Saturday, 5 September 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ६६ते ७०(अभंग १३८ते १४७)

१३वा भाग
अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ६६ते ७०(अभंग १३८ते १४७) ***********
चकोराचिया उद्यमा । लटिकेपणाची सीमा । जरि दिहाचि चंद्रमा । गिंवसूं बैसे ॥ ६-६६ ॥ 
दिवसा उजेडी 
चांदण्याचे खाणे
जैसे का शोधणे
चकोराने ॥१३८॥
त्याचे ते शोधणे
निरर्थाची सीमा 
ऐसिया उद्यमा
 काय बोलू ॥१३९॥
नुसुधियेचि साचा । मुका होय वाचरुकाचा । अंतराळीं पायांचा । पेंधा होय ॥ ६-६७ ॥ 
को-या कागदाचा 
वाचक तो मुका
अवघाच फुका 
खटाटोप ॥१४०॥
समर्थ पायाचा 
होतसे पांगळा
जरी अंतराळा
चालू जाय ॥१४१॥
तैसीं अविद्येसन्मुखें । सिद्धचि प्रतिषेधकें । उठलींच निरर्थकें । जल्पें होतीं ॥ ६-६८ ॥ 
नसे जी अविद्या
तिला नाशायाला 
सन्मुख ठाकला
शब्द जरी ॥१४२॥
तरी तयाचे ते
उठणे भिडणे
जणू की जल्पणे
निरर्थक ॥१४३॥
अंवसे आला सुधाकरु । न करीच काय अंधकारु ? । अविद्यानाशीं विचारु । तैसा होय ॥ ६-६९ ॥ 
अवसेच्या  राती 
आला सुधाकर
तो ही अंधकार 
होत असे ॥१४४॥
नाहीतर तिला
म्हणणे अवस
केवल ही हौस 
होईल गा ॥१४४॥
तैसा विद्येचिया 
संहाराला आला 
अविद्याची झाला 
शब्द तिथे ॥१४५॥
नाना न निफजतेनि अन्नें । जेवणें तेंचि लंघनें । निमालेनि नयनें । पाहणाचि अंधु ॥ ६-७० ॥ 
केलिया वाचून
सुंदर व्यंजन
करने भोजन
ते लंघन ॥१४६॥
निमाले नयन 
तयांनी पाहणं
काय अंधपण
दुजे आहे ॥१४७॥
*****
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
***********

Friday, 4 September 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ६१ते ६५(अभंग १२८ते १३७) ***********


१२वा भाग
अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ६१ते ६५(अभंग १२८ते १३७) ***********

 माप मापपणें श्लाघे । जंव आकाश मवूं न रिघे । तम पाहतां वाउगें । दीपाचें जन्म ॥ ६-६१ ॥ 
मापा मापपण 
शोभते तोवर 
आकाश जोवर 
मोजेना ते ॥१२८॥
दीपाने पाहिला 
जर का अंधार 
व्यर्थची आकार 
जन्म त्याचा ॥१२९॥
गगनाची रससोये । जीभ जैं आरोगु जाये । मग रसना हें होये । आडनांव कीं ॥ ६-६२ ॥ 
जीभ जव जाई  
गगन चाखाया 
हरते उपाया 
करुनिया ॥१३०॥
तरी तिला कैसे 
म्हणावे रसना 
येई उणेपणा 
नामास त्या॥१३१॥
नव्हतेनि वल्लभे । अहेवपण कां शोभे । खातां केळीचे गाभे । न खातां गेले ॥ ६-६३ ॥ 
नसून वल्लभ 
सौभाग्याचे लेणे 
जगी मिरविणे 
व्यर्थ जैसे ॥१३२॥
केळीचा तो गाभा 
कोणी खाऊ गेले 
उपाशी ते मेले 
जणू काही॥१३३॥
स्थूळ सूक्ष्म कवण येकु । पदार्थ न प्रकाशी अर्कु । परि रात्रीविषयीं अप्रयोजकु । जालाचि कीं ॥ ६-६४ ॥ 
स्थूल सूक्ष्म किती 
वस्तू जगतात 
सूर्य प्रकाशत 
साऱ्यांना त्या ॥१३४॥
तरी काही केल्या 
रात प्रकाशे ना 
वा तो न होईना 
निशेचा त्या ॥१३५॥
दिठी पाहतां काय न फावे । परि निदेतें तंव न देखवे । चेता ते न संभवे । म्हणोनियां ॥ ६-६५ ॥ 
पाहता डोळ्याने
सारेच दिसते 
निद्रा ना दिसते 
परी कधी ॥१३६॥
कैसा जागा झाला 
पाहीन झोपेला 
तो न ती उरला 
म्हणूनिया ॥१३७॥
*********:
©,डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
***********************

Thursday, 3 September 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ५६ते ६०(अभंग ११९ते १२७)

भाग ११
अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ५६ते ६०(अभंग ११९ते १२७) 
****
नाहीं तयाचे नाशें । शब्द न ये प्रमाणदशे । अंधारीं अंधारा जैसें । नव्हे रूप ॥ ६-५६ ॥ 
नाही त्या नाशणे 
जरी या शब्दाने
मोठेपण देणे
तरी  त्या का ॥११९॥
अंधाराचे रूप 
अंधारी नकळे 
तैसे हे सगळे 
आहे इथे ॥१२०॥
अविद्येची नाहीं जाती । तेथें नाहीं म्हणतया युक्ती । जेवी दुपारीं कां वाती । आंगणींचिया ॥ ६-५७ ॥
अंगणात दिवा 
लावला दुपारी 
जैसी व्यर्थ सारी
 उठाठेव ॥१२१॥
अविद्येला जन्म 
जर इथे नाही 
नाथणे युक्ती ही 
निरर्थक ॥१२२॥

 न पेरितां शेती । जे कीं सवगणिया जाती । तयां लाजेपरौति । जोडी आहे ? ॥ ६-५८ ॥ 

न पेरीता शेती 
कापण्यास जाती 
तया न ये हाती 
लाजेवीन ॥१२३ ॥

खवणियाच्या आंगा । जेणें केला वळघा । तो न करितांचि उगा । घरीं होता ॥ ६-५९ ॥ 

नग्न माणसाचा 
घेऊ पाहे झगा 
यत्न तो वाउगा
जैसा होय ॥१२४॥
आकाशाची वस्त्रे 
पाहे पांघरून 
बरे ते त्याहून 
घरातचि ॥१२५॥

पाणियावरी वरखु । होता कें असे विशेखु । अविद्यानाशी उन्मेखु । फांकावा तैसा ॥ ६-६० ॥

जलाशयावर 
पडता पाऊस 
लाभ तो कोणास 
होय त्याचा ॥१२६॥
अविद्या नाशाचे
प्रयत्न शब्दाचे 
निरर्थपणाचे 
तैसेचि ते ॥१२७॥

****
©, डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
***********************

Wednesday, 2 September 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ५१ते ५५(अभंग १०८ते ११७) ***********

११वा भाग
अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ५१ते ५५(अभंग १०८ते ११७) ***********
*****
तो बागुलातें मारू । प्रतिबिंब खोळे भरू । तळहातींचे विंचरू । केंस सुखें ॥ ६-५१ ॥

बागुल बुवाला
धरून मारावे 
प्रतिबिंब घ्यावे 
पदरात ॥१०८॥
तळ हातीचे ते 
केस विंचरणे 
करावे सुखाने 
जैसे काही ॥१०९॥

 घटाचें नाहींपण फोडू । गगनाची फुलें तोडू । सशाचें मोडू । शिंग सुखें ॥ ६-५२ ॥

नसल्या घराला 
रागाने फोडावे 
नभाचे तोडावे 
फुले जैसे ॥११०॥
सशाच्या शिंगाला 
धरून मोडावे 
ऐसेची करावे 
काहीएक॥१११॥

 तो कापुराची मसी करू । रत्नदीपीं काजळ धरू । वांजेचें लेंकरूं । [अरणु सुखें ॥ ६-५३ ॥ 

कापूर जाळून 
काजळ भरून 
शाई ती करून 
वापरावी ॥११२॥
रत्नदिपकाचे
काजळ धरावे
लग्नाची करावे 
वांझ पुत्री ॥११३॥

तो अंवसेनेचि सुधाकरें । पोसू पाताळीची चकोरें । मृगजळींचीं जळचरें । गाळूं सुखें ॥ ६-५४ ॥ 

घेऊन चांदणे 
कुण्या अवसेचे  
पोसो पातळीचे 
चकोर वा ॥११४॥
मृगजळातील 
बहु जलचर 
घेऊन वागुर 
पकडावे११५॥

अहो हें किती बोलावें । अविद्या रचिली अभावें । आतां काई नाशावें । शब्दें येणें ॥ ६-५५ ॥ 

अहो सांगा किती 
ऐसे हे बोलावे 
अविद्या सांगावे 
विवरून ॥११६॥
नसल्या असावे 
कैसे हे घडावे 
अविद्या अभावे 
आहे येथे ॥११७॥
इये अभावते 
आहे पण देणे 
शब्दाने खंडणे 
तैसे होय॥११८॥
******
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
****************

Tuesday, 1 September 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ४६ते ५०(अभंग ९४ते १०७)***********

*****************
१० वा भाग
अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ४६ते ५०(अभंग ९४ते  १०७)
***********
उठावला वोथरे सवंका ।तो सुनाथ पडे असिका ॥ अविद्या नाशीं तर्का  ।तैसें होय ॥४६॥
ऐसीसी ही धिंवसा 
उमटून मना 
व्यर्थाच्या अंगणा 
विरतसे ॥९५॥
तयापरी तर्क 
शब्दांच्या आधारे 
अविद्या अंधारे 
मोडेचिना ॥९६॥

ऐसी अविद्या नासावी । वाहेल जो जीवीं । तेणें साली काढावी । आकाशाची ॥ ६-४७ ॥ 

ऐसी ही अविद्या 
नाशावी सर्वस्वी 
ऐसी चाड जीवी 
वाहे कुणी ॥९७॥
 तयाचे कल्पणे
निरर्थ कष्टणे
सालची काढणे 
आकाशाची॥९८॥

तेणें शेळीगळां दुहावीं । गुडघां वास पाहावी । वाळवोनि काचरी करावी । सांजवेळेची ॥ ६-४८ ॥ 
अथवा तयाने 
शेळीच्या गळ्याचे
 दुधची स्तनाचे 
काढावे की॥९९॥
गुडगा वाटीचे
करुनिया डोळे
 घ्यावी कि धांदोळे 
वाटेची वा ॥१००॥
सांजवेळीची वा 
काचरी करून 
घ्यावी वाळवून 
अनायसे ॥१०१॥
जांभई वांटूनि रसु । तेणें काढावा बहुवसू । कालवूनि आळसू । मोदळा पाजावा । ६-४९ ॥ 
रस वा काढावा 
जांभई वाटून 
त्यात कालवून 
आळसाला ॥१०२॥
अन पाजावे
चिखला मिश्रण 
जाऊन आपण 
प्रेमभरे॥१०३॥
तो पाटा पाणी परतु । पडली साउली उलथु । वारयाचे तांथु । वळु सुखें ॥ ६-५० ॥ 
तयांनी पाटा स 
पाणीया  सकट 
करावे उलट 
जैसे काही ॥१०४॥
(अथवा पाण्यास
उलट दिशेत
 न्यावे वाहवत 
जसे काही )॥१०५॥
वारिया धरून 
मधून पिळून
धागेच काढून
 ठेवावी की ॥१०६॥
पडली सावुली 
हाताने आपुल्या 
उलथवुनिया
पहावि का ॥१०७॥

**""
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
***********************

Sunday, 30 August 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ४१ते ४५(अभंग ८५ते ९४)

९वा भाग
अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ४१ते ४५(अभंग ८५ते ९४) 
***********
अविद्या नाशी आत्मा । ऐसी नव्हे प्रमा । सुर्या आंगीं तमा । जयापरी ॥ ६-४१ ॥
अविद्या ती नासे 
आत्मज्ञान होता 
ऐसिया हे मता 
व्यर्थ मानी ॥८४॥
काय सूर्य कधी 
हरवे अंधार 
प्रकाश अपार 
आणूनीया ॥८५॥
जैसे तया ठाया 
तसेच ती वार्ता 
अंधाराची कथा 
कदा काळी ॥८६॥
 हे अविद्या तरी मायावी । परि मायावीपणचि लपवी । साचा आली अभावी । आपुला हे ॥ ६-४२ ॥
कशीही मायावी 
अविद्या रे पाही 
मायावीपणाही 
लपविती ॥८७॥
 परी येणे रिती 
सार्थ तीच करी 
व्यर्थता ही सारी 
तिच्यातली ॥८८॥
 बहुतापरी ऐसी । अविद्या नाहीं आपैसीं । आतां बोलू हातवसी । कवणापरी ॥ ६-४३ ॥ 
बहु विचारता 
ठसले हे चित्ती
अविद्या जगती 
नसेचि ना ॥८९॥
तर मग शब्दे
होतं विचारते 
ताडावे कोणाते 
अन कसे ॥९०॥
साउलियेतें साबळें । हालयां भोय आदळे । कीं हालेनि अंतराळें । थोंटावे हातु ॥ ६-४४ ॥
पहारी सावली 
मारायास जावे 
तरी तिथे व्हावे 
खळगेच ॥९१॥
हाताने आभाळा 
मारता चापटी 
हातच दुखती 
थोर पणे ॥९२॥
 कां मृगजळाचा पानीं । गगनाचा अलिंगनीं । नातरी चुंबनीं । प्रतिबिंबाचा ॥ ६-४५ ॥ 
मृगजळाचे पाणी 
पिण्यासची जावे 
गगन धरावे 
मिठीत वा॥९३॥
आपण आपले 
घ्यावे की चुंबन 
प्रतिबिंब छान 
पाहुनिया॥ ९४॥
******
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
*********************

Saturday, 29 August 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ३६ते ४०(अभंग ७५ते ८४) ***********

८वा भाग

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ३६ते ४०(अभंग ७५ते ८४) ***********
कालवूनि आंधारें । लिहों येती अक्षरें । तरी मसीचिया बोरबारें । कां सिणावें ? ॥ ६-३६ ॥ 
जरी का अंधार 
कालवून शाई 
उपयोगा जाई 
आणली ती ॥७५॥
शाई करण्याचा 
कार्या का लागावे 
व्यर्थ का शिणावे 
मग कोणी ॥७६॥
आकाश काय निळें । न देखतु हे डोळे ? । तेवीं अविद्येचि टवाळें । जाणोनि घेईं ॥ ६-३७ ॥
आकाश हे निळे 
पाहती ते डोळे 
पण ते वेगळे 
तयाहून  ॥७७॥
तशीच अविद्या 
भासमान खरी 
जाणुनिया परी 
घ्यावी तुम्ही ॥७८॥
अविद्या येणें नांवें । मी विद्यमानचि नव्हे । हे अविद्याची स्वभावें । सांगतसे ॥ ६-३८ ॥ 
स्व नामी सांगते 
जी नाही आहे ते
मुद्रा "अ" काराते 
मिरवून ॥७९॥
आणि इये अनिर्वाच्यपण । तें दुजेंही देवांगण । आपुल्या अभावीं आपण । साधीतसे ॥ ६-३९ ॥
कैसे आहे हिचे
 निर्वाचक पण 
आहे नाही पण 
बोलो न ये ॥८० ॥
घेऊनी शपथ 
सांगे नाही पण 
तेही खुळे पण 
खरे तर ॥८१॥
का हीच जरी आहे । तरी निर्द्धारु कां न साहे ? । वरी घटाभावें भोये । अंकित दिसे ? ॥ ६-४० ॥ 
जरी अविद्या ही 
मानलीच खरी 
परी विवेका वरी 
टिकेना ती ॥८२॥
घटाचे अभावे 
असतेच भूमी 
किंवा म्हणो कोणी 
घट युक्त ॥८३॥
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...