Thursday, 6 May 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १२१ ते१२५ (अभंग २७२ते२८६)

    
अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  १२१ ते१२५ (अभंग २७२ते२८६)   

121 
आपुलेंचि दृश्यपण । उमसो न लाहे आपण । द्रष्टत्वा कीर आण । पडली असतां ॥ ७-१२१ ॥

यया लागी ऐसे 
असे हे सांगणे 
विधान खोडणे 
घडे इथे ॥२७२

अहो जया लागी 
आपले आपण 
हे ही नाही आण 
कधीकाळी ॥२७३

तयालागि मग
दृष्टत्व ते कैसे 
कोण कोणा कैसे 
पाहत असे ॥२७४

122 
कोणा कोण भेटे ? । दिठी कैंची फुटे ? । ऐक्यासकट पोटें । आटोनि गेलीं ॥ ७-१२२ ॥

कोण कुणाची रे 
घेत असे भेटी 
पाहतसे दृष्टी 
कोण कोणा ॥२७५

पाहण्या बोलण्या 
लागे दुजे पण 
इथे एक पण 
आटो गेले ॥२७६

123  
येव्हढेंही सांकडें । जेणें सारोनि येकीकडे । उघडिलीं कवाडें । प्रकाशाचीं ॥ ७-१२३ ॥

ऐसे विलक्षण 
कळण्या कठीण 
ऐश्वर्यसंपन्न 
तत्व होणे ॥२७७

सारे मोठेपण 
दूर ते सारून 
होय अवतीर्ण 
समोरच ॥२७८

उघडून द्वारे 
प्रकाश पसरे 
सारले अंधारे 
पूर्ण त्याने ॥२७९

आपणचि झाला 
सर्व की नसून 
दृश्यादी दर्शन 
नटलेला ॥२८०

124 
दृश्याचिया सृष्टी । दिठीवरी दिठी । उठलिया तळवटीं । चिन्मात्रची ॥ ७-१२४ ॥

दृश्यावर दृश्य 
उमटते सृष्टी 
परी असे अंती 
एक रूप ॥२८१

दृष्टा नि दर्शन 
एकच होऊन 
घेतसे पाहून  
आपणाला ॥२८२

ज्ञाना वरी ज्ञान 
होतसे उत्पन्न 
तया अधिष्ठान 
चिन्मय चि ॥२८३

125
दर्शनऋद्धि बहुवसा । चिच्छेषु मातला ऐसा । जे शिळा न पाहे आरिसा । वेद्यरत्नाचा ॥ ७-१२५ ॥ 

अश्या दर्शनाच्या 
निर्मिती क्षणांत 
आनंद भरात 
रमुनिया ॥२८४

चैतन्य प्रबळ 
होऊन तरल 
क्षणात केवळ 
स्थिरावले ॥२८५

ज्ञानाचा तो  द्वैत 
आरसा ही शिळा  
गमे पाहायला 
मग तया.॥२८६


🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com


Tuesday, 4 May 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , ११६ ते१२० (अभंग २५८ते२७१)

  
अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  ११६ ते१२० (अभंग २५८ते२७१)   
 🏵🏵🏵🏵

116 
नाडिले जें वादीकोडें । आंतुचि बाहेर सवडे । तैसा निर्णो सुनाथा पडे । केला जेथें ॥ ७-११६ ॥

पहा जुगारी तो 
गुंडाळून वादी
अडकवी काडी 
तिये मध्ये ॥२५८

आणि चुकवुन 
लोका फसवून 
दावितो ओढून 
बाहेर की ॥२५९

तयापरी इथे 
लाख यत्न केले 
एकाग्री पाहिले 
तत्व ते ही ॥२६०

परी ना कळले 
अवघे चुकले 
यत्न ते फसले 
निर्णयास ॥२६१

117 
 कां मस्तकान्त निर्धारिली । जो छाया उडों पाहे आपुली । तयाची फांवली । बुद्धि जैसी ॥ ७-११७ ॥

मस्तकापासून 
आली जी पाऊली 
छाया ती पडली 
आपलीच ॥२६२

तिये ओलांडून 
जो का जाऊ पाहे 
निरर्थ ती आहे 
कृती त्याची ॥२६३

तया लागी जग 
म्हणे वेडे आहे 
बुद्धी भ्रष्ट लाहे 
बिचारा वा ॥२६४

११८
तैसें टणकोनि सर्वथा । हे ते ऐसी व्यवस्था । करी तो चुके हाता । वस्तूचा जिये ॥ ७-११८ ॥

तयापरी इथे 
आत्मा ऐसा आहे 
सांगू जो का पाहे 
कष्टाने ही ॥२६५

तयाचे ते श्रम 
व्यर्थ होती शीण
वस्तू ना कळून 
कधीच ती॥२६६

119 
आतां सांगिजे तें केउतें । शब्दाचा संसारा नाहीं जेथें । दर्शना बीजें तेथे । जाणीव आणी ? ॥ ७-११९ ॥ 

अणिक येथे रे 
सांगावे ते काय 
शब्दांचे उपाय 
वाया जाती ॥२६७

इथे दृष्य दृष्टा
आणिक दर्शन 
भेद ते निर्माण 
होतीच ना॥२६८

120 
जयाचेनि बळें । अचक्षुपण आंधळें । फिटोनि वस्तु मिळे । देखणी दशा ॥ ७-१२० ॥ 

म्हणे पूर्व पक्षी 
अविद्ये ठिकाणी 
काही न दिसुनी
येई जे का ॥२६९

ते आंधळे पण 
गेले ना निघून 
आले दृष्टा पण 
आत्म्या लागी  ॥२७०

(म्हणजे दृष्टत्व 
असे आत्मतत्त्वी 
प्रतिपादनात्वी 
पुष्टी  येई)॥२७१

🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

Monday, 3 May 2021

१११ ते११५ अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १११ ते११५ (अभंग २४८ते२५७)



 १११ ते११५ अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  १११ ते११५ (अभंग २४८ते२५७)   
🌸🏵🌸🏵🌸🏵
१११ 
विषयाची बरडी । अखंड घासती तोंडीं । तियें इंद्रियें गोडी । न घेपती हे ॥ ७-१११ ॥

असून बरड 
विषय ती किती 
तोंड त्या घालती 
इंद्रिये ही ॥२४८

परी कधी काळी 
जाणू न शकती 
भोगू न शकती 
गोडी याची ॥२४९

112 
परी नाहींपणासगट । खाऊनि भरिलें पोट । ते कोणाही सगट । कां फावेल ? ॥ ७-११२ ॥

खाऊन अवघे 
नाही च्या सकट 
भरे ज्याचे  पोट 
तुडुंबसे ॥२५०

गिळले यावत 
दृश्याच्या सकट 
आत्मा तो प्रकट 
कुणा होय ॥२५१

113 
  जो आपणासी नव्हे विखो । तो कोणा लाहे देखो । जे वाणी न सके चाखों । आपणापें ॥ ७-११३ ॥ 

जो न होय कधी 
विषय स्वतःचा 
तया पाहण्याचा 
लाहो कुणा ॥२५२

जशी न शकते 
रसाना स्वत:ला
स्वत: चाखायला 
कधीकाळी ॥२५३

114
  हें असो नामें रूपें । पुढां सुनि अमूपें । जेथें आलीच वासिपे । अविद्या हे ॥ ७-११४॥

 इतुके ते काय 
अनंत नावांनी 
अनेक रुपांनी
अविद्या ही ॥२५४

जर कधी आली 
आत्मेया पुढती 
सरते मागती 
गपचूप ॥२५५

115 
म्हणोनि आपलेंचि मुख । पाहावयाची भूक । न वाणे मा आणिक । कें रिघेल ? ॥ ७-११५ ॥ 

आगा पहावे ते 
आपलेच मुख 
नुरे हि भूक 
कधी जर ॥२५६
तर मग तिथे 
इतर कुणाला 
वाव शिरायला 
मिळेल का ॥२५७

🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

Sunday, 2 May 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १०६ ते११० (अभंग २३४ते२४७)


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  १०६ ते११० (अभंग २३४ते२४७)   

🌼🌼🌼

१०६

 निमालीही नीद देखे । तो सर्वज्ञ येवढें काय चुके ? । परी दृश्याचिये न टेके । सोईं जो ॥ ७-१०६ ॥

ओसरली निद्रा 

जो की पाहू ठाके 

सर्वज्ञ तो चुके 

काय इथे ॥२३४

निद्रा स्वप्न आणि 

जागृत अवस्था 

यांचा जो तत्वता 

साक्षी असे ॥२३५

परी अंती त्याही 

मिथ्याचि असती 

तया विटाळति 

नच कधी ॥२३६

107 

जो वेद काय काय न बोले । परी नांवचि नाहीं घेतलें । ऐसें कांहीं जोडिलें । नाहीं जेणें ॥ ७-१०७ ॥ 

वेदे बोलायचे

ठेविले न काही 

नाव नच घेई

परी याचे ॥२३७

म्हणजे हा आत्मा 

अमुक असावा 

ऐसा काही दावा 

करी ना तो ॥२३८

108 

सूर्यो कोणा न पाहे ? । परि आत्मा दाविला आहे ? । गगनें व्यापिता ठाये । ऐसी वस्तु ॥ ७-१०८ ॥

अवघे जगत 

करी प्रकाशित 

घेतसे दृष्टीत

सुर्य जरी ॥२३९

परी आत्मा तया 

न ये दाखवता 

हा ऐसा म्हणता

कधीकाळी ॥२४०

नभ व्यापू जाता 

तया त्या अमिता 

होतसे थांबता 

थकुनिया ॥२४१


109

देह हाडांची मोळी । मी म्हणोनि पोटाळी तो अहंकारु गाळी । पदार्थु हा ॥ ७-१०९ ॥

 देहरूपी असे 

हाडांची ही मोळी 

तियेला सांभाळी 

अहंकार ॥२४२

सुक्ष्म नि व्यापक 

जयाचे असणे 

विश्व चालवणे 

एके हाती ॥२४३

परी तयालाही 

होत शक्य काही 

हात लावणे ही 

या पदार्था ॥२४४

110

बुद्धि बोद्ध्या सोके । ते येव्हडी वस्तु चुके । मना संकल्प निके । याहीहुनि ॥ ७-११० ॥

 बुद्धी सहजीच 

सारे जाणतसे 

विषय हा असे 

त्याज्य जीस॥२४५

यया वस्तू लागे

ती ही चुकतसे 

नच जाणतसे 

उणी पडे ॥२४६

मनाचे संकल्प 

असंख्य अनंत 

तो ही मूक होत 

असे येथे ॥२४७

🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

Saturday, 1 May 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १०१ते१०५ (अभंग २२०ते२३३)


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  १०१ ते१०५ (अभंग २२०ते२३३)   

101 

तया नांव अज्ञान ऐसें । तरी ज्ञान होआवें तें कैसें ? । येर्हवीं कांहींचि असे । आत्मा काई ? ॥ ७-१०१ ॥ 


ज्ञान व्यवहारा 

अज्ञान हे नाव 

ज्ञानाचा तो ठाव 

कुठे मग ॥२२०

असे वास्तविक 

एक आत्मतत्त्व 

इथे असे फक्त 

ज्ञानरूप ॥२२१

102 

कांहींच जया न होणें । होय तें स्वतां नेणे । तरी शून्याचीं देवांगणें । प्रमाणासी ॥ ७-१०२ ॥

जया लागी काही 

इथे नच होणे 

होऊनिया नेणे

झाले तरी ॥२२२

अवघी प्रमाणे 

शपथ घेऊनी 

सांगती येउनी 

हेचि की ते ॥२२३


आत्मा ऐसा असे 

किंवा शून्य आहे 

बोलता नच ये

कुणालाही ॥२२४

103 

असे म्हणावयाजोगें । नाचरे कीर आंगें । परी नाहीं हें न लागे । जोडावेंचि ॥ ७-१०३ ॥

आहे म्हणू। जावे 

तो ती स्थिती नाही 

ऐसे असे काही 

सदा येथे ॥२२५

म्हणूनिया नाही 

म्हणण्यात काही 

कारण ते नाही 

दिसतसे ॥२२६

(आहे आणि नाही

व्याख्ये पलीकडे 

सरळ ते कोडे 

असे पाही ॥)२२७

104 

कोणाचे असणेंनवीण असे । कोणी न देखतांचि दिसे । हें आथी तरी काईसें । हरतलेपण ॥ ७-१०४ ॥

दुज्या त्या कुणाच्या 

असल्या वाचून 

आधारा वाचून 

आत्मा असे ॥२२८

दुज्या त्या कुणाला 

पाहिल्या वाचून 

पाहण्या वाचुनी 

असे ची तो ॥२२९

तयाचे पाहणे 

आणिक असणे 

स्वयंसिद्ध ॥२३०

तर मग सांग 

म्हणणे हा नाही 

मानावे कसे ही 

कुणे बोल ॥२३१

105 

मिथ्यावादाची कुटी आली । ते निवांतचि साहिली । विशेषाही दिधली । पाठी जेणें ॥ ७-१०५ ॥ 

कोणी म्हणे नाही 

जर काय याला 

आरोप साहिला 

तयाने तो ॥२३२

आणि कोणी दिली 

विशेषण मोठी 

तया दिली पाठी 

सहजी ची ॥२३३॥


🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

 



Friday, 30 April 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , ९६ते १००(अभंग २०९ते२१९)




अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  ९६ते १००, (अभंग २०९ते२१९ )   

96

अगा चंद्रापासून उजळ । जेणें राविली वस्तु धवळ । तयातें काजळ । म्हणिजतसे ॥ ७-९६ ॥

 जर चंद्राहून

वस्तू ती उजळ 

धुऊन सोज्वळ 

केली कुणी ॥२०९


तरी तिजलागी 

म्हणावे काजळ 

याहून गोंधळ 

काय असे ॥२१०


97 

आगीचे काज पाणी । निफजा जरी आणी । अज्ञान इया वहणी । मानूं तरी तें ॥ ७-९७ ॥ 


आगीचे ते काम

 जर असे पाणी 

तर ही कहाणी 

सत्य होय ॥२११


हि अज्ञानातून 

दृश्य विस्तारली 

साकार जाहल 

स्वयंमेव ॥२१२


98 

कळीं पूर्ण चंद्रमा । आणून मेळवी अमा । तरी ज्ञान हें अज्ञान नामा । पात्र होईजे ॥ ७-९८ ॥


पौर्णिमेचा चंद्र 

अमावस्या आणी

तरही कहाणी 

सत्य होय ॥२१३


ज्ञाना अज्ञानाची

साम्यता लाभून 

घेई अभिधान

त्याचेच की ॥२१४


99 

वोरसोनि लोभें । विष कां अमृतें दुभे । ना दुभे तरी लाभे । विषचि म्हणणें ॥ ७-९९ ॥


प्रेमे जर पान्हा 

फुटला विषाला 

वर्षे अमृताला 

काय कधी ॥२१५


विषरुपी धेनु 

दोहन करता 

विषची तत्वता 

मिळणार ॥२१६

100 

तैसा जाणणेयाचा वेव्हारू । जेथें माखला समोरु । तेथें आणिजे पुरू । अज्ञानाचा ॥ ७-१०० ॥     

ज्ञान व्यवहार 

जिथे भरलेला 

ठाव न उरला 

अन्य कशा ॥२१७


तरी तेथे काय 

अज्ञानाचा पूर 

आला भरपूर 

म्हणावे का ॥२१८


(दृष्य आणि दृष्टा 

एकत्र मिळून 

चिद्रुप भरून

जगी राही ॥२१९)

🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

https://amrutaanubhav.blogspot.com

Thursday, 29 April 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , ९१ते ९५, (अभंग १९८ते२०८ )


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  ९१ते ९५, (अभंग १९८ते२०८ )   

🌺🌺🌺🌺

 भूमीवेगळीं झाडें । पाणी घेती कवणीकडे । न दिसती आणि अपाडें । साजीं असती॥ ७-९१ ॥ 

तरी भरंवसेनि मुळें  पाणी घेती हें  टळें  तैसें अज्ञान कळें  दृष्यास्तव  -९२ 

 चेइलिया नीद जाये  निद्रिता तंव ठाउवी नोहे  परी स्वप्न दाऊनि आहे  म्हणों ये कीं  -९३ 

 म्हणोन वस्तुमात्रें चोखें  दृश्य जरी येव्हडें फांके  तेव्हां अज्ञान आथी सुखें  म्हणों ये कीं  -९४  

अगा ऐसिया ज्ञानातें  अज्ञान म्हणणें केउतें  काय दिवो करी तयातें  अंधारु म्हणिपे ?  -९५ 

🌳🌳🌳

91 

भुमीतून वृक्ष

पाणी घे शोषून 

येतसे दिसून 

पाहताना ॥१९८॥

वृक्षाची पालवी 

पाहता कळते 

पाणी ते मिळते 

तयालागि॥१९९

92 

येणेवरी कळे

मातीतील पाणी 

वृक्षाच्या जीवनी

आधार ती ॥२००

तैसेचि अवघे 

दृश्य हे पाहून 

अज्ञान कळून 

येई इथे॥२०१

93 

जागृतास नाही 

निद्रेची माहिती 

निद्रितास रिती 

निद्रेची वा॥२०२

परी जागृतीत 

स्वप्न आठवती 

तयाने ती  पुष्टि

होय निद्रे ॥२०३

94

तयापरी पाही 

शुद्ध वस्तू ठायी

दृश्य पसाराही 

असेचि ना ॥२०४

तर मग तिथे 

अज्ञान असते 

म्हणता हे येते 

नाही काय॥२०५

 95 

तया या प्रश्नाला 

उमटे उत्तर 

सिद्धांता सकट 

असे पाही ॥२०६

अगा हे बोलणे

अवघेचि  ज्ञान

तयाला अज्ञान 

म्हणावे का?॥२०७

करतो प्रकाश 

सार्‍या या जगास 

अंधार तयास 

म्हणावे का?॥२०८

🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com


अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...