Friday, 14 May 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १५६ ते १६० (अभंग ३३६ते३४९)



अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  १५६ ते १६० (अभंग ३३६ते३४९)   

🌸🌸🌸


नाना न देखणें नको । म्हणे मीचि मातें देखो । तरी आपेंआप विखो । अपैसें असे ॥ ७-१५६ ॥

असे व्यवहारी 

नको ते पाहणे 

द्वैतात खेळणे 

उगाचच ॥३३७

आपण आपणा 

पाहू जावे म्हणे 

रिघोनिया ज्ञाने 

वाटे जरी ॥३३८

आत्मस्थितीत त्या

ज्ञान व्यवहार 

करू जावे तर 

तोच इथे॥३३९

जें अनादिच दृश्यपणें । अनादिच देखणें । हें आतां कायी कोणें । रचूं जावें ? ॥ ७-१५७ ॥

अनादि जो असे 

इथे दृष्य पणे 

अनादि देखणे 

होऊनिया ॥३४०

दृश्य आणि दृष्टा

मिळून दर्शन 

एकच होऊन 

परमात्मा ॥३४१

तयात भेदाची 

करणे रचना 

ठरते वल्गना 

अशक्यशी ॥३४२


अवकाशेशीं गगना । गतीसीं पवना । कीं दीप्तीसीं तपना । संबंधु कीजे ? ॥ ७-१५८ ॥ 

जैसे गगनाचे 

अवकाशी नाते 

गती पवनाते 

एक रूप ॥३४३

अग्नि प्रकाशाचा 

संबंध मुळचा 

काय करायचा 

प्रस्थापित ॥३४४

अहो ते तसेच 

आहे मुळातून

कोणी का करून  

देतो नवे॥३४५


विश्वपणें उजिवडे । तरी विश्व देखे फुडें । ना तें नाहीं तेव्हढें । नाहींची देखे ॥ ७-१५९ ॥ 

विश्व रूपे विश्व 

जेधवा प्रकाशे

तया पाहतसे 

तेच असे ॥३४६

आणिक हे विश्व 

होताच नाहीसे 

नाही पणे तसे 

तोच आहे॥३४७

विश्वाचें असे नाहीं । विपायें बुडालियाही । तर्ही दशा ऐसिही । देखतचि असे ॥ ७-१६० ॥ 

विश्वाचे असणे

आणिक नसणे 

दोन्ही हे घडणे 

बुडताच ॥३४८

त्या ही त्या स्थितीला 

असे पाहणारा 

किंवा जाणारा 

एकमेव॥३४९


🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

+++++++++

Thursday, 13 May 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १५१ ते १५५ (अभंग ३२९ते३३६)



अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  १५१ ते १५५ (अभंग ३२९ते३३६)   

🌸🌸🌸🌸

पातयाचि मिठी । पडलिया कीजे दिठी । आपुलेचि पोटीं । रिगोनि असणें ॥ ७-१५१ ॥ 

मिटता पापण्या 

दृष्टी वळे आत 

आपल्या पोटात 

रिगोनिया॥३२९

कां नुदेलिया सुधाकरु । आपणपें भरे सागरु । ना कूर्मी गिली विस्तारु । आपेंआप ॥ ७-१५२ ॥

उगवण्या आधी 

नभी सुधाकर 

पूर्ण रत्नाकर 

आपल्यात ॥३३०

अथवा कासवी 

आपल्या मर्जीनं

देह आक्रसून 

आत घेते ॥३३१

अवसेचिये दिवसीं । सतराविये अंशीं । स्वयें जैसें शशी । रिगणें होय ॥ ७-१५३ ॥ 

अवसेच्या दिशी 

सतरावी कला 

चंद्र स्वरूपाला 

मूळ जाये॥३३२


तैसें दृश्य जिणतां द्रष्टे । पडले जैताचिये कुटे । तया नांव वावटे । आपणपयां ॥ ७-१५४ ॥ 

जिंकूनिया दृश्य 

द्रष्टा बने जेता 

परंतु पाहता 

आवो असे ॥३३३

जिंकण्या चा आळ

असे ओहटणे 

स्वरूपी असणे 

मूळच्याच॥३३४

सहजें आघवेंचि आहे । तरी कोणा कोण पाहे ? । तें न देखणेंचि आहे । स्वरूप निद्रा ॥ ७-१५५ ॥

अवघे सहज 

जर येथे आहे 

कोण कोणा पाहे 

मग सांग ॥३३५

निखळ पाहणे 

पाहण्या वाचून 

टाळल्या वाचून 

योग निद्रा॥३३६


🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १४६ ते १५० (अभंग ३२०ते३२८)


                         ॥ ॐ॥
अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  १४६ ते १५० (अभंग ३२०ते३२८)   

तया आत्मयाच्या भाखा । न पडेचि दुसरी रेखा । जर्ही विश्वा अशेखा । भरला आहे ॥ ७-१४६ ॥

द्वैत्वाने  भरले 

जग हे दिसते 

भेदात गमते 

भासमान ॥३२०

आत्म स्वरूपात 

नसे परी द्वैत 

रेष विभाजित 

करणारी॥३२१

 दुबंधा क्षिरोदकीं । बाणें परी अनेकीं । दिसती तरी तितुकीं । सुतें आथी ? ॥ ७-१४७ ॥

दिसती अनेक 

रंग काही वस्त्री 

नसून तयाती

जरी का ती ॥३२२

तितुके नसती 

तंतू ते तयाती 

तरीही दिसती 

वेगळाले ॥३२३

 पातयाचि मिठी । नुकलितां दिठी । अवघियाची सृष्टी । पाविजे जरी ॥ ७-१४८ ॥ 

नच उघडता 

पापण्यांची मिठी 

पाहू शके दृष्टी 

जग कधी?॥३२४

न फुटतां बीजकणिका । माजीं विस्तारे वटु असिका । तरी अद्वैतफांका । उपमा आथी ॥ ७-१४९ ॥

फुटल्या वाचून 

बीजाला अंकुर 

वडाचा विस्तार 

होऊ शके ?॥३२५

तैसिचि उपमा 

अद्वैत पसारा 

जहाल्या जगाला 

घडू शके॥३२६


 मग मातें म्यां न देखावें । ऐसेही भरे हावें । तरी आंगाचिये विसवे । सेजेवरी ॥ ७-१५० ॥

उगाचि मी इथे 

मजला पहावे 

ऐसे काही व्हावे 

आत्मतत्वा ॥३२७

देह सेजेवरी 

मग तो विसावे 

दिसतो स्थिरावे

तिये स्थानी ॥३२८


🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

Wednesday, 12 May 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १४१ ते १४५ (अभंग ३१२ते३१९)


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  १४१ ते १४५ (अभंग ३१२ते३१९)   

सौकटाचिया वोजा । पसरो कां बहू पुंजा । परी ताथुवीं दुजा । भाव आहे ? ॥ ७-१४१ ॥

विणकर ठेवी 

हातमागावर 

गुंड्या त्या अपार 

सुतांच्या त्या ॥३१२

परंतु तयात 

एकच ते सुत 

असते खेळत 

पटावरी ॥३१३


कोडीवरी शब्दांचा । मेळावा घरीं वाचेचा । मीनला तर्ही वाचा । मात्र कीं ते ॥ ७-१४२ ॥

हजारो शब्दांचा 

मेळावा वाणीत 

परंतु तत्वतः 

वाणी एक॥३१४

 तैसे दृश्याचे डाखळे । नाना दृष्टीचे उमाळे । उठती लेखावेगळे । द्रष्टत्वेंचि ॥ ७-१४३ ॥

दृश्य ही अनंत 

दर्शने अनंत 

दृष्टेही अनंत 

दिसतात ॥३१५

परमात्म्यावर 

एका त्या कल्पित  

जो की भेदातीत 

सर्वथैव॥३१६

 गुळाचा बांधा । फुटलिया मोडीचा धांदा । जाला तरी नुसधा । गूळचि कीं तो ॥ ७-१४४ ॥

फुटता गुळाची 

ढेप होती खडे

भेद नच घडे 

गुळाशी त्या ॥३१७

 तैसें हें दृश्य देखो । कीं बहू होऊनि फांको । परी भेदाचा नव्हे विखो । तेचि म्हणोनि ॥ ७-१४५ ॥ 

द्रष्टा होऊनिया 

दृश्य कधी देखो

होउनिया फाको 

बहू कधी ॥३१८

अरे सर्व काळी 

तोच तो असतो 

भेद तो नसतो 

तया कधी ॥३१९

🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

Tuesday, 11 May 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १३६ ते १४० (अभंग ३०२ते३११)


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  १३६ ते १४० (अभंग ३०२ते३११)   

गुंफिवा ज्वाळांचिया माळा । लेइलियाही अनळा । भेदाचिया आहाळां । काय पडणें आहे ? ॥७-१३६ ॥ 

ज्वालेचे ते हार 

घालुनीया गळा 

म्हणता अनळा 

घेतले ते ॥३०२

परंतु तसेच 

असे अग्नी रूप 

भेदाचे ते रूप  

डोळीयांना ॥३०३

किं रश्मीचेनि परिवारें । वेढुनि घेतला थोरें । तरी सूर्यासि दुसरें । बोलों येईल ? ॥ ७-१३७ ॥

किंवा किरणांचा 

वेढे परिवार 

सूर्याशी चौफेर 

दाटुनिया ॥३०४

तरी सूर्याहून 

वेगळे ते आण 

येतसे दिसून 

सांगा तिथे ॥३०५


चांदणियाचा गिंवसु । चांदावरी पडिलिया बहुवसु । काय केवळपणीं त्रासु । देखिजेल ? ॥ ७-१३८ ॥ 

विपुल चांदणे 

पांघरतो शशी 

परी एकत्वासी 

मुकेची ना ॥३०६

जरी चांदण्याचे

बहुत दाटणे 

तया उबगणे 

नाही तया ॥३०७

दळाचिया सहस्रवरी । फांको आपुलिया परी । परी नाहीं दुसरी । भास कमळीं ॥ ७-१३९ ॥

सहस्त्र दळांनी 

फुलते अंबर 

दिसते सुंदर 

लोभसते ॥३०८

परी का वेगळे 

दलाहून रे ते 

एकच असते 

सुंदरसे ॥३०९

सहस्रवरी बाहिया । आहाती सहस्रर्जुना राया । तरी तो काय तिया । येकोत्तरावा ? ॥ ७-१४० ॥

सहस्त्र बाहूंनी 

सहस्त्र अर्जुन 

दिसतो शोभून 

महारथी ॥३१०

परी का वेगळा 

त्या हाताहूनी तो 

एकच असतो 

नाही काय॥३११

🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

Sunday, 9 May 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १३१ ते १३५ (अभंग २९२ते३०१)

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  १३१ ते १३५ (अभंग २९२ते३०१)   
**********:

एवं ज्ञानाज्ञान मिठी । तेंही फांकतसे दिठी । दृश्यपणें ये भेटी । आपणपयां ॥ ७-१३१ ॥ 

ज्ञान अज्ञानाची 
पडताच मिठी 
दिसू येते दीठी 
वेगळाले ॥२९२

परि ते अवघे 
चिन्मात्रचि रूप 
आपणास आप 
पाहत असे ॥२९३

तें दृश्य मोटकें देखें । आपण स्वयें दृष्टत्वें तोखे । तेंचि दिठीचेनि मुखें । माजीं दाटे ॥ ७-१३२ ॥

पाहुनिया दृश्य 
दृष्टा हो संतुष्ट 
मग ते घटित 
ऐसे काही ॥२९४

परी ते पाहणे 
आणिक पाहता 
परमात्म सत्ता 
एक होई॥२९५

तेव्हां घेणें देणें घटे । परी ऐक्याचें सूत न तुटे । जेवीं मुखीं मुख वाटे । दर्पणें केलें ७-१३३ 

दिल्या घेतल्याची 
जरी दिसे कृती 
एकपणा तुटी 
परी नाही ॥२९६

दर्पणी पाहता 
आपला चेहरा
होत ना वेगळा
जरी वाटे ॥२९७

अंगें अंगवरी पहुडे । चेइला वेगळा न पडे ।तया वारुवाचेनि पाडें । घेणें देणें ॥ ७-१३४ ॥ 

उभेपणी निद्रा 
जरी घोडा घेई
जग तया पाही
उभा ची तो ॥२९८

तया परी सारे 
घडे व्यवहार 
जगाचा व्यापार 
तयातच॥२९९

पाणी कल्लोळाचेनि मिसें । आपणपें वेल्हावे जैसें । वस्तु वस्तुत्वें खेळों ये तैसें । सुखें लाहे ॥ ७-१३५ ॥ 

कल्लोळाच्या मिषे 
खेळतसे पाणी 
आपण होऊनी 
दोन भागी ॥३००

तया परी वस्तू 
क्रीडा करे काही 
अनुभवास येई  
जाणत्याला ॥३०१

🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

Friday, 7 May 2021

१२६ ते१३०अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १२६ ते१३० (अभंग २८२ते२९१)


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  १२६ ते१३० (अभंग २८२ते२९१)   

🏵🏵🏵

क्षणीं क्षणीं नीच नवी दृश्याची चोख मदवी दिठीकरवीं वेढवी उदार जे -१२६

क्षणोक्षणी असे 
नित्य जो नूतन 
दृश्याची वसन 
लेववितो ॥२८२

सुंदर तलम 
दर्शना कडून 
जणू की घेऊन 
उदार जे॥२८३

मागिलिये क्षणीचीं अंगें पारुसी म्हणोनियां वेगें सांडूनि दृष्टि रिगे नवेया रूपा -१२७

मागील क्षणाचे 
दृश्य झाले शिळे 
म्हणून फेडले 
नव्या क्षणी ॥२८४

आणि होय मग्न 
पाहण्या नवीन 
उलटता क्षण  
तेही फेडे ॥२८५

१२८
तैशीच प्रतिक्षणीं । जाणिवेचीं लेणीं । लेऊनि आणी । जाणतेपण ॥ ७-१२८ ॥ 

तैसा प्रतिक्षणी 
ज्ञान अहंकार 
घेत अंगावर 
मिरवितो ॥२८६
खरंतर असे 
जाणतेपणाने 
स्वतःला आणणे 
जाणिवेत.॥२८७

तया परमात्मपदीचें शेष ना काहीं तया सुसास आणि होय येव्हडी कास घातली जेणें -१२९  
आत्मपदीच्या त्या
शेष जाणिवेला 
कळेना कशाला 
तोष नसे ॥२८८
म्हणून तयाने 
कसली कंबर 
जाहला विस्तार 
ब्रम्हांडसा  ॥२८९


सर्वज्ञतेची परी चिन्मात्राचे तोंडवरी परी तें आन घरीं जाणिजेना -१३०

परमात्म्या ठायी 
दिसे सर्वज्ञता 
कारण मूळत:
तसेचि ते ॥२९०

ज्ञान अज्ञानाचा
स्पर्श न तयास 
चिन्मात्रची खास 
सर्व काही॥२९१

🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com


अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...