Saturday, 29 May 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २२६ते २३० (अभंग ४८८ते ४९७)

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २२६ते २३० (अभंग ४८८ते ४९७) 

जागृती दाविला । कां निदा हारविला । परी जैसा येकला । पुरुषपुरुषीं ॥ ७-२२६ ॥ 

जर जागृतीत 

कोणी दाखविला 

अन हरविला 

निद्रे माजी ॥४८८

तरीही पुरुष 

पुरुषा ठिकाणी 

एकटा राहुनी 

प्रकाशतो॥४८९

कां रायातें तूं रावो । ऐसा दाविजे प्रत्ययो । तर्ही ठायें ठावो । राजाचि असे ॥ ७-२२७ ॥ 

अथवा राजाला 

शब्दी उल्लेखणे

राजश्री वदणे 

कधी जरी ॥४९०

तरी तोच राजा 

आपुलिया ठाई 

येत जात नाही

शब्दांनी त्या॥४९१

ना तरी रायपण राया । नाणिजे कीं प्रत्यया । तर्ही कांहीं उणें तया । माजी असे ? ॥ ७-२२८ ॥ 

अथवा राजाला 

राजा न म्हटले 

शब्द न वचले

कधीकाळी ॥४९२

तरी काय न्यून 

येतं असे कधी 

राजा राजेपदी 

विराजित॥४९३


तैसें दावितां न दावितां । हा ययापरौता । चढे न तुटे आईता । असतचि असे ॥ ७-२२९ ॥ 


तयापरी आत्मा 

ज्ञानाने दाविला 

अज्ञाने झाकीला  

कधी काळी॥४९४

दोघा पलीकडे 

तयाचे असणे 

वाढणे मोडणे 

होत नाही॥४९५

तरी कां निमित्य पिसें । हा यया दाऊं बैसें । देखतें नाहीं तैं आरिसे । देखावे कोणें ? ॥ ७-२३० ॥

तर मग इथे 

स्वतः मिळवावे 

वेड का लागावे 

कोणास ते ॥४९६

 अहो इथे जर 

पाहणारा नाही 

कोण कोणा पाही

आरशात ॥४९७

🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com


Friday, 28 May 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २२१ते २२५ (अभंग ४७८ते ४८८)


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २२१ते २२५ (अभंग ४७८ते ४८८)

🌺🌺🌺

वावो कीर होये । तर्ही दिसत तंव आहे । येणें बोलें होये । आथी ऐसें ॥ ७-२२१ ॥

(येथे एक शंका
पूर्वपक्ष मांडे
तियेते सिद्धांते
विवरीले ) ॥४७८॥

जर का दिसतं
आहे दृश्य इथे
म्हणावे ते खोटे
कैसे मग ॥४७९

या लागी दृश्याला
मानावेच लागे
सत्याचिया भागे
सम इथे ॥४८०

तरी आन आनातें । देखोन होय देखतें । तरी मानूं येतें देखिलें ऐसें ॥ ७-२२२ ॥

दोन पदार्थात
एकाने पाहिले
दुज्याला म्हटले
मिथ्या जरी॥४८१

मग त्या दृश्यात
पहिला जाहला 
अरे पाहणारा
नसूनी ही॥४८२

येथें देखोनि कां न देखोनि । ऐक्य कां नाना होऊनि । परि हा येणेंवाचूनि । देखणें असे ? ॥ ७-२२३ ॥

ऐसी या स्थितीत
जर का पाहणे
किंवा न पाहणे
कोणी कोणा ॥४८३

एक पणे असे
किंवा भिन्न भासे
तोचि तोही असे
एकमेव ॥४८४

आरिशानें हो कां दाविलें । तरी मुखचि मुखें देखिलें । तो न दावी तरी संचलें । मुखचि मुखीं ॥ ७-२२४ ॥

जरी का दाविले
मुख आरशाने
बिंबुनि बिंबाने
प्रतिबिंब ॥४८५

परंतु मुखची
मुखाच्या ठिकाणी
असे एकत्वानी
पाहू जाता॥४८६

तैसें दाविलें नाहीं । तरी हाचि ययाचा ठाईं । ना दाविला तरीही । हाचि यया ॥ ७-२२५ ॥

तया परी जगी 
न दाविला तया
तरी तया ठाया
तोच असे ॥४८७

अथवा दाविला
दृश्यात आणीला
तरी एकत्वाला
भंग नाही॥४८८

🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

Thursday, 27 May 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २१६ते २२० (अभंग ४६६ते ४७७)

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २१६ते २२० (अभंग ४६६ते ४७७) 

म्हणोनि आपणापें द्रष्टा । न करितां असें पैठां । आतां जालाचि दिठा । कां न करावा ॥ ७-२१६ ॥

म्हणुनी आपणा

आपण तो द्रष्टा 

नच करी द्रष्टा 

कधीकाळी ॥४६६

स्वयंसिद्ध आत्मा 

आपल्या ठिकाणी 

मायेत आणून 

ठेवावा का॥४६७

नाना मागुतें दाविलें । तरी पुनरुक्त जालें । येणेंहि बोलें गेलें । दावणें वृथा ॥ ७-२१७ ॥

तेच तेच जर 

पुन्हा दाखवले 

पुनरुक्त झाले 

म्हणतात ॥४६८

तेसे द्रष्टा पण 

आणिक दर्शने

विशद करणे 

व्यर्थ इथे ॥४६९

आत्मा नित्य द्रष्टा 

दृश्याच्या वाचून 

हीच मूळ खूण

जाणावी ती॥४७०

दोरासर्पाभासा । साचपणें दोरु कां जैसा । द्रष्टा दृश्या तैसा । द्रष्टा साचु ॥ ७-२१८ ॥ 

जरी दोरी भासे 

सर्पाकार इथे 

मूळ दोरी तिथे 

परी असे ॥४७१

तयापरी येथे 

द्रष्टा आणि दृश्य 

यात आभास 

दृश्य होय ॥४७२

अणिक द्रष्टाच 

एकच हे सत्य 

हाची तो प्रत्यय 

येत असे॥४७३

दर्पणें आणि मुखें । मुख दिसे हें न चुके । परी मुखीं मुख सतुकें । दर्पणीं नाहीं ॥ ७-२१९ ॥ 

दर्पणा समोर 

आणताच मुख 

दिसतसे मुख 

तयामध्ये ॥४७४

परंतु जेधवा 

दर्पण नसते 

मुखचि असते 

मुख पणे॥४७५

तैसे द्रष्टा दृश्या दोहों । साच कीं देखता ठावो । म्हणौनि दृश्य तें वावो । देखिलें जर्ही ॥ ७-२२० ॥

 दृश्य दृष्टा ऐसे 

दिसे विभाजन 

दोन ते होऊन 

या समान ॥४७६

परी पाहू जाता 

दृश्य ते असत्य 

द्रष्टा फक्त सत्य 

जाणावे पा ॥४७७

🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

Tuesday, 25 May 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २११ते २१५ (अभंग ४५५ते ४६५)


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २११ते २१५ (अभंग ४५५ते ४६५) 

🌺🌺🌺

कीं साउलीचेनि व्याजें । मेळविलें जेणें दुजे । तयाचें करणें वांझें । जालें जैसें ॥ ७-२११ ॥ 

कोणी ठरविले 

घ्यावे सोबतीला 

आपल्या छायेला 

सवेची की ॥४५५

तयाची सोबत 

ठरते निरर्थ 

वांझ मेहनत 

जैसी काही॥४५६

तैसें दृश्य करूनियां । द्रष्ट्यातें द्रष्ट्या । दाऊनि धाडिलें वाया । दाविलेपणही ॥ ७-२१२ ॥ 

तयापरी द्रष्टा 

जे दृश्य असेल 

अन दाखवेल 

तयाला ची ॥४५७

तरी तयाचे ते 

व्यर्थ दाखवणे 

जगास सांगणे 

असे पहा ॥४५८

जें दृश्य द्रष्टाचि आहे । मा दावणें कां साहे ? । न दाविजे तरी नोहे । तया तो काई ? ॥ ७-२१३ ॥

दृश्य म्हणुनिया 

असे जे जे काही 

द्रष्टाच ते पाही 

असे बरे ॥४५९

मग दाखवणे 

वेगळे पणाने 

कैसे ते घडणे 

होय इथे ॥४६०

आणि जर काही 

नाही दाखवले 

द्रष्टा पण गेले 

ऐसे होय ?॥४६१

आरिसा पां न पाहे । तरी मुखचि वाया जाये ? । तेणेंवीण आहे । आपणपें कीं ॥ ७-२१४ ॥ 

जरी का आरसा 

मुखे न पाहिला 

मुख ते वायाला 

गेले काय ?॥४६२

आरशा वाचून 

दिसल्या वाचुनी 

आपल्या ठिकाणी 

आहेच ते॥४६३

तैसें आत्मयातें आत्मया । न दाविजे पैं माया । तरी आत्मा वावो कीं वायां । तेचि कीं ना ? ॥ ७-२१५ ॥ 

तयापरी माया 

आत्म्याचे दर्शन 

आत्म्या घडवून 

आणते ना ॥४६४

तर मग काय 

आत्मा खोटा असे 

माया खोटी असे 

काय बरे ?॥४६५

🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

*********

Monday, 24 May 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २०६ ते २१० (अभंग ४४५ते ४५४)


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २०६ ते २१० (अभंग ४४५ते ४५४) 
🌸🌸🌸🌸

देखतांची आपणयातें । आलिये निदेचेनि हातें । तया स्वप्ना ऐसा येथें । निहाळितां ॥ २०६ ॥

जर काही कोणी 
गेला झोपायला 
आणि प्राप्त झाला 
स्वप्नालागी ॥४४५

तया स्वप्नामाजी 
पाहतो स्वतःला 
मानतो स्वप्नाला 
सत्य असे॥४४६

निद्रिस्तु सुखासनीं । वाहिजे आनु वाहणीं । तो साच काय तेसणी । दशा पावे ? ॥ ७-२०७ ॥

किंवा प्रत्यक्षात 
निजे खाटेवरी
नेतो कुणीतरी 
स्वप्नी दिसे ॥४४७

घडल्या वाचून 
स्वप्नात रमून 
घडले वाटून 
घेत असे॥४४८

कीं सिसेंवीण येक येकें । दाविलीं राज्य करिती रंकें । तैसींचि तियें सतुकें । आथी काई ? ॥ २०८ ॥ 

अथवा स्वप्नात 
बसे सिंहासनी 
दरिद्री तो कोणी 
शिराविन ॥४४९

ऐसे विपरीत 
कधी का घडते 
तरीही दिसते 
स्वप्नामाजी ॥४५०

ते निद्रा जेव्हां नाहीं । तेव्हां जो जैसा जिये ठाई । तैसाची स्वप्नी कांहीं । न पविजेचि कीं ॥ ७-२०९ ॥

सरताच निद्रा 
जशाचा तसा तो 
जगात दिसतो 
वागतांना ॥४५१

किंवा निजलेला 
स्वप्न पाहतांना 
असे अंथरूणा 
निजलेला॥४५२

तान्हेलया मृगतृष्णा । न भेटलेया शिणु जेसणा । मा भेटलेया कोणा । काय भेटलें ॥ ७-२१० ॥

कोणी तहानेला 
धावे मृगतृष्णा 
शिणतो मिळेना 
क्लेश तया॥४५३

जरी भेटताच 
तया मृगजळा
काय ते जळ
पिऊ शके॥४५४

🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

Sunday, 23 May 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २०१ ते २०५ (अभंग ४३३ते ४४४ )


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २०१ ते २०५ (अभंग ४३३ते ४४४ ) 
🌸🌸🌸🌸

पाहाणया पाहणें आहे । तरी न पाहणें हेंचि नोहे । म्हणौनि याची सोये । नेणती दोन्ही ॥ ७-२०१ ॥

जर पाहणारा 

असतो पाहणे 

तेथे ते पाहणे 

कैसे घडे ॥४३३

द्वैतात पाहणे 

किंवा न पाहणे 

दोन्ही नच होणे 

आत्मतत्वी॥४३४

एवं पाहणें न पाहणें । चोरूनियां असणें । ना पाहे तरी कोणें । काय पाहिलें ? ॥ ७-२०२ ॥

तैसे ची पाहणे 

आणि न पाहणे 

सांगा लपवणे

होते काय ॥४३५

आणिक जर का 

म्हणाल पाहिले 

काय ते कुठले 

कोणी बरे॥४३६

दिसत्यानें दृश्य भासे । म्हणावें ना देखिलें ऐसें । तरी दृश्यास्तव दिसे । ऐसें नाहीं ॥ ७-२०३ ॥

जर का दिसते

दृश्य त्या द्रष्ट्याला

जावे म्हणायला

तेही नाही ॥४३७

सारे काही तया

दृश्यामुळे दिसे 

बोलणे हे जसे 

चुकीचेच ॥४३८

पाहता कारण 

द्रष्ट्याहून भिन्न 

सत्ता दृष्याला न

अन्य काही ॥४३९

दृश्य कीर दृष्टीसी दिसे । परी साच कीं द्रष्टा असे । आतां नाहीं तें कैसें । देखिलें होये ? ॥ ७-२०४ ॥

दृश्यालागी द्रष्टा 

ऐसेची दिसते 

खात्रीने भासते 

पाहू जाता ॥४४०

परी येथे जर 

असतो द्रष्टाच

दृश्य ते नाहीच  

अस्तित्वात ॥४४१

तर मग इथे 

जे काही दिसले 

तया ते पाहिले 

म्हणावे का?॥४४२

मुख दिसो कां दर्पणीं । परी असणें कीं तये मुखपणीं । तरी जाली ते वायाणी । प्रतीति कीं ॥ ७-२०५ ॥ 

जैसे आरशात 

मुख दिसू येई 

मुकपणे राही 

मुखची ते ॥४४३

दर्पणी भासते 

खरे ते नसते 

मिथ्याच दिसते 

भासमान ॥४४४


🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

*****

Saturday, 22 May 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १९६ ते २०० (अभंग ४२२ ते ४३२)

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १९६ ते २०० (अभंग ४२२ ते ४३२)  
🌸🌸

कीं रसु आपणिया पिये ? । कीं तोंड लपऊनि ठाये ? । हें रसपणें नव्हे । तया जैसें ॥ ७-१९६ ॥

रस का स्वतःला 

घेतसे पिऊन 

किंवा लपवून 

मुख बसे ॥४२२

रस स्वभावतः 

असे रसपणे

दोन्ही बोलणे 

तिथे व्यर्थ॥ ४२३

तैसें पाहणें न पाहणें । पाहणेंपणेंचि हा नेणे । आणि दोन्ही हें येणें । स्वयेंचि असिजे ॥ ७-१९७ ॥

तेैंसी ची पाहणे 

आणि न पाहणे 

असून पाहणे 

घडेची ना ॥४२४

जरी का पाहतो 

तरी न पाहतो 

दोन्हीही असतो 

आपणच॥४२५

जें पाहणेंचि म्हणौनियां । पाहणें नव्हे आपणयां । तैं न पाहणें आपसया । हाचि आहे ॥ ७-१९८ ॥

पाहणेच घडे 

जर निरंतर 

पाहणारा येर  

कुठून ये ॥४२६

म्हणुनिया वस्तू 

पाही आपणास 

यया बोलण्यास 

वाव नाही॥४२७

आणि न पाहणें मा कैसें । आपणपें पाहों बैसे ? । तरी पाहणें हें ऐसें । हाचि पुढती ॥ ७-१९९ ॥ 

द्वैताच्या अभावी 

कोण कोणा पाही

जाणे तो स्वतःही 

मग कैसे ॥४२७

नित्य ज्ञानाचे ते 

असते स्वरूप 

तया का रूप 

पाहू जाणे ४२९

(ज्ञानाच्या ठिकाणी

ज्ञानच चोखळ 

असते केवळ 

सर्व व्याप्त)॥४३०

हीं दोन्ही परस्परें । नांदती एका हारें । बांधोनि येरयेरें । नाहीं केलें ॥ ७-२०० ॥ 

दोघे परस्पर 

एकाच पंगती 

एकत्र नांदती 

सर्वकाळ ॥४३१

अन येरयेरा 

बांधून घेऊन 

जातात संपून 

आत्म ठायी ॥४३२

🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

****

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...