती । 
मग शब्देंचि चालती । एकलेनि ॥ ६-१० ॥ 

शब्द चालवीतो
प्रवृत्ती निवृत्ती 
इया दोन्ही गोष्टी
एकसवे ॥१९॥

जरी का विरुद्ध 
जगी दिसतात 
परी वसतात 
शब्दा ठायी॥२०॥

****
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


*****

Sunday, 16 August 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६ वा शब्दखंडन ओव्या १ते ५(अभंग १ते १०)



प्रकरण सहावें शब्दखंडण
********************

बाप उपेगी वस्तु शब्दु । स्मरणदानीं प्रसिद्धु । अमूर्ताचा विशदु । आरिसा नव्हे ? ॥ ६-१ ॥ 
शब्द वस्तू असे । 
बहु उपयोगी ।
करीतसे जागी । 
स्मृती चित्रे ॥१॥
 अमूर्त तत्त्वाला 
करता विशद 
आरसा प्रसिद्ध 
जणू काही ॥२॥
पहातें आरिसा पाहे । तेथें कांहींचि नवल नव्हे । परि दर्पणें येणें होये । न पाहतें , पाहतें ॥ ६-२ ॥ 
डोळस पाहातो । 
आरसी स्वतःला ।
त्यात ते नवला
काय असे ॥३॥
शब्दांच्या दर्पणी 
अंधही पाहून
घेतात जाणुन 
स्वरुपाला ॥४॥
वडिला अव्यक्ताचिया वंशा । उद्योत्कारु सूर्य जैसा । येणें येके गुणें आकाशा । अंबरत्व ॥ ६-३ ॥
अव्यक्ता च्या थोर 
वंशी प्रकटला 
सूर्य उगवला 
नभी जैसा ॥५॥

शब्द गुणी देई 
आकाशा आकार 
म्हणती अंबर 
मग तया ॥६॥

आपण तंव खपुष्प । परि फळ ते जगद्रूप । 
शब्द मवीतैं उमप । कोण आहे ? ॥ ६-४ ॥ 
खरेतर शब्द 
आकाश सुमन 
जगता समान 
फळ देई ॥७॥
शब्दांनी मोजले 
अवघे ते सारे 
शब्दा नाकळे 
काय आहे॥८॥

विधिनिषेधांचिया वाटा । दाविता हाचि दिवटा । 
बंधमोक्ष कळिकटा । शिष्टु हाचि ॥ ६-५ ॥ 
विधी निषेधाच्या
दावणारा वाटा 
जणू की दिवटा 
दीप्तिमान ॥९॥
मोक्ष बंधनात 
लावून भांडणे 
राही शिष्टपणे 
वेगळा जो॥१०॥
****

Friday, 24 July 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ५ सच्चिदानंद पदत्रय विवरण ओव्या ६१ ते६८(अभंग ११८ते १३३)संपूर्ण


तैसें अनुभाव्य अनुभाविक । इहीं दोही अनुभूतिक । तें गेलिया कैचें एक । एकासिचि ॥ ५-६१॥ 

 
जैसा अनुभाव्य
नि अनुभविता
अनुभवी सदा 
असतात ॥११८

परी आत्मस्थिती 
अभाव ययाला 
संबंध तयाला 
मग कुठे॥११९


अनुभवो हा ठाववरी । आपुलीचि अवसरी । तेथें अक्षरांची हारी । वाईल काई ? ॥ ५-६२ ॥ 

तैसा अनुभव 
जातसे जिरून  
ठाईच विरून 
आपुलिया ॥१२०

तर मग तेथे 
शब्दांनी वर्णन 
कैसे हे घडून 
सांगा बरे ॥१२१


कां परेसी पडे मिठी । तेथें नादासाळु नुठी । मा वावरिजैल ओंठीं । हें कें आहे ? ॥ ५-६३ ॥ 


अहो तिथे परा 
विलय पावते 
नादा न मिळते 
जागा काही ॥१२२

तर मग ओठी 
येईल बोलता 
काय रे हे घेता 
होत आहे ॥१२३

६४

चेइलियाही पाठीं । चेवणयाच्या गोठी । कां धाला बैसें पाठीं । रंधनाच्या ? ॥ ५-६४ ॥ 

जागे झाल्यावर 
जागे करण्याच्या
गोष्टी त्या कामाच्या 
नाही जशा ॥१२४

जेवून उठला 
समाधानी झाला 
का पुन्हा पाकाला 
लागे सांगा ॥१२५
६५

उदैजलिया दिवसपती । तैं कीं दिवे सेजे येती । वांचुनि पिकला शेतीं । सुइजताती नांगर काई ? ॥ ५-६५ ॥ 

 उगवता दिन 
दिवे मालवती 
तयाला लावती 
कोण पुन्हा ॥१२६

पिकुनिया शेती 
धान्य आले हाती 
तया नांगरती 
काय कोणी॥१२७

६६

म्हणोनि बंधमोक्षाचें व्याज । नाहीं ; निमालें काज ।आतां निरूपणाचें भोज । वोळगे जर्ही ॥ ५-६६ ॥ 

बंध मोक्षाचे ते
जरी नाही काम 
घडला विराम 
तया जरी ॥१२८

तरी निरूपण 
डे कौतुकाने
काही मिळवणे
नसे तया ॥१२९

६७
आणि पुढिला कां आपणापें । वस्तु विसराचेनि हातें हारपें । मग शब्देंचि घेपे । आठवूनियां ॥ ५-६७ ॥ 

कधी पुढीलांना 
वा आपल्याला 
विसर पडला 
स्वरूपाचा ॥१३०

शब्दचि तयाची
करी आठवण 
तेच प्रयोजन 
असे त्याचे ॥१३१
६८
येतुलियाहि परौतें । चांगावें नाहीं शब्दातें । जर्ही  स्मारकपणें कीर्तीतें । मिरवी हा जगीं ॥ ५-६८ ॥ ॥ 
स्वरूपाची स्मृती 
करुनिया देती 
जगी मिरवती 
शब्द जरी ॥१३२

परी तेवढीच 
तयांची ती शक्ती 
मोठेपणा मिती 
आण नाही.॥१३३

इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्‌अमृतानुभवे सच्चिदानंदपदत्रयविवरणं नाम पंचम प्रकरणं संपूर्णम् ॥

पद्यानुवादक 
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...